मीटूची प्रकरणं आताच का ?

मीटूची प्रकरणं आताच का ?

me too

हिंदी सिनेसृष्टीत महिलांच्या छेडछाड आणि बलात्काराच्या घटना जरी आता समोर येत असल्या तरी हे जग काही अलिकडेच वसलेलं नाही. सिनेजगताला तब्बल 100 वर्ष, एक शतक पूर्ण झालं आहे. दादासाहेब फाळके यांनी जे स्वप्न घेऊन सिनेमांची निर्मिती केली, तेव्हा या सिनेमांची अशी देखील एक काळी बाजू असेल, असे त्यांना आणि त्यानंतर घडलेल्या अनेक दिग्गज कलाकारांनाही वाटले नसेल. मग आताच या घटना समोर का येत आहेत. 1913 साली पहिला चित्रपट बनला. त्यानंतर 1920 ते 1940 च्या दशकांमध्ये खर्‍या अर्थाने सिनेकलाकारांची ओळख बनत गेली. महिला तेव्हाही नव्याने चित्रपट क्षेत्रात येत होत्या. नाचगाणी, हजारो प्रेक्षकांसमोर अभिनय सादर करण्याच आव्हान तेव्हाही त्यांच्यासमोर होत. अनोळखी सहकलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात ती नाजूक, सुंदर आणि नवखी हिरोईन नक्कीच तेव्हाही बावरली असणार. मात्र तेव्हा कधीही अमक्या निर्माता, दिग्दर्शक किंवा हिरोने आपल्यावर अतिप्रसंग केल्याच्या घटना समोर आल्याचे ऐकिवात नाहीत.

हिंदी सिनेसृष्टीत गोल्डन ईरा समजला जाणारा पुढचा काळ म्हणजे 1940 ते 1960 च्या दरम्यानचा. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, गुरू दत्त, अशोक कुमार अशा दिग्गज कलाकारांनी हा काळ गाजवला. याच काळात नर्गिस, मधुबाला, वहिदा रेहमान, नूतन यांसारख्या सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री सिनेसृष्टीत आल्या. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या महिला सिनेमांमध्ये काम करू लागल्या. तेव्हा त्यांना त्या काळात आक्षेपार्ह अनुभव आला नसेल का, असा प्रश्न नक्कीच तेव्हाच्या आणि आत्ताच्या प्रेक्षकांनाही पडू शकतो. अतिशय बोल्ड अँड ब्युटीफुल दिसणार्‍या या सौंदर्यवती जेव्हा देखण्या हिरोच्या अवतीभवती असायचा, तेव्हा कोणात्याही हिरो किंवा अभिनेत्याचं मन या सौंदर्यवतींवर आलं नाही असं नाही. हा काळ ब्लॅक अँड व्हाईट काळातला असला तरीही तो काळ त्याच्या भूतकाळाच्या तुलनेत मॉडर्नच होता. स्किन टाईट चुडीदार, शर्ट-टॉपपासून ते वन पीसपर्यंत सर्व प्रकारचा फॅशनेबल पेहराव या अभिनेत्री त्यावेळी करत होत्या.

शम्मी कपूरच्या अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिसमधील शर्मिला टागोर हिने तर एक गाण्यामध्ये चक्क बिकिनी परिधान केली आहे. तत्कालीन बालकलाकार डेसी ईरानी हिने काही वर्षांपूर्वी तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना उघड करण्या व्यतीरिक्त कोणतीही बलात्कार वा छेडछाडीची घटना त्या काळातील समोर आलेली नाही. दुसरीकडे मराठी सिनेसृष्टीतही अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांच्यावर ब्रम्हचारी या चित्रपटातील यमुना जळी खेळू खेळ कनैय्या, का लाजता…हे गाण चित्रित झालं होतं. त्यांनीही या गाण्यात बिकिनी परिधान केली होती. त्याकाळात मी टू सारखं काही झालं होतं का? कि झालं होतं पण त्यावेळी सोशल मिडिया किंवा एकूणच प्रसारमाध्यमं आजइतकी प्रगत नव्हती म्हणून ही प्रकरणं पुरेशी उजेडात आली नाहीत किंबहुना दाबली गेली, अशीही शक्यता आहे.

