स्वखुशीने ठेवलेले विवाहबाह्य संबंधच जेव्हा जाचक बनतात

स्वखुशीने ठेवलेले विवाहबाह्य संबंधच जेव्हा जाचक बनतात

वैदेही (काल्पनिक नाव) स्वतः च्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी आलेली. पतीसोबत असलेले वैवाहिक संबंधांमध्ये कोणत्याही कारणाने कटुता आली किंवा सासरच्या लोकांचा थोडाही त्रास झाला की, अनेकदा महिला माहेरचा रस्ता पकडतात. यामध्ये सुशिक्षित महिलांचे प्रमाण खूप आहे.शक्यतो स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या, नोेकरी करणार्‍या आणि माहेरची आर्थिक परिस्थिती बर्‍यापैकी असणार्‍या महिलांना माहेर हे हक्काचे सेकंड होम असते.अशा महिला ज्यावेळी कोणत्याही कौटुंबिक वैवाहिक समस्यांनी ग्रासल्या जातात तेव्हा त्यांना मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि त्यांचे उच्च शिक्षित आईवडील सुद्धा हाच सल्ला देतात की,तुला काही कमी नाहीये, तू स्वतः कमवून खाऊ शकते, मुलाला मोठं करू शकते, आमचं घर, आमची प्रॉपर्टी यावर तुझा पण हक्क आहेच. त्यामुळे नवर्‍याला आपण चांगला कायदेशीर धडा शिकवू, पैसे गेले तरी चालतील पण त्याला अद्दल घडेल यासाठी सगळे प्रयत्न करू. वैदेहीच्या बाबतीत असाच सल्ला तिला दिला गेला.

नवर्‍याचं घर सोडून, त्याच्या विरुद्ध कोर्टात घटस्फोट आणि खावटीची केस टाकून स्वतः च्या मुलाला घेऊन ती माहेरी आनंदात राहू लागली. थोड्याच अवधीत शिकलेली असल्यामुळे तिला एका खासगी आस्थापनेत नोकरी लागली. आता स्वगृही परतण्याचा कोणताही विचार मनात उरलाच नाही. मुलगा लहान असल्यामुळे आजी आजोबांच्या घरात रुळला. आजोबानी त्याला जवळच प्ले स्कूलला टाकले. सासरच्यांनी पण वैदेहीला परत नांदायला येण्यासाठी फार प्रयत्न केले नाहीत. कोर्टाची प्रक्रिया सुरु होतीच. वैदेहीला कोणतीही आर्थिक उणीव भासत नव्हती.वर्षभरात वैदेहीला मानसिक, भावनिक आणि शारीरिक जवळीक करण्यासाठी सोबत असावी असे वाटू लागले. आयुष्यातल्या बाकी सर्व गरजा उणिवा आई-वडील, नातेवाईक पूर्ण करायला सक्षम होते. पण या गरजांचं काय करायचं? हा यक्ष प्रश्न तिला भेडसावू लागला. पतीमध्ये आणि तिच्यामध्ये आता बर्‍यापैकी अंतर पडलं होत. मुलाच्या आणि कोर्ट केसच्या निमित्ताने थोड्याफार भेटीगाठी, फोन होत होते तेवढंच. कोर्टाची पायरी चढल्यामुळे तिचा इगो सुखावला होता. पण मानसिक, भावनिक, शारीरिक गरज आता शांत बसू देत नव्हती. या परिस्थितीत सुंदर अन् एकट्या स्त्रीला सावरायला कोणी एखादा उदार मनाने पुढे आला नाही असं होणं तर शक्यच नाही. वैदेहीला विजय भेटला आणि ज्या गोष्टींसाठी ती झुरत होती, त्यातून ती बरीच सावरली.

वैदेही मला भेटली. तिला या प्रेमप्रकरणाचा किती भयानक त्रास होत गेला आणि मागील पाच-सहा वर्षांपासून होतोय याबद्दल सांगत होती. वैदेहीच्या म्हणण्यानुसार विजय स्वतः विवाहित असून पत्नी, दोन मुली आणि एकत्रित कुटुंब, स्वतः चा मोठा व्यवसाय, समाजात बरेच नावलौकिक, प्रॉपर्टी, भरपूर नातेसंबंधांमधला होता. वैदेही आणि विजय त्याच्या ऑफिसला भेटायचे. विजयच स्वतःच ऑफिस होत. परंतु, वैदेहीकडे स्वतः ची टू व्हिलर होती आणि मुख्य म्हणजे तिला गरज होती.त्यामुळे वेळोवेळी विजयच्या ऑफिसला भेटायला जाणे, तिथेच सर्व सुख उपभोगणे यात दोघांना खूप आनंद मिळत होता. वैदेही आई वडिलांची एकुलती एक कन्या. तिच्या माहेरी फक्त ती वडील, आई आणि तिचा दोन वर्षाचा मुलगा. त्यामुळे कुठे होती, इतका उशीर का झाला किंवा कोणाला भेटली यावर तिला फार काही मर्यादा नव्हत्या. बर्‍यापैकी स्वछंदी, स्वतंत्र आयुष्य ती जगत होती. स्वतः चा जॉब सुटला की विजयच ऑफिस गाठणं. त्याच्यामूड नुसार त्याने बोलावलं तर ऑफिसला सुटी टाकणं, हाफ डे घेणं,ऑफिसला सुटी असेल तरी घरात सबब सांगून विजयला भेटायला जाणं. वेळप्रसंगी स्वतःच्या लहान मुलाला देखील वेळ न देता विजयच्या तालावर नाचणं,हे वैदेही आवडीने करीत होती. पण आजमितीला तिने मला सांगितले की, मागील 5 वर्षांपासून तीला अनेकदा स्वतःची काम, घरातली जबाबदारी, मुलाची तब्बेत, अभ्यास यात तडजोड करावी लागते आहे. ऑफिसला सारख्या सुट्या होत आहेत.

