ही कसली मदत ?

ही कसली मदत ?

प्रातिनिधिक चित्र

पहिला प्रसंग एका शहरात बसमध्ये घडलेला. माझ्यासारख्या अनेकांसमोर घडलेला. फार काही नवीन नाही, नेहमीच घडत असावा असे वाटणारा. त्या प्रसंगाच्या साक्षी होत्या काही तरुण मुली, बरेच तरुण मुले, काही प्रौढ, काही म्हातारे आणि माझ्या सारखे ‘अभी तो मै जवान हूँ’ असे म्हणणारे काही. वेगवेगळ्या ठिकाणावरून बसमध्ये बसलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी उतरणारे. आमच्या बसमधील एक तरुण मुलगी बरोबरच्या तरुण मुलाबरोबर गप्पा मारत होती, असे आम्ही सर्वांनीच पाहिलेले आणि अचानक तिचा आवाज चढला आणि ती काहीतरी मघापेक्षा जरा जास्त मोठ्याने बोलत होती. तिचा आवाज येत होता, पण ती काय म्हणत होती ते मात्र फार समजत नव्हते. माझ्यासहीत सगळ्यांनीच ती काय म्हणते हे समजावून घेण्यासाठी कान जरा जास्तच तिच्याकडे केले. आम्हाला काही कळायच्या आत गाडीतल्या इतर तरुण पोरांपैकी काहींनी त्या पोराची गचांडी तुमच्या भाषेत कॉलर आमच्या भाषेत गच्ची पकडली आणि त्याला उभे केले.

आम्ही पाहताच होतो आणि काही तरी बोलणार तेवढ्यात त्या सैनिकाने त्या पोराच्या दोन व्यवस्थित लावल्या. तशी ती मुलगी किंचाळली आणि तिनेच त्या पोराची सुटका त्या सैनिकांच्या हातून केली. मग आम्हाला कळले की ती या पोरांवर किंचाळली होती. मी बोलायचा प्रयत्न केला, अग नेमके झाले काय? असे म्हणाले ही, पण मला उत्तर द्यायच्या आत ती आपल्या जागेवरुन उठली, त्या पोराला बरोबर घेतले आणि गाडीतून तणतणत खाली उतरली. सर्वांना ऐकायला जाईल अशा आवाजात म्हणाली, ‘’ह्याला काय अर्थ आहे, काही चौकशी नाही, काही माहिती नाही आणि लगेच मारायला उठतात मदतीच्या नावाखाली.’’  बर्‍याच जणांनी ऐकले ती काय म्हणाली ते. ड्रायव्हर आणि कंडक्टरने मात्र काढता पाय घेतला आणि गाडी पुढेच नेत राहिले. ‘नसती भानगड’ असे काहीतरी कंडक्टर म्हणाला. काहींनी त्याच्या म्हणण्याला मान हालवत दुजोरा दिला. ज्या सैनिकांनी त्या पोराला लगावली होती ते मोठ्या फुशारकीने सगळ्यांकडे पाहत होते. काहींनी डोळ्यातून तर काहींनी स्पष्टपणे बर झाले लगावली अस म्हणत आपला पाठींबा जाहीर केला. मला मात्र तीच वाक्य व्यवस्थित पोहोचले. ती अस का म्हणाली? खरेतर ती अडचणीत होती आणि हा शूर सैनिक तिला बहिणीच्या नात्याने सुरक्षित करत होता तरी ती असे का म्हणाली? माझ्या शेजारी आणखी एक तरुण होऊ पाहणारी किशोरवयीन मुलगी बसली होती. असे म्हणतात ना, जेव्हा एक तज्ञ एखाद्या विषयात अडकतो तेव्हा त्याने किंवा तिने एखाद्या निरागस लेकराचा सल्ला घ्या, प्रश्न लगेच सुटतो. त्या नियमाप्रमाणे मी शेजारचीला म्हणाले, ‘तो मुलगा चांगला त्या मुलीला मदत करत होता तरी तिने मदत घेतली नाही आणि परत त्या त्रास देणार्‍या मुलाबरोबरच निघून गेली, याला काय अर्थ आहे, म्हणून मुलींना, मार खाणार्‍या बायकांना सोडवायला कोणी येत नाही’. माझे वाक्य जेमतेम संपत होते, तर ती मुलगी म्हणाली, बरोबर आहे त्या मुलीचेच, याने कशाला तिने मदत मागायच्या आत दिली. त्याची ही मदत तिला काय भावात पडेल हे तिच्याच जीवाला माहित.

प्रसंग दुसरा. माझ्या सारख्या महिलांवर होणारा हिंसाचार याविषयात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात नेहमीच घडणारा. जेव्हा बायका मार खावूनही पोलीस स्टेशनला न जाता आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, ‘अग एवढा मार खाल्ला आहेस, पोलीस स्टेशनला का नाही गेलीस? म्हणजे गुन्हा नोंदवता आला असता, मेडिकल झाली असती ,इ.इ’. तेव्हा शंभरातील नव्वद बायकांचे हे म्हणणे असते की, बाई पोलिसात गेले तर ऐकूनच घेत नाही, घरगुती भांडण आहे म्हणून हाकलूनच लावतात. पण आम्ही खूपच आग्रह केला किंवा अंगावर मारण्याच्या खुणा असतील तर आम्हाला बसवून ठेवतात, नवर्‍याला उचलून आणतात आणि आम्ही काय सांगतो ते ऐकायच्या आत त्याला मारतात. तो तिथे गप्प ऐकून घेतो, पोलिसांनी सांगितले म्हणून घरी घेवून येतो आणि जेवढे फटके त्याला बसले त्याचा जेवढा राग आला असेल तो जाईपर्यंत आम्हाला मार खावा लागतो. मग काय करतील गं पोलीस? आमचा टिपिकल प्रश्न. ताई, पोलिसांनी आमचा अर्ज लिहून घ्यावा, आम्ही म्हणालो तर गुन्हा दाखल करावा, मारायचे कशाला? ही कसली मदत? आम्ही त्यासाठी तिथे गेलेलोच नसतो. मग आमचे मूळ भांडण रहात बाजूला आणि पोलिसांनी तुझ्यामुळे मला मारलं, घराण्याची इज्जत गेली, सर्वांसमोर मला मार बसवला, असे म्हणत आम्हाला मार खावा लागतो आणि बर्‍याच जणींना तर आयुष्य माहेरीच काढावे लागले, कारण त्या नवर्‍याने अशा मार खाण्यामुळे तिला नेलेच नाही.

कुठल्याही दुर्बल व्यक्तीला जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती मारते, तेव्हा त्यामागे नियंत्रण मिळवणे, ताबा ठेवणे, मार खाणारी व्यक्ती कुठल्यातरी अर्थाने कमकुवत किंवा अशक्त आहे, म्हणूनच मारणारी व्यक्ती तिला मारत असते हे आधी आपण समजावून घेतले पाहिजे. त्यात आपल्याला मदत करायची इच्छा असेल तर त्या प्रसंगात तिचा मार वाचवावा, त्यात हस्तक्षेप करावा. त्याऐवजी आपण जेव्हा मारतो तेव्हा आपणही तोच सबळ- दुर्बळाचा सिद्धांत पुढे घेवून जातो हे आपल्याला लक्षातच येत नाही. बुद्ध खूप छान म्हणतो, ‘हिंसाचाराचे उत्तर हे हिंसाचार असू शकत नाही’. खरे त्यासाठी ती अंगुलीमालाची गोष्ट असावी किंवा मला तरी त्यातून तोच संदेश मिळतो. बुद्ध जादूगार नव्हते तर त्यांचा अहिंसेवर विश्वास होता हेच त्यातून दिसते. विज्ञानापासून तर निसर्गापर्यंत सर्वांनीच या मदतीच्या भावनेसाठी अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, पण लक्षात कोण ठेवेल. उदा. आपण शाळेत असताना शिकलेलो आहे की, जेव्हा सुरवंटातून फुलपाखरु बाहेर पडत असते तेव्हा तो जो कोष असतो तो त्याचा त्याला भेदू द्या, तुम्ही त्याला मदत करायला जाऊ नका, तुमची मदत कदाचित त्याला कमकुवत बनवेल आणि त्याचा अकाली मृत्यू होईल. मोठे झालो कामाला लागलो तेव्हा आपल्याला शिकवले गेले की जर एखाद्याला मदत करायची असेल तर त्याला भाकर देण्यापेक्षा ती कशी मिळवावी याचे शास्त्र शिकवा. आठवतय ना, ‘मासे देण्यापेक्षा मासेमारी करायला शिकवा’ इ.इ. आता एवढी कथा सांगितल्यावर तुम्ही उठसूठ कोणाला मारणार नाही, मदतीच्या नावाखाली. जोपर्यंत कोणी आपल्याला मदत मागत नाही तोपर्यंत याचा अर्थ मदत मागणारी किंवा मागणारा तुम्हाला लेखी अर्ज करेल याची वाट पाहा असे मी म्हणत नाहीये बर का? मी एवढेच म्हणते आहे की योग्य ती मदत करा. आपल्या मदतीला कोणी, ‘ही काय मदत झाली’ असे म्हणू नये एवढी काळजी घ्या बुवा, एवढेच आजपुरते.


लेखिका स्त्री-पुरूष संबंधविषयक अभ्यासिका आहेत

First Published on: August 28, 2018 2:00 AM
Exit mobile version