माझ्या थाळीत काय काय आहे?

माझ्या थाळीत काय काय आहे?

thali

येत्या १६ तारखेला जागतिक अन्न दिवस साजरा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेतर्फे दर वर्षीच्या १६ ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना पोटभर जेवण मिळेल, यासाठीच्या कृती व जागृतीचे कार्यक्रम जगभरातील जवळपास १३० देशांमध्ये आयोजित केले जातात. सर्वांसाठी सुरक्षित व पौष्टिक अन्न हे आजही अनेक देशांपुढील केवळ स्वप्न आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. वातावरणातील बदल, दुष्काळ, अतिवृष्टी, गरिबी, देशांतर्गत व देशा देशांत युद्ध या कारणाने बहुसंख्य लोक उपाशी झोपतात.

दि स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्युट्रीशन इन द वर्ड २०१८ च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर ८२ कोटींहून अधिक लोक कुपोषित आहेत. त्याचवेळी १९० कोटी लोक हे वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. ही दोन्हीकडील स्थिती दूर करून सर्वांना पुरेसे व पोषक अन्न मिळेल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. झिरो हंगर वर्ड बाय २०३० इज पॉसिबल हे या वर्षीच्या जागतिक अन्न दिवसाचे ध्येय वाक्य ठरविण्यात आले आहे. या निमित्ताने आपण आपले अन्न तपासून घेऊया. हा लेख इतर लेखांसारखा वाचून सोडून देण्यासाठी नाही. लेख वाचायला घ्यायचे आणि काही अर्धवट वाचून तर काही पूर्ण वाचून पेपर बाजूला सारायचे असे नाही. येथे वाचून तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत.

शक्यता आहे की त्यातून तुमच्या अनेक गोष्टी बदलतील. त्यामुळे अशी मनाची तयारी करून पुढे वाचा. काल काय जेवलात? या साध्या प्रश्नापासून करूया. आपण काय खातो? याबद्दल आपण किती विचार करतोय? वजन कमी करण्याच्या दडपणातून काही लोक काय-काय खावे याचा शोध घेत असतात. मात्र तेही वजन कमी होईल असे अन्न कोण-कोणते आहे, इतकेच व त्यापुरतेच असते. त्यापलीकडे आपल्या खाण्याबद्दल आपण किती जागरूक असतो ? आपली शारीरिक क्षमता, विचार, बौद्धिक क्षमता ज्या गोष्टींवर अवलंबून असते त्याबद्दल आपण इतके उदासीन कसे काय? मान्य आहे की खूप धावपळीचे जीवन आहे.

मी वर्षभर जे जे खातो त्याची एक यादी बनवायची झाली, तर यादीमध्ये पदार्थांबरोबर त्या पदार्थात वापरलेले घटक लिहायचे आहेत. जसे, भाकर असेल तर ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी असे घटक येतील. भात असेल तर भाताचे प्रकार. यामध्ये तांदूळ कोणता आहे, हे तर येईलच. याशिवाय वरीचा भात, गव्हाचा भात, ज्वारीचा भात या बाबी पण नोंदवायच्या आहेत. गहू आणि ज्वारीचा भात? होय, तुम्ही बरोवर वाचलात. ज्वारीचा व गव्हाचा देखील भात केला जातो. अनेकांनी खाल्ला देखील असेल. आपल्या वर्षभराच्या खाण्याची यादी बनवली तर ती किती मोठी होईल ? यादीत कोण-कोणते घटक येतील? डाळीचे प्रकार, भाकर किंवा चपाती यामध्ये वापरलेले धान्याचे प्रकार, फळ भाज्या, फुल भाज्या, पाले भाज्या, शेंग भाज्या यांचे प्रकार, चटणी आणि लोणचे, कांदा, लिंबू, सलाड, पापड, मांसाहार करीत असलो तर मटण, चिकन, अंडी आणि मासे यांचे प्रकार, जेवणासोबत आपण घेतो ते पेय, वरकड खाणे, विकतचा खाऊ, इत्यादी घटक ध्यानात घेऊन त्यांच्या प्रकारची ही सर्वसमावेशक यादी असावी. यादी फक्त गेल्या एका वर्षातील खाल्लेल्या गोष्टींची बनवायची आहे.