गोल्डन ईरामधील आणखी एक खास आकर्षण म्हणजे तेव्हाच्या चित्रपटातील कॅब्रे डान्सचा ट्रेंड. हेलन आणि बिंदू सारख्या अनेक अभिनेत्रींनी कॅब्रे नृत्य करून प्रेक्षकांना घायाळ केले. त्यांचे ते कॅब्रे नृत्यासाठी लागणारे ठराविक कपडे, हे लोकांना सिड्युस करण्यासाठी पुरेसे होते. मात्र हेलन किंवा बिंदूने त्या काळातील कोणावरही आरोप केल्याचे ऐकिवात नाही. किंवा आताही मीटू मोहिमेवर उघडपणे बोलल्या नाहीत. तत्कालीन हिंदी सिनेमांमध्ये गरिब हिरोईन आणि श्रीमंत व्यापारी यांच्यातील एक सीन प्रामुख्याने दाखवला जायचा.

मदर इंडियातील सुखीलालाने राधाराणीवर केलेली बळजबरी, रोटी कपडा और मकानमध्ये तीन व्यापार्‍यांनी मौसमी चॅटर्जीच्या परिस्थितीचा उठवलेला फायदा, घरातील गरिबी दूर करण्यासाठी धनाढ्यांकडे आपणहून गेलेल्या हिरोच्या हतबल बहिणी हे चित्रण जसे सिनेमांमध्ये पाहायला मिळत होते. तसे ते त्यांच्या वास्तविक जीवनातही घडले नसतील का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्या काळातील सर्व हिरोईन्स नव्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण करत होत्या. कोणतीही चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी त्यांना नव्हती. मग अशा सौंदर्यवतीनंचा फायदा कोणी घेतला नसेल का, यावर त्या काळातील हिरोईन्सच उत्तर देऊ शकतील.

पुढे 1970 ते 1980 च्या दशकात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, फिरोज खान, विनोद खन्ना सारखे सदाबहार कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांना हिरोईन्सही तितक्याच ताकदीच्या लाभल्या. रेखा, परविन बाबी, जया भादुरी, मुमताज, नंदा, झीनत अमान यांनी चंदेरी दुनियेतील चित्रपटांची सफर घडवून दिली. झीनत अमान, मुमताज यांनी आपल्या चित्रपटांमधून कित्येकदा बोल्ड अवतार दर्शवले आहेत. फिरोज खानच्या चित्रपटांत हिरोईन्सना प्रेक्षकांसमोर सादर करण्याची पद्धत ही काही हॉलीवूड सिनेमांपेक्षा वेगळी नव्हती.

याच काळात राज कपूर यांच्या संगममधील वैजयंती माला यांचा बोल राधा बोल संगम होगा के नही गाण्यातील पाण्यामधला प्रसंग, बॉबी चित्रपटातील, बिकिनी आणि शॉर्ट ड्रेसमधील डिंपल कपाडिया, सत्यम शिवम सुंदरमची फक्त साडी नेसून पाण्यात उतरणारी झीनत आणि राम तेरी गंगा मैलीमधील व्हाईट सारीतील मंदाकिनी यांच्याकडे प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील इतर मंडळी त्यावेळी आकर्षिले गेले नसतील, यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. तरीही कोणत्याही हिरोईनने तेव्हाच्या कोणत्याही निर्माता, दिग्दर्शक, लेखक किंवा कलाकारावर विनयभंगाचे आरोप केल्याच्या घटना इतिहासात नाहीत. परंतू तेव्हा अशा घटना घडतच नसतील का, असेही बोलणे चुकीचे ठरेल.

21 व्या शतकात हिंदी सिनेसृष्टी बॉलीवूडच्या नावाने प्रचलित झाली. गेल्या 20 वर्षात सिनेमांमध्ये सर्वच बाजूने अमुलाग्र बदल झालेले पाहायला मिळाले. यामध्ये हिरोईन्सला आलेले अनन्य साधारण महत्त्व वगळून चालणार नाही. तरीही मीटू सारख्या घटना घडतात आणि ती त्याचवेळी उघडपणे बोललीही जात नाही, हे सिनेसृष्टीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रामुख्याने एक बाब यामध्ये समोर येते, ती म्हणजे मीटूमध्ये बोलणार्‍या सर्वच सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या महिला आहेत. कोणत्याही कलाकाराच्या किंवा सुपरस्टारच्या मुलीने, बहिणीने आपल्यावर अतिप्रसंग झाल्याचे म्हटले नाही. म्हणजेच विनयभंग आणि छेडछाडीसाठी सिनेमांमध्ये पदार्पणात स्ट्रगल करणार्‍या मुलींना शिकार बनवले जात आहे, हे या उदाहरणांवरून स्पष्ट होते. मीटूचे वादळ बॉलीवूडमध्ये आलय खरं पण हे वादळ आणखी किती जणांना आपल्या कवेत घेणार हे पुढे येणारी वेळच सांगू शकेल.

First Published on: October 14, 2018 1:31 AM
Exit mobile version