जागतिक हेपटायटीस दिन

जागतिक हेपटायटीस दिन

जागतिक कावीळ दिन 

हेपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून पाळला जातो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती यला मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधे म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचे समोर आले आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधे वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो. पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत.

पावसाळा सुरू झाल्यावर दुषित पाण्याचे प्रमाण वाढते आणि हे पाणी शरीरात गेल्यावर कावीळचे रुग्ण वाढू लागतात. कावीळसाठी झाडपाल्याच्या औषधांकडे लोकांचा झुकता कल आहे. हेपटायटीस (कावीळ ) म्हणजे लिव्हरला आलेली सू असते. हेपटायटीस ए, हेपटायटीस बी, हेपटायटीस सी, हेपटायटीस ई हे त्याचे सर्वसाधारण प्रकार आहेत. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. ते यकृतावर हल्ला करतात आणि आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. यामध्ये रुग्णाला थकवा आणि ताप येतो. डोळे पिवळे होतात आणि लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. काविळचे निदान लवकरात लवकर होणं आवश्यक असते.

जगातील २ अब्ज लोक कावीळने ग्रस्त

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, आतापर्यंत जगातील २ अब्ज लोक काविळीने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी ७ लाख लोक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. हेपेटायटिसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. मुंबईत ‘ए’ आणि ‘ई’ प्रकारच्या काविळीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या काविळीच्या व्हायरसचा दूषित पाण्यातून प्रसार होतो, असे गेल्या १० वर्षाच्या निरीक्षणांमधून सिद्ध झाले आहे.

First Published on: July 27, 2020 5:01 PM
Exit mobile version