ही अशीच यादी आपल्या आधीच्या पिढीची ती आपल्या वयाची असतानाची एका वर्षाची बनवायची. म्हणजे साधारण मी ३०-३५ वयोगटामधील असेल तर ५५ ते ६० वय असलेल्या आपल्या घरातील कोणाचेही ते ३०-३५ या वयाचे असतानाचे एका वर्षभरात खाल्लेल्या घटकांची एक यादी बनवायची आहे. यामध्ये अपेक्षित आहे की, तीन पिढ्यांची ही यादी एकत्र करावी. तिन्ही पिढ्यांनी आपल्या वयाच्या कोणत्याही एका टप्प्यावर काय काय खाल्लं? म्हणजे आता जे पंधरा ते वीस वयोगटातील युवक आहेत त्यांच्या खाण्याची एक यादी होऊ शकेल. त्यानंतर आता चाळीसीच्या जवळपास असणारे ते त्यांच्या वयाच्या विशीत काय काय खात होते हे शोधायचे. त्यांच्याकडून आठवून लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर जे साठीच्या पुढे आहेत, त्यांची विशीमध्ये असतानाची जेवणातील घटकांची यादी बनवायची आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील व्यक्तींनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील अशा तीन पिढ्यांचे खाणे तपासले तर खूप इंटरेस्टिंग बाबी समोर येतील. आपल्या खाण्याच्या आवडी निवडी आणि आपल्या परिसरातील शेती, शेतीतील पिके कोणती आहेत? त्यांचा कसा संबंध आहे यातून कळून येईल. इतकेच नाही तर परिसरातील जैवविविधता आणि आपलं खानपान यांचे बहुविध संबंध उलघडून पाहता येईल. मी माझ्या गावातील साठीत असलेल्या गणू येरपुलवार याच्याशी चर्चा केली. तो त्याच्या विशीत असताना काय काय खात होता हे सांगत होता. त्याने भाकरीचे १४ प्रकार खाल्ल्याचे ऐकून खूप आश्चर्य वाटले. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका, वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचा कोंडा टाकून केलेली भाकर, बारीक उंबर ज्वारीच्या पिठात मिसळून, फांजी वेलपाला टाकून केलेली भाजी, आंबड्याची भाजी टाकून केलेली, गहू, उडीद डाळ व बाजरी एकत्र केलेली भाकर असे भाकरीचे प्रकार एक एक आठवून सांगत होता. यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या खाण्यातील जवळपास सर्व घटक हे त्याच्या शेतातील किंवा शेतशिवारातील होते. प्रत्येक अन्न घटकावर त्याच्या घरी किंवा जवळपासच्या गावामध्ये झालेले होते.

आज आपण खातो त्या अन्न पदार्थांचे उत्पन्न कुठे झालेले असते? हे अनेकांना माहिती नसते. शहरातील अनेक अन्न पदार्थ पाकिटातील खाल्ले जातात. पाणी आणि इतर पेय ही देखील लांबवरील शहरात पॅक होऊन आपल्यापर्यंत पोहचतात. नाशिकहून पुण्यात आलेला एका मित्राने पुण्याच्या एका मॉलमधून राजगिरा लाडू खरेदी केले. नाशिकमध्ये परत गेल्यानंतर त्याने पाकिटावर पाहिले. तर ते नाशिकमध्ये तयार झालेले होते. पॅकिंग झालेल्या गोष्टी कुठल्या कुठे पण मिळू शकतील. उलट यातून अनेकांची गैरसोय टाळली जाते. पण आपल्या जेवणात या अशा पॅकिंगमध्ये असलेल्या, दूरवरून आलेल्या घटकांची टक्केवारी किती आहे ? शहराच्या ठिकाणी राहणार्‍या लोकांच्या जेवणातील असे वाढलेले घटक एक वेळ समजू शकतो. मात्र गावागावात जर अशा घटकांचे जेवणातील प्रमाण वाढणे हे तेथील जैवविविधता, अर्थव्यवस्था आणि आरोग्य यासाठी खूप मोठी चिंतेची बाब आहे.
(लेखक पर्यावरण विषयक अभ्यासक आहेत)

लेखक- बसवंत विठाबाई बाबाराव

First Published on: October 12, 2018 1:50 AM
Exit mobile version