अक्कल काढणार्‍यांच्या कळपात बायकांचा वावर !

अक्कल काढणार्‍यांच्या कळपात बायकांचा वावर !

भारतात हिंदुत्वश्रेष्ठत्वाची कट्टरता नव्या जोमाने सुरू झाली आहे. या कट्टर उजव्या विचारप्रणालीकडे हक्कांसंबंधी जागृत झालेल्या स्त्रिया जाणार नाहीत हे तर्कसुसंगत आहे. पण अशी तर्कसुसंगती प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. बायकांना राजकारणातली अक्कल नसते म्हणणार्‍या बहुसंख्याकांच्या राजकारणात या स्त्रिया त्या राजकारणाच्या बाजूने तोंडाळ होऊ लागल्या आहेत हा विनोद आहे.

गेल्या शतकात जगभरात स्त्रीहक्क जाणीवा वाढल्या. त्यांची बौद्धिक समानता तत्वतः तरी मान्य होण्याचे प्रमाण वाढले. त्यानुसार वर्तन बदलले असे नाही, अन्याय, असमानता थांबली असेही नाही. पण निदान झेप घेऊ पाहणार्‍या स्त्रियांना, विविध क्षेत्रांत कवाडे खुली झाली. विशेषतः आर्थिकदृष्ठ्या संपन्न असलेल्या वर्गातील स्त्रियांना हे फायदे मिळाले. आणि कष्टकरी वर्गातील स्त्रियांच्या आर्थिक शोषणाला लगाम बसला. कुटुंबसंस्थेत हे सारे फारसे परिणामकारक ठरले असे नाहीच. पण तरीही परिस्थिती बरीच सुधारली. हे विचारात घेता जगभरातील स्त्रियांना या बदलाचे, आणि हा बदल आणणार्‍या उदारमतवादी विचारसरणीचे आभार मानावेसे वाटले पाहिजेत असे गृहीत धराल. दर वेळी सनातनी भूमिकेतून स्त्रियांच्या साध्यासाध्या हक्कांसाठी मोडता घालणार्‍या परंपरागत विचारसरणीला त्या कधीच वश होणार नाहीत असेही गृहीत धराल.

पण तसे दुर्दैवाने नाही. जगातल्या सर्व स्त्रियांना या प्रगतीचे कौतुक वाटले असे नाहीच. सारे बदल आयतेच मिळालेल्या आजच्या अनेक तरूण स्त्रियांना तर आता पूर्वीच्या परिस्थितीकडेच वळण्याचे डोहाळे लागले आहेत असे दिसते. हे होत आहे ही परिस्थिती धक्कादायकच म्हणायची. पण स्त्रिया आपल्या पारतंत्र्यासाठी आग्रही असण्यालासुद्धा इतिहास आहेच.

आज भारतातच नव्हे तर जगभरात-इस्लामिक कट्टरतावाद्यांत, श्वेतवर्णश्रेष्ठतावाद्यांत, म्यानमारच्या बौद्ध कट्टरांतही स्त्रियांनी परंपरागत मूल्यांनुसारच जगायला हवे असा विचार करणार्‍या स्त्रिया उजव्या विचारधारेत क्रियाशील आहेत. स्त्रियांनी चूल-मूल-आणि चर्च या पलिकडे जाऊ नये हा विचार नाझी जर्मनीमध्येही जोरात होता. हिटलरच्या जगात भारी जर्मनीत ज्या स्त्रिया चूलमूलचर्च हे मान्य करत नव्हत्या त्यांना मानसिक रुग्ण ठरवून इस्पितळांत भर्ती करून कोंडून ठेवले जात असे. स्त्रियांनी नाझीवादी पुरुषांच्या सर्व गरजा भागवण्यासाठी सज्ज असावे हा विचार नाझी राष्ट्रवादात चपखल बसत होता. त्यातील काही स्त्रिया खुद्द नाझीसेनेत अधिकारपदावर होत्या, पण त्या मुख्यत्वे त्या शत्रू म्हणजे ज्यू स्त्रियांची वासलात लावण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी, त्यांचे तुरुंग सांभाळण्यासाठी नेमल्या जात असत. आणि त्यात त्यांना रोजगाराबरोबरच स्वतःच्या सक्षमीकरणाचा आभास होऊन समाधान होत असे. पण त्यापलिकडे त्यांच्याकडे अधिकारपदे येत नसत. इटली, स्पेनमधील फॅशिस्ट चळवळींतही हेच चित्र होते.

आज भारतातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, ईश्वरचंद्र विद्यासागर, राममोहन रॉय यांच्यासारख्यांच्या प्रयत्नांनंतर आधुनिक स्त्रीहक्कांची लढाई लढणार्‍या स्त्रियांची मोठी मालिका भारतात झाली. कष्टकरी स्त्रियांचे वेतन, सुट्ट्यांचे हक्क, अन्याय निवारणासाठी न्यायालयीन लढाया लढणार्‍या वकील स्त्रिया, जगण्याची साधने हिरावली जाण्याविरुद्ध लढणार्‍या जनआंदोलनांतील स्त्रिया या सार्‍या त्याच एका लढाईचा गौरवास्पद भाग आहे.

पण प्रतिगामी विचारसरणीने लिंपलेले अनेक पुरुष, मग ते धर्मवादी संघटनांचे असोत की तथाकथित पुरोगामी असोत, स्त्रीमुक्तीचे प्रयत्न म्हणजे काहीतरी केवळ फॅशन किंवा उच्चभ्रू, पैसेवाल्या स्त्रियांचे खेळ असे गैरसमज पसरवण्याच्या मागे झटून प्रयत्न करतात. आणि दुर्दैवाने त्यांच्या होयबाया झालेल्या स्त्रियाही सर्वत्र आहेत. पण पुरोगामीपणाचा स्पर्श सोडाच, प्रतिगामीपणाचाच अभिमान असलेल्यांचे काय? ते या स्त्रीहक्कांचे काय करतील? स्त्रीसमानतेच्या तत्वाचे काय करतील?

भारतात हिंदुत्वश्रेष्ठत्वाची कट्टरता नव्या जोमाने सुरू झाली आहे. या कट्टर उजव्या विचारप्रणालीकडे हक्कांसंबंधी जागृत झालेल्या स्त्रिया जाणार नाहीत हे तर्कसुसंगत आहे. पण अशी तर्कसुसंगती प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. बायकांना राजकारणातली अक्कल नसते म्हणणार्‍या बहुसंख्याकांच्या राजकारणात या स्त्रिया त्या राजकारणाच्या बाजूने तोंडाळ होऊ लागल्या आहेत हा विनोद आहे.

पदव्युत्तर शिक्षणाची बिरुदावली मिरवणार्‍या स्त्रियाही सारासार विचार बाजूला ठेवून केवळ प्राचीन हिंदू परंपरेत जे सांगितले आहे त्यानुसार स्त्रियांनी वागावे हे मान्य करतात. आणि हिंदू धर्माचे अपार गोडवे गाऊन त्यासाठी झेंडेही खांद्यावर घेतात. इस्लाममधील कुराणनिष्ठ अशिक्षित अविचारी महिलांत आणि उच्चशिक्षित अशा हिंदू किंवा ख्रिश्चन महिलांमध्ये गुणात्मक फरक काहीच नाही. कुणी बुरख्यात तर कुणी भारतीय अंगभर कपड्यांत तर कुणी पाश्चात्य पद्धतीच्या अंग उघडे टाकणार्‍या कपड्यांत असतील. विचारांचा तोकडेपणा सर्वत्र सारखाच.

उजव्या कट्टर धर्मवादी किंवा वंशश्रेष्ठतावादी प्रणालींतून सुरू झालेल्या चळवळींत म्हणूनच आपल्याला स्त्रियांचाही सहज वावर दिसतो. इतर धर्मीयांचा द्वेष करणार्‍या हिंसक चळवळींमध्ये स्त्रियांचाही म्हणूनच सहभाग असतो. बहुतेक वेळा अशा संघटनांच्या कार्यपद्धतीत स्त्रियांना दुय्यम स्थान असतेच असते. तरीही त्या तो अधिक्षेप सहन करून तेथे टिकून राहतात.

कू क्लक्स क्लॅनमध्येही स्त्रियांचे प्राबल्य होते. पंधरा लाख स्त्रिया त्या घृणास्पद चळवळीत आत्मसन्मानाच्या विकृत कल्पनांतून सहभागी झाल्या होत्या. त्या संघटनेसाठी सर्व धार्मिक स्वरुपाचे कार्य करत. त्यांचे श्वेत नसलेल्यांविरुद्धचे रक्षाकार्य-व्हिजिलॅन्टिझम-जबरदस्त असे. (आपणही आता येथे संस्कृतीरक्षक स्त्रियांचे मुलामुलींनी एकत्र फिरू नये प्रकारचे रक्षाकार्य अनुभवू लागलो आहोत.) एकंदर संस्कृतीश्रेष्ठत्वाची बोंब मारली की स्त्रिया काय नि पुरुष काय-अविवेकी प्रकारातले सारेच त्यात सामील होतात.

भारतीय जनता पक्षाने, त्यांच्या मातृसंघटनेने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता देशात आपल्या मूल्यसमजाची जोरदार शिंपण केली आहे. परवाच्या विजयानंतर त्यांच्या संस्कृतीश्रेष्ठत्वाच्या अभिनिवेशाचा कलशाध्याय सुरू झाला आहे. आणि त्यात दिसणार्‍या उन्मादात स्त्रियाही सारख्याच हीन अभिरुचीने सामील आहेत हे पाहायला मिळते. या नव्या प्राचीन भारतात स्त्रियांनी आजवर मिळवलेले समान हक्क कसे काय टिकाव धरतील हे पाहायचे आहे. हिंदुत्वाचा बडीवार सांगणार्‍या स्त्रियांना आपले सवयीचे झालेले हक्क गमावणे पटणारे नाही. पण मग त्यांतून काय मार्ग काढला जाईल-ते पाहाणे कदाचित् सुरस कदाचित क्लेशकारक ठरेल.

नपेक्षा या नवप्राचीन स्त्रियांनी प्रगतीच्या वाटांपेक्षा पुरुषसत्ताक व्यवस्थेतील स्त्रीद्वेषी तत्वे अंगिकारली आहेत असे चित्र आकाराला येईल.

उजव्या विचारधारेतील स्त्रिया, त्यांची कार्यपद्धती, कृत्ये हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यास जगभर सुरू आहे. भारतात ही वेळ कधी येईल असे अगदी अलिकडेपर्यंत वाटले नव्हते. माया कोडनानींच्या घटनेनंतर ते बदलले. आणि आता तर ती शक्यता गहिरी झाली आहे. इतिहासाच्या मांडणीसाठी भारतातील उजव्या विचारधारेतील क्रियाशील स्त्रियांच्या कथनांची, मांडणीची आणि कार्यपद्धतीची नोंद करून ठेवावी लागेल.

First Published on: May 26, 2019 4:01 AM
Exit mobile version