मीच तुझा व्हॅलेंटाईन

मीच तुझा व्हॅलेंटाईन

24 डिसेंबर 1993 साली शाहरुख खानच्या सुपर डुपर झालेल्या डर या चित्रपटातही हेच दाखवण्यात आलं होतं. दोन दिवसातच चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली. किरण नावाच्या तरुणीवर वेड्यासारखे एकतर्फी प्रेम करणार्‍या राहुल या पात्राभोवतीच हा संपूर्ण चित्रपट फिरत होता. क क क किरण म्हणत तो अचानक तिच्यासमोर प्रकट होतो. दात विचकत विचित्र हावभाव करत तू माझीच असं म्हणत तो तिच्यावर हक्क बजावू पाहतो. तिच्यापर्यंत पोहचता येत नसल्याने फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी तिला ब्लँक कॉल करून तिचा मानसिक छळ करतो, पण आपण तिला त्रास देतोय हे त्याच्या ध्यानीमनीही नसते. माझं तिच्यावर प्रेम आहे. म्हणून ती माझीच आहे. एवढंच त्याला माहीत असतं. तिच्यासाठी जीव द्यायला आणि जीव घ्यायलाही तयार असणार्‍या या राहुलने त्यावेळी बॉलीवूडमध्ये तुफान आणलं. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी शाहरुखला बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्डही मिळाले, पण खरं तर हे अवॉर्ड शाहरुखच्या अभिनयाला होतं की त्याने साकारलेल्या त्या माथेफिरू राहुलला होतं हा प्रश्न आजही मला पडतो.

कारण हल्ली अशाच एका माथेफिरू कबीर सिंग नावाच्या पात्रालाही लोकांनी डोक्यावर घेतलेलं पाहिलं. हुशार डॉक्टर असलेला हा कबीर सिंग आणि त्याचं विक्षिप्त हिडीस प्रेम आजच्या तरुणाईला इतकं भावलं की त्यांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेत कबीरची भूमिका सादर करणार्‍या शाहीद कपूरला कधी नाही त्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन ठेवलं. काय म्हणायचं या मानसिकतेला. आपल्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार कोणाला नको असतो, पण जर तो डर मधल्या राहुल सारखा किंवा कबीर सिंग सारखा असेल तर. मग अशा पात्राला हिट करायचं की फ्लॉप हे ज्याने त्याने आपलं ठरवायचंय. सोशल मीडियाच जर अशी पात्रं रंगवून समाजासमोर दाखवत असेल तर विकृत मानसिकतेच्या खुराकात ती भरच आहे, असे म्हणायला काय हरकत आहे.

आपल्या आजुबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मानसिकतेवर पगडा असतो असं म्हणतात. यामुळे अशा व्यक्तिरेखांना नको तेवढी प्रसिद्धी देणं थांबवायला हवे. कारण समाज त्याच गोष्टींचं अनुकरण करतो ज्याचा चांगला वाईट परिणाम समाजावर होतो. यातूनच मग विकृत मानसिकता वाढीस लागते. हा सगळा उहापोह मांडायचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेले एकतर्फी किंवा ब्रेकअपमधून सुरू असलेली सूडनाट्य, जळीतकांडासारख्या अमानुष घटना. जिथे संबंधित व्यक्तीवर जीवापाड प्रेम करण्याचा दावा करणारी व्यक्ती दुसरी व्यक्ती आपल्या हातातून जात आहे किंवा आपली कधीच होणार नाहीये याची खात्री झाल्यानंतर त्याच्या जीवावर ऊठते.

