प्लास्टिकची कृत्रिम समस्या

प्लास्टिकची कृत्रिम समस्या

प्रातिनिधिक चित्र

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होऊन अडीच महिने उलटले आहेत. प्लास्टिकच्या कॅरी बॅग्ज बर्‍यापैकी कमी झाल्या आहेत. यामुळे लगेच पर्यावरणात फार मोठा फरक पडणार नाहीच; पण ही एक चांगली सुरुवात आहे हे नक्की. अशाच प्रकारची प्लास्टिकबंदी २००६मध्येही लागू झाली होती. पण तिची अंमलबजावणी कठोरपणे न झाल्यामुळे ते सारेच बारगळले होते. आताची प्लास्टिकबंदी व्यवस्थित मुदत देऊन करण्यात आली आणि अजूनतरी टिकून आहे.

समुद्रांत, नद्यांत, तलावांत, महासागरांत पातळ प्लास्टिकच्या धांदोट्यांमुळे जे काही उत्पात होत आहेत ते नजरेआड करून चालणार नाहीत अशी परिस्थिती आता निश्चितच उद्भवली आहे. आणि ज्या समाजात, ज्या देशात विल्हेवाटीची शिस्त नाही, व्यवस्था नाही तिथे प्लास्टिकबंदीसारखेच नकोसे पाऊल उचलावे लागणार हे स्पष्ट आहे. नकोसे का- प्लास्टिक हे गेल्या दोन शतकातील एक वरदान आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. इतका उपयोगी आणि तितकाच स्वस्त असा माती, धातू, लाकूड यांना पर्यायी पदार्थ ज्यात ‘प्लास्टिसिटी’ म्हणजे ‘हवा तो आकार घेऊन तो तसाच राखण्याची क्षमता’ म्हणजे प्लास्टिकचे विविध अवतार.सुमारे तीन हजार सहाशे वर्षांपूर्वीपासून मेसो अमेरिकन या मानववंशाने नैसर्गिक रबराचा उपयोग सुरू केला. चेंडू, पट्टे किंवा लहानसहान मूर्ती बनवायला त्यांनी रबराचा स्राव वापरला होता. मग तीन हजार वर्षांपूर्वी माणसाच्या वापरात लाख हा नैसर्गिक कीटकांनी केलेला स्राव आला. गायीबैलांची शिंगे ज्या पदार्थापासून बनली जातात त्याचा वापर सुरू झाला. शिंगांवर प्रक्रिया करून खिडक्यांची अर्धपारदर्शक अशी तावदाने वगैरे करायला मध्ययुगात सुरुवात झाली ती युरोपात.एकोणिसाव्या शतकात या पदार्थाबाबत खूप प्रयोग झाले. आत्ताच्या प्लास्टिकच्या खूप जवळ असलेला एक पदार्थ एका जर्मन रसौषधी निर्मात्याने एका नैसर्गिक डिंकातून वेगळा काढला. त्याला स्टिरॉल नाव दिले आणि मग या पदार्थाच्या गुणविशेषांनी प्रभावित झालेले अनेक वैज्ञानिक त्यावर प्रयोग करू लागले.

रबर, स्टिरॉल यावर प्रयोग होत राहिले. स्टिरॉल, पॉलिस्टायरिन विशिष्ट तापमानास गेल्यावर त्यात काय बदल होतात हे पाहिले गेले. सुरुवातीस नैसर्गिक पदार्थांपासून तयार होणारे प्लास्टिक पदार्थ नंतर पूर्णतः रासायनिक क्रियांतून काढण्यात वैज्ञानिकांना यश आले. आणि मग दोन शतकांच्या प्रवासात त्याचे विविध उपयोग करून घ्यायला माणूस सरसावला.स्टिरॉल, पॉलिस्टायरीन वगैरेंचेही जैविक विघटन अगदी सावकाश होते. धातूपेक्षा जलद पण सेल्यूलोजयुक्त लाकूड वगैरेंपेक्षा खूपच सावकाश. पण हा पदार्थ नैसर्गिक स्रोतांपासूनच तयार होत राहिला असता तरीही वेगळ्या प्रकारे पर्यावरणावर प्रभाव पडलाच असता. जे उपयुक्त वाटते ते माणूस वापरतो. जे विनाशकारी वाटू लागते त्यात कालांतराने माणूसच बदल करतो. आजच्या प्लास्टिकबंदीत हेच दिसून येते आहे. पण संपूर्ण प्लास्टिक हा मानवजातीचा, निसर्गाचा शत्रू आहे वगैरे विधाने अविचारी आहेत.प्लास्टिक स्वस्त आहे, उपयुक्त आहे, त्यातून खूप मोठा उद्योग उभा राहिला आहे,

मानवी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला आज प्लास्टिक स्पर्श आहेत. त्यातून तयार होणार्‍या उत्पादनांतून उभा राहिलेला रोजगार हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून प्लास्टिकबंदी करू नये- असे म्हणणेही अर्धवटपणाचेच होईल.माणसाने टाकून दिलेल्या अनेक वस्तू जमिनीत घुसतात किंवा मग पाण्याच्या प्रवाहाबरोबर अंतिमतः महासागराच्या पोटात मुरतात. आज विशेषतः प्लास्टिकच्या कॅरीबॅग्ज, प्लास्टिकपासून तयार झालेली मासेमारीची जाळी महासागराच्या घुसळणीत सापडून त्यांच्या चिंधड्या उडतात. कालपरत्वे त्यांची अगदी बारीक कण महासागराच्या नसानसात जाऊन जणू सगळ्या अभिसरणात एम्बॉलिझम होतो… बारीक कण अडकून रक्तवाहिन्यांत अडथळे होण्याला एम्बॉलिझम म्हणतात- जो जीवघेणा ठरू शकतो. जी गोष्ट विरून जायला कठीण, जिरून जायला कठीण तिचे उपयोग जितके महत्त्वाचे तितकेच तिचे उपद्रवमूल्यही अधिक. नेमके तेच प्लास्टिकच्या बाबतीत होते आहे म्हणूनच काळजी घ्यायला हवी. या सगळ्यातून निष्कर्ष काढणे फारसे कठीण नाही. प्लास्टिकबंदीचे पाऊल उचलावे लागणे मुळात अनावश्यक होते. जी गोष्ट आपल्याला उपयोगी आहे तिची विल्हेवाट लावताना आपण जो बेदरकारपणा दाखवला आहे त्याचेच हे परिणाम आहेत. अजूनही पर्यावरणवादी लोक प्लास्टिकच्या बाटल्या, पॅकबंद अन्नाची पाकिटे, डबे यांवर बंदी नाही म्हणून व्यथित आहेत. आणि त्यावर बंदी येईल की काय या आशंकेने उत्पादक क्षेत्रातील मंडळी व्यथित आहेत. समस्या ही आहे की आपल्याकडे प्लास्टिकच्या कचर्‍याचे व्यवस्थापन शून्य आहे. प्रत्येक भारतीय गावाच्या अलिकडे, पलिकडे आणि मध्यावर एक अस्ताव्यस्त उकिरडा दिसतो.

त्यावर रंगीबेरंगी पिशव्या दिसतात. सर्व रस्त्यांच्या कडांनी पाण्याच्या, पेयांच्या बाटल्या, खादाडीचे चकचकीत प्लास्टिकी रिकामे पुडे दिसतात. यात स्वच्छतेच्या भानाचा अभाव आहेच, पण तेवढेच नाही. या सर्व वस्तू गोळा करण्यासाठी, पुनर्वापर करण्यासाठी व्यवस्थेचाही अभाव आहे. प्लास्टिक ही समस्या नसून योग्य विल्हेवाट नसणे ही समस्या आहे. पुनर्वापर हेच खरे उत्तर आहे. लोकांना ती व्यवस्था उपलब्ध करून द्या, त्याचा काही मोबदला मिळेल असे पहा. कचरा वेचून उपजीविका करणारांनाही त्यात अधिक महत्त्व द्या, त्यांनाही चांगली किंमत देण्याची, रोजगार देण्याची व्यवस्था करा. प्लास्टिसिटी असलेला हा पदार्थ पुन्हा एकदा व्यवस्थित पॉलिमर उत्पादक कारखान्यांत पोहोचला तर नव्याने ग्रॅन्युअल्स करून पुन्हा हव्या त्या रुपात उपलब्ध होऊ शकतो. प्रगत जगात आपल्याला कधीच प्लास्टिकच्या पिशव्यांनी लदबदलेले उकिरडे दिसत नाहीत. लोक रस्तोरस्ती ठेवलेल्या पिंपांत, टाक्यांत त्यात्या अविघटनशील वस्तू टाकतात. काही वस्तूंसाठी त्यांना पैसेही मिळतात. हे करणे फार कठीण नाही. पण बंदी जाहीर करून झाली तरीही प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू गोळा करण्याची कोणतीही यंत्रणा अद्याप दिसत नाही. ती यंत्रणा उभी राहिली तर तोडपाणी करण्यासाठी संधी अशी बंदी आणायची वेळच येणार नाही.

First Published on: September 8, 2018 2:30 AM
Exit mobile version