महिला सक्षमीकरण कोणाच्या फायद्याचे?

महिला सक्षमीकरण कोणाच्या फायद्याचे?

सामाजिक परिवर्तन कायदे लादून होत नाही आणि कुठलाही समाज रुढी व परंपरांच्या जोखडातून सहजगत्या मुक्त होत नाही. श्रद्धा व समजुतींना धक्केे द्यावेच लागत असतात. पण ते अतिशय गंभीर स्वरूपाचे काम असून, त्यात अनेक सुधारकांचे आयुष्य खर्ची पडलेले आहे. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्याबाबत काही महिला समाजसुधारकांनी पुढाकार घेतला असला तरी त्यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण होतो. त्यांना खरंच सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे की, आपल्यावर प्रसिद्धीचा झोत ओढवून घ्यायचा आहे, अशी शंका येते. महिला सक्षमीकरणाबाबत सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांचे नाव अगत्याने घेतले जाते. पण त्यांनी कधी कोर्टात जाऊन वा पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन चिलखती चळवळी चालविल्या नव्हत्या. जैसे थे वादी वा समाजाला ओलिस ठेवणार्‍या प्रस्थापित वर्गाला आव्हान देताना, सामान्य जनतेला विश्वासात घेण्याचे कष्ट उपसले होते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले तमाशे केलेले नव्हते. ज्यांची कुठल्याही देवावर किंवा अय्यप्पावर श्रद्धाच नाही, त्यांचे पोरखेळ चालवण्याने परिवर्तनाचे एकही पाऊल पुढे पडत नसते. जी काही महिला मुक्तीची चळवळ अनेक पिढ्या चालली आहे, त्याला असले तमाशे बाधा आणत असतात.

या नास्तिक व चळवळ्यांनी शबरीमला प्रकरणात पुराणमतवादी बाजू भक्कम व्हायला मात्र हातभार लावला आहे. त्यांच्या छछोर वागण्यातून जे कोणी अंधश्रद्ध असतील, त्यांच्या समजुती जास्त घट्ट झाल्या. ज्यांना सुधारणा हव्या असतात, त्यांच्याही मनात शंका निर्माण केल्या. चळवळी व परिवर्तनाच्या हेतूविषयी संशय उभा केला. आपल्या कालबाह्य परंपरा वा रुढी किती योग्य आहेत व अभेद्य आहेत, असा विश्वास त्या सामान्य भक्तांमध्ये निर्माण व्हायला आजच्या इतकी चालना यापूर्वी कधी मिळाली नसेल. समाज सुधारणा वा परिवर्तनाची चळवळ ही थिल्लर करून टाकली आहे अशा दिवाळखोरांनी. कारण या प्रवेशाला विरोध करण्यासाठी अय्यप्पाच्या खर्‍याखुर्‍या महिला भक्तांनी पुढाकार घेतला आहे आणि परिवर्तन तर त्याच महिलांसाठी घडवून आणायचे होते ना?

जगाच्या आरंभापासून म्हणजे बाबा आदमच्या जमान्यापासून महिलांचे शोषण चालू आहे. चित्रपटसृष्टीत आज नाही फार पूर्वीपासूनच महिलांचे लैंगिक शोषण सुरू आहे, बलात्कारही होतात. पण इतरत्र जसे बलात्कारीतेला वार्‍यावर सोडून दिले जाते, तसा इथे चित्रसृष्टीत अन्याय होत नाही. तिला शोषणानंतर रोजीरोटी वा संधी तरी नक्की मिळते, असे विधान मध्यंतरी नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी केले होते. तर तिलाच बलात्काराची समर्थक ठरवून आरोप सुरू झाले. तिने चित्रसृष्टी व अन्यत्रचे शोषण यातला फरक कथन केला होता. त्याचे समर्थन केलेले नाही; पण मुद्दा सत्यकथनाचा होता. अर्थात सरोज खान तितकेच बोललेली नाही. तिने पुरूषी प्राबल्य असलेल्या आजच्या जगातील प्रत्येक क्षेत्रात मुलींचे शोषण कसे होत असते, त्याचा हिडीस चेहरा स्पष्टपणे मांडलेला आहे. त्याकडे साफ पाठ फिरवण्यात आलेली आहे. ‘आयुष्यात कुठे ना कुठे मुलीवर पुरूष हात साफ करून घेतोच’, हे सरोज खानने सांगितलेले सर्वात दाहक सत्य आहे.

त्याविषयी सगळे संस्कृतीरक्षक गप्प आहेत. प्रत्येक मुलीला बलात्कार वा लैंगिक शोषणाचेच बळी होण्याची गरज नसते. विविध प्रकारे तिच्या शरीराचे व अब्रुचे लचके तोडायला टपलेली श्वापदे चहुकडे पसरलेली असतात. कुणी गोड बोलून तर कोणी जबरदस्ती करून तिचे शोषण करीतच असतो. थोडक्यात सरोज खान हिने दुखर्‍या वास्तवावर बोट ठेवलेले आहे. जितक्या आवेशात आज महिलांच्या शोषणाचा गवगवा केला जात आहे, ते जणू नव्यानेच सुरू झाल्याचा आव आणू नका. आपल्या आसपास कुठल्या तरी स्वरूपात गरजू वा दुबळ्या मुली महिलांचे लैंगिक शोषण चाललेले आहे आणि तिकडे बघूनही कानाडोळा केला जात असतो. तो कानाडोळा वा दुर्लक्ष करणारेच मग आवेशात येऊन महिलांच्या न्यायाच्या गप्पा करीत असतात.

वेश्या व्यवसाय किंवा देहविक्रय हा जगातला सर्वात जुना व पहिला धंदा असल्याचे नेहमी बोलले जाते. तो व्यवसाय होऊ शकला. कारण पुरूषाची सैतानी अमानुष लैंगिक भूक हेच आहे. म्हणून तर कुठल्याही समाजात घरातून महिलांना सार्वजनिक जीवनात वावरण्यावर निर्बंध होते. त्याला महिला जबाबदार नव्हती, तर महिलेला भरीस घालून, आमिष दाखवून किंवा विश्वासघाताने तिचे शोषण पुरूष करणार, याची प्रत्येक पुरूषप्रधान समाजाला खात्री होती. पण या समाजातील धुरीण पुरूषांनी कधी स्वत:ला वेसण घालण्याचे नियम बनवले नाहीत. तर महिलांनाच भिंतीआड कोंडून ठेवण्याचे नियम बनवले. योनीशुचिता हे पावित्र्याचे प्रतिक बनवले. तिच्या गळ्यात मंगळसुत्र अडकवले. वास्तवात ह्या पावित्र्याला धोका कायम पुरूषापासून राहिलेला आहे आणि ते उघड्या डोळ्यांनी यातला प्रत्येक विद्वान बघत आला आहे. त्यापैकी कोणी याची जाहीर कबुली देणार नाही. कारण यापैकी अनेकजण स्वत:च असल्या अनैतिक कर्मात गुंतलेले असतात. सार्वजनिक जीवनात आलेल्या महिलांचे कर्तृत्व किती मोजले जाते? त्यांच्या गुणवत्तेला किती संधी मिळू शकते? कुठल्याही क्षेत्रात गेलात तर गुणवत्ता व कर्तृत्व बाजूला ठेवून, त्या महिलेच्या देहाकडेच बघितले जात असते.

तिच्याकडून प्रभावी कार्य यापेक्षा लैंगिक अपेक्षा केल्या जात असतात. याची साक्ष आज जगभरच्या पुढारलेल्या सुसंस्कृत देशातल्या अनेक महिला उघडपणे देत आहेत. त्यात कलावंत, साहित्यिक, राजकारणी महिलांचाही समावेश आहे. हे जर अत्यंत उच्चभ्रू, सुशिक्षित व अभिजन वर्गात होत असेल, तर खेडोपाडी केवळ जगण्यासाठी धडपड करणार्‍या वर्गातल्या मुली-महिलांची काय अवस्था असेल? स्त्रीवादी सुधारणा त्या क्षेत्रातून होण्याची गरज आहे. आपल्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी कोणीतरी झटतंय, याची जाणीव महिलांना व्हायला हवी. ती झाली तर महिलाच अशा सुधारणावादी समाजधुरिणांच्या मागे उभ्या रहातील. मग देवळातील महिला प्रवेशासाठी कोणाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही की, कोर्टात जावे लागणार नाही. अर्थात त्यासाठी महिलांच्या श्रद्धा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या त्याचा अभाव दिसून येतोय. मग महिला सक्षमीकरणासाठी महिला तयार होतील का?

सानिया भालेराव

First Published on: November 27, 2018 5:20 AM
Exit mobile version