जागतिक स्वयंचलित वाहन दिन

जागतिक स्वयंचलित वाहन दिन

नैऋत्य जर्मनीतील मॅन्हम शहरात राहणारे उद्योजक-अभियंता कार्ल बेंझ यांना त्यांच्या स्वयंचलित मोटारवाहनासाठी १८८६ साली पेटंट देण्यात आले. म्हणजे एकप्रकारे 29 जानेवारी 1886 रोजी गाडीचा जन्म झाला. तोवर जगभरात फक्त घोडागाडी, टांगा किंवा बैलगाड्यांसारखी वाहने पाहायला मिळायची. म्हणून इथे स्वयंचलित हा शब्द महत्त्वाचा ठरतो. कार्ल बेंझ यांचे स्वयंचलित वाहन अगदी साधेसुधे. ते दिसायला टांग्यासारखेच होते. एक आसनी, लाकडी फ्रेम, लाकडी चाके वगैरे. मात्र, त्याच्या पुढे घोडे नव्हते आणि मागे एक चुक-चुक असे आवाज करणारे, धूर सोडणारे दोन हॉर्सपावरचे इंजिन होते. 29 जानेवारीनंतर लगेचच जगभरातल्या रस्त्यांवर ती गाडी काही दिसू शकली नाही. कार्ल बेंझ यांना वाटायचे की या गाडीवर अद्याप बरेच काम करण्याची गरज आहे, ती कुठल्याही रस्त्यावर प्रवाशांसाठी सुरक्षित नाही. त्यांची पत्नी बर्था बेंझ मात्र अस्वस्थ होत होती. त्यांच्या लग्नात आलेला हुंडा तिने तिच्या पतीच्या व्यवसायात घातला होता. कार्ल मात्र बराच वेळ घेत होते.

बर्थाला वाटत होते की ही गाडी अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे तो दोन मुलांना घेऊन पतीच्या नकळत तिच्या माहेरी फॉर्झएमला जायला निघाली. या राऊंड ट्रिपचे एकूण अंतर होते 194 किलोमीटर. ती मोटरवॅगन-3 या गाडीवर बसली आणि तिच्या दोन मुलांनी सुरुवातीला ते चाक फिरवून गाडी सुरू करून दिली. मग सुरू झाला हा खडतर प्रवास. ना धड रस्ते, ना गाडीला कुठले शॉकअप आणि सारेकाही लाकडी आणि खिळखिळे आणि सीटबेल्टच्या जन्माला अजून शतकभराचा अवधी होताच. त्यामुळे हा प्रवास, जरी माहेरच्या दिशेने होता, तरी बर्थासाठी काही सुखद अनुभव नक्कीच नव्हता. वाटेत अनेक आव्हाने आली, इंजिन बिघडले, एखादा वॉल्व तुटला आणि कधी इंधनच संपले. मात्र, तिने यासाठी जिथे असेल, तसा जुगाड करत आपले मार्गक्रमण सुरूच ठेवले.

अखेर बर्था फॉर्झएमला पोहोचली, माहेरी काही काळ विसावली आणि परतीचा प्रवास त्याच वाटेवरून सुरू केला. नवर्‍याच्या नकळत तिने केलेला हा प्रवास आज मानवजातीसाठी अक्षरशः मैलाचा दगड ठरला. कार्ल बेंझ स्वगृही परतले तेव्हा त्यांना यावर आधी विश्वास बसला नाही. मात्र, तोवर त्यांचा हा आविष्कार त्यांच्या गॅरेज आणि पेटंट ऑफीसपलीकडे पोहोचला होता आणि आता त्यांच्या ‘मोटरवॅगन’ची चर्चा पंचक्रोशीत होत होती.

‘गाडीचा शोध एकट्या कार्ल बेंझ यांनी लावला नाही, ही कार्ल आणि बर्था यांची टीम होती. त्या दोघांनीही मोटरवॅगनसाठी एकत्र खूप मेहनत घेतली, असे एडजार मेयर म्हणाले. त्यांनी बर्था यांनी घेतलेल्या त्या रस्त्यावरूनच एक थीम ड्राईव्ह बर्था बेंझ यांच्या स्मरणार्थ सुरू केली. बर्था यांच्या एका धाडसी निर्णयामुळे जर्मनीचे नाव जगाच्या पाठीवर वाहनांची राजधानी म्हणून नोंदवले गेले. खरेतर बर्था यांच्याच त्या धाडसी निर्णयामुळे आज जर्मनीचे नाव जागतिक वाहन उद्योगात अग्रस्थानी आहे. आजही जगभरातले सर्वांत शक्तिशाली आणि आलिशान ब्रॅँड्स जर्मनीचे आहेत. एवढेच नव्हे तर अलीकडच्या काळात होऊ घातलेल्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीतही जगाच्या नजरा अमेरिकेनंतर चीन आणि जर्मनीकडेच आहेत.

First Published on: January 28, 2021 7:22 PM
Exit mobile version