विजयला दारूचं खूप व्यसन असल्यामुळे तो तिला देखील ड्रिंक घ्यायला लावतो. त्याच्या ऑफिसवर 8-10 तास थांबवतो. त्याला काही फरक पडत नाही. तो सगळ्या बाबतीत सेटल आहे. पण मला खूप आटापिटा करावा लागतोय.त्याच्या ऑफिसला सतत दारू पिऊन, मला जबरदस्ती प्यायला लावणं. मग शारीरिक संबंध आणि रात्री बेरात्री बारा एकला स्वतः या अवस्थेत टू व्हिलरवर घरी पोहचणं हे खूप रिस्की होत आहे माझ्यासाठी. आठवड्यातून चार ते पाच वेळा मला ही कसरत करावी लागते.माझा मुलगा आजारी असो, अथवा घरी ऑफिसमध्ये कितीही तातडीचे काम असो मला विजयला नाही म्हणता येत नाही. मी स्वतः आजारी असले तरी तो समजून घेत नाही. वैदेहीने स्पष्ट संगितले की, ती शारीरिक संबंधांशिवाय राहू शकत नाही. आणि विजय हाच एक पर्याय समोर आहे जो तिची ही गरज पूर्ण करत आहे.मी त्याला नाही म्हटलं तर आमची भांडणं होतात. तो माझ्याशी बोलण बंद करतो किंवा दारू पिल्यावर डायरेक्ट त्याची चारचाकी गाडी घेऊन माझ्या घराजवळ येतो आणि मला बाहेर भेटायला बोलावतो. सारखं मला फोन करत राहतो. विचित्र मेसेज पाठवत राहतो. पाच वर्षात माझी सगळी फॅमिली बॅकग्राऊंड त्याला माहिती झाल्यामुळे त्याला वाटतं हिला विचारणार कोणी नाहीये. नवरा तर सोडलाच आहे, मुलगा लहान आणि आईवडील वयस्कर आहेत. त्यामुळे ही सहज उपलब्ध आहे.हिची काय खासगी नोकरी गेली काय राहिली काय? त्याच्यापासून फक्त प्रचंड दारू पिणे, वेळीअवेळी व्यसन करणे, शारीरिक संबंध ठेवणे, दिवस दिवस त्याच्या ऑफिसला घालवणे इतक्याच गोष्टी मागील 5 वर्षात मिळाल्या आहेत. आता हे रिलेशन मला त्रासदायक होत आहे.

मी खूप वाहवत गेली. माझे उमेदीच्या काळात ना संसार झाला ना करियर झालं. माझा वेळ मी मुलाला, आई-वडीलांना देऊ शकले. आता माझ्या मुलाला माझ्या वेळेची गरज आहे. मला माझ्या करियरला वेळ द्यायचा आहे. चांगली नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.नोकरी करत असल्याने मला पुरुषांचेदेखील फोन येत असतात. दोन दिवसापूर्वी विजयने असाच माझ्या मोबाईलवर मेसेज पाहिला आणि माझ्या भोवती खूप तमाशा केला. माझा फोन त्याने फोडला आणि इथून पुढे कोणत्याही पुरुषाशी बोललेले चालणार नाही असे सांगून मला ताबडतोब नोकरी सोड म्हणतोय.वैदेही रडायला लागली आणि बोलली माझा नवरा सुद्धा कधीच माझ्याशी असं वागला नव्हता. काय करू आता, मला नोकरी सोडायची नाही. पतीकडे पण जाऊ शकत नाही. विजय सातत्याने वैदेहीला हेच सांगायचा की तुला गरज आहे म्हणून मी भेटतोय, तुझ्या शारीरिक गरजा मी पूर्ण करतोय अन्यथा मला माझी बायका पोर आहेत. मी स्वतः पण रिस्क घेतोय ते फक्त तुझ्यासाठीच. तर मग तू माझं ऐकलं पाहिजे. मी म्हणेल तस राहील पाहिजे.

वैदेहीला विजयला सहजासहजी सोडणं पण शक्य होत नव्हतं. या सर्व प्रकरणाचा तिला खूप त्रास होत होता. यावेळी वैदेहीला यातून बाहेर काढण्यासाठी दोन-तीन वेळा भेटणे, समजावणे, तिच्या नवर्‍याला फोन करून परत एकत्र येण्यासाठी त्याचे मत परिवर्तन करणे, वैदेहीला कायदेशीर केसेस मागे घेऊन पतीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पाच वर्षात ती स्वतःसाठी किंवा मुलासाठी खूपच कमी वेळ देऊ शकली होती. वैदेहीच्या नवर्‍याने आणि सासरच्यांनी देखील तिला परत नांदायला येण्यात काही हरकत घेतली नाही. विजयने भविष्यात तिला त्रास देऊ नये आणि दोघांनी सामंजस्य दाखवून एकमेकांना स्पेस द्यावा, आपापल्या संसारात लक्ष घालावे यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आलेले आहेत.

 

 

 

 

 

-मीनाक्षी जगदाळे

First Published on: May 27, 2021 4:08 PM
Exit mobile version