नागपूरमधील हिंगणघाट जळीतकांडाने पुन्हा एकदा ही बाब समाजासमोर आणली. प्राध्यापिका असलेल्या या तरुणीच्या मागे गावातील एक तरुण लागला होता. तो विवाहित होता. एका मुलीचा बापही, पण तरीही त्याचा जीव त्या प्राध्यापिका असलेल्या तरुणीवर जडला होता. तो तिचा सतत पाठलाग करायचा. तरुणीने त्याला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्नही केला, पण तो हट्टाला पेटला होता. त्याने तिचा ध्यासच घेतला होता, पण तरुणी ऐकण्यास तयार नव्हती. तिच्याकडून मिळणारा सततचा नकार त्याला डिवचत होता. त्यातूनच मग त्याने भररस्त्यात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तिला विद्रुप करायचा उद्देश होता. जीवे मारण्याचा नाही असेही त्याने सांगितले, पण सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर पीडित तरुणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.

सध्या तरी आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या. सोलापूर येथे अनैतिक संबंधातून एका विवाहित पुरुषाने शरीरसंबंधास नकार दिल्याने विवाहित महिलेला तिच्या घरात घुसून जिवंत जाळण्यात आलं.

घरात घुसून पेटवले, तर कुठे विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली, तर काही महिन्यांपूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणावर अ‍ॅसिड किंवा पेट्रोल फेकल्याच्या घटनाही घडल्याचे दिसून येते.

थोडसं मागे वळून बघितलं की लक्षात येतं की एकतर्फी प्रेमातून हत्येसारख्या घटना घडणं हे नवीन नसून हे सत्र जुनच आहे. फक्त ते समाजासमोर येत नव्हतं आणि आता मात्र सोशल मीडियामुळे या घटना समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान याला कारणं जरी अनेक असली तरी सजग पालक म्हणून जेव्हा आपण या घटनांकडे बघतो तेव्हा मात्र मुलांची चिंता वाटायला लागते. बाहेरच्या जगात नव्याने प्रवेश करणार्‍या या तरुणाईची प्रेमाची व्याख्या काय असा प्रश्न पडतो. कारण एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या भयावह घटनांमध्ये बर्‍याचवेळा त्यातील एक जण दुसर्‍याशी मित्र किंवा मैत्रीण समजून मोकळेपणाने गप्पा मारत असते. हॉटेलिंग करत असते, पण समोरची व्यक्ती जर यालाच प्रेम समजत असेल तर काय करावं. पमीच्या बाबतीतही तेच घडतंय. मित्राला ती आवडतेय, पण ती त्याला मित्र समजते. यामुळे त्याला वाईट वाटू नये म्हणून त्याला स्पष्ट नकारही देताना शंभरवेळा त्याच्या मनाचा विचार करते, पण यादरम्यान समोरच्या व्यक्तीचा तिचे किंवा त्याचे आपल्यावर प्रेम आहे हा गैरसमज वाढीस लागतो.

कारण समोरून त्याच्याबरोबर बोलण्यास नकारही नसतो आणि फार होकारही नसतो. मात्र, याच काळात समोरच्या व्यक्तीच्या मनात त्याच्याबद्दल जागा तयार होत जाते. आपण जे बोलतो ते ऐकूण घेणारी,खुल्या दिलाने आपल्याशी गप्पा मारणारी मैत्रीण ही माझीच. हेच माझं प्रेम अशा भ्रामक कल्पना मग तरुण रंगवायला लागतात, पण ज्यावेळी तिच्याबरोबर दुसर्‍या तरुण किंवा तरुणीचे प्रेमसंबंध असल्याचे त्यांना समजते. तेव्हा मात्र त्यांच्यातील अहंकाराला ठेच पोहचते. त्यातूनच मग तिला किंवा त्याला जन्माची अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला जातो आणि हत्या किंवा आत्महत्या सारख्या सूडघटना घडतात. यामुळे पालक म्हणून मुलांशी मोकळेपणाने बोलताना त्यांच्याकडून त्यांच्या मित्रमैत्रिणींची माहिती काढत रहावी.

जेणेकरून ज्या गोष्टी मुलांच्या लक्षात येत नाहीयेत ते पालक म्हणून आपल्या लक्षात येतील. काही दिवसांपूर्वी आम्ही काही मैत्रिणी भेटलो होतो. त्यावेळी एकीने तिच्या मुलीच्या लग्नाबद्दल सांगितलं आणि आम्ही उडालो. कारण मुलीचे वय अवघे 19 वर्ष आहे. इतक्या लवकर लग्न असा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की एक मुलगा शाळेपासून तिच्या मागे होता. खूप त्रास द्यायचा. अनेकवेळा पोलीस तक्रारही केली त्याची. नंतर त्याने तिचा पिच्छा सोडला, पण आजही तो आमच्याच कॉलनीत राहतो. उगाच भीती वाटत राहते. म्हणून चांगलं स्थळ आल्याने आता साखरपुडा व वर्षभरानंतर लग्न ठरवून टाकल्याचं तिने सांगितले. किती ही दहशत. तिला आम्ही समजावलंय.बघूया काय करते ती. तो मुलगा काही आता तिच्या मुलीच्या मागे नाही, पण मैत्रिणीच्या मनात भीती बसली आहे. अशावेळी जर पालकच एवढे घाबरत असतील तर मुलीने काय करावं. हा प्रश्न उभा राहतो.

यासाठी सुरुवातीपासूनच मुला व मुलींबरोबर पालकांनी मोकळा संवाद साधणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. जेणेकरून आपले खरे मित्र कोण व मित्राचा मुखवटा घालणारे विकृत कोण ते मुलांना वेळीच लक्षात येईल व ते सावध होतील. याच पार्श्वभूमीवर पमीशी मी संवाद साधला तिला विचारलं काय केलंस दुसर्‍या बुकेचं. तशी ती म्हणाली फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलाय. फेकणार होते, पण त्या मित्राने सांगितले माझ्या बुकेचं काय केलंस ते दाखवण्यासाठी फोटो पाठव. मी कपाळाला हात मारला. अग मूर्ख मुली कशाला त्याला एंटरटेन करतेयस. असं विचारल्यावर पमीने अगदी कूल उत्तर दिलं. मावशी जाऊ दे गं. एवढा विचार नको करूस. पमीचे हे उत्तर सध्या बेफिकीरीचे जरी असले तरी मी तिला सावध राहण्याचा सल्ला दिला. कारण हाच सध्या कूल वाटणारा मित्र कधी वेगळं रूप धारण करेल हे सांगता येत नाही.

असाच संवाद जर पालकांनी त्यांच्या मुलांबरोबर ठेवला तर कदाचित या घटना रोखता येतील. कारण पौगंडावस्थेतच तर मुलांची मानसिक जडण घडण होत असते. त्यांच्या मनात विचारांचं काहूर सुरू असते. कारण शारीरिक व मानसिक बदल होत असतात. हार्मोन्स विकसित होत असतात. जे त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देत असतात. याच वयात त्यांच्या मनाचा ठाव घेण्यास सुरुवात करता त्यांचे विचार कळायला लागतात. मूल कुठल्या परिस्थितीत काय विचार करेल, हे पालक म्हणून एकदा कळालं की मग त्याच्या मनातली तगमग कळणं सोप असंत. प्रेम, एकतर्फी प्रेम, शत्रुत्व, मत्सर हे सगळे याच वयात आकार घेतात.

यामुळे मुलं चुकीच्या दिशेने विचार करत असल्याचे लक्षात येताच त्यांना सावरणं सोपं जाईल. पालक म्हणूनही आणि समाज म्हणूनही. कारण उद्याचा समाज याच मुलांवर उभा राहणार आहे. यातीलच अनेक मुलं उद्या प्रेमात पडतील. त्यातीलही काहीजण एकतर्फी प्रेम करतील, पण जर त्यांना प्रेमाची व्याख्या आधीच माहिती असेल तर त्यांचं प्रेम विकृती तरी धारण करणार नाही आणि नाहक कोणाचा जीवही जाणार नाही. मीच तुझा व्हॅलेंटाईन अशी प्रेमाची जबरदस्ती तरी कोणी करणार नाही.

First Published on: February 16, 2020 6:03 AM
Exit mobile version