ये रे घना,ये रे घना!

ये रे घना,ये रे घना!

आशाताई

तापलेल्या ग्रीष्म ऋतूत दिसेनाशा झालेल्या घनाची आर्त आळवणी करणारे आशाताईंचे ते सूर मनातल्या मनात कालवाकालव करून जायचे. ‘ये रे घना, ये रे घना’ म्हणून झाल्यानंतर ‘न्हाऊ घाल माझ्या मना’ या ओळीच्या वेळी आशाताईंच्या आवाजातली ती करूणा खूप खोल खोल गडद व्हायची. माझ्या कोरड पडलेल्या मनाला चिंब कर, ही विनवणी आपल्या मनाच्या पायथ्याशी पोहोचायची.

उन्हाळा फारच डोक्यावर आलेला आहे. गुलमोहर बहरल्याचं मधूनच दृष्टीला पडतंय. अंगाची काहिली होतेय. बाहेर भाजून काढणार्‍या उन्हात अपरिहार्यपणे जावं लागलंच तर नको वाटतंय. यंदा फारच उकडतंय बुवा, हे दरवर्षीचं पालुपद कुणाच्या ना कुणाच्या तोंडून ऐकू येतंय. आपणही घरात पंखा फास्ट लावून हवा घेत बसलोय. खिडकीतून बाहेर पाहिलं तर वडापिंपळाची झाडं मुक्याने उभी आहेत. त्यांची पानंही निश्चल आहेत. जराही हलताना दिसत नाहीत. कारण बाहेर हवा नाही. हवेची साधी झुळूक नाही. माझ्या लहानपणी उन्हाचं असं पिवळंजर्द वातावरण असायचं तेव्हा रेडिओवरच्या कामगार सभा किंवा वनिता मंडळाच्या कार्यक्रमात एक गाणं हटकून लागायचं…आणि ते असायचं, ‘ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना!’

त्या एका विशिष्ट काळात कृष्णधवल टीव्हीही नव्हता. कदाचित जॉन लागी बेअर्ड नावाच्या माणसाचा टीव्हीचा शोध पूर्ण झालेला नसावा. त्यामुळे मनोरंजनाचं साधन म्हणून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतं ते म्हणजे रेडिओ…आणि या उन्हाळ्याच्या काहिलीच्या दिवसांत तोच मनोरंजनासाठी हात जोडून उभा असायचा आणि उन्हाळ्यातल्या या तृषार्त दिवसांत हमखास ‘ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ हे गाणं ऐकवायचा.

आजुबाजूच्या भाजून काढणार्‍या उन्हात हे गाणं जेव्हा कानावर पडायचं तेव्हा त्या गाण्याचे सूर होरपळलेल्या मनाला खरंच सुखद दिलासा देऊन जायचे. गाणं सुरू होताना जे किंचित गूढगंभीर संगीत सुरू व्हायचं तेव्हाच हे गाणं सुरू होणार याचे गोड संकेत मिळायचे…आणि पुढच्या काही सेकंदांतच ‘ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ हे आशा भोसलेंच्या खर्जातल्या आवाजात गाणं सुरू व्हायचं तेव्हा तनामनावर ते पसरून जायचं. आशाताईंचं त्या गाण्यात आकंठ बुडून जाणं रेडिओवरच्या त्या गाण्यात स्पष्टपणे दिसायचं. खरं सांगायचं तर आशाताईंच्या त्या आकंठ बुडून जाण्यात आपलं बुडून जाणं व्हायचं.

तापलेल्या ग्रीष्म ऋतूत दिसेनाशा झालेल्या घनाची आर्त आळवणी करणारे आशाताईंचे ते सूर मनातल्या मनात कालवाकालव करून जायचे. ‘ये रे घना, ये रे घना’ म्हणून झाल्यानंतर ‘न्हाऊ घाल माझ्या मना’ या ओळीच्या वेळी आशाताईंच्या आवाजातली ती करूणा खूप खोल खोल गडद व्हायची. माझ्या कोरड पडलेल्या मनाला चिंब कर, ही विनवणी आपल्या मनाच्या पायथ्याशी पोहोचायची.

कविवर्य आरती प्रभूंच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेला संंगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेली चाल ही सात सुरांमधली आणखी एक अनोखी कविता आहे. माझ्या एका मित्राने जेव्हा अशीच एकदा त्याच्याकडल्या हार्मोनियमवर या गाण्याची चाल वाजवून दाखवली तेव्हा मला त्याचा खरोखरच प्रत्यय आला. शब्दांचा आधार न घेता वाजवून दाखवलेली ती चाल खरोखरच सुरांनी रेखाटलेली नितांतसुंदर कविता वाटली. आधी दिलेल्या शब्दांवर बेतलेली ही चाल आहे यावर हल्लीच्या काळातल्या कुणाचा विश्वासही बसणार नाही हे या चालीचं चकित करणारं वैशिष्ठ्य आहे.

कविवर्य आरती प्रभू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचा त्या एके काळी दोस्ताना होता. आरती प्रभू मनात दाटून आलेली कविता कधी हातातल्या कागदावर तर कधी तशाच एखाद्या चिठोर्‍यावर झरझर उतरवत आणि त्यांच्या मनात आलं तर हृदयनाथ मंगेशकरांकडे येऊन देत. हृदयनाथ मंगेशकरांना आरती प्रभूंनी आणून दिलेल्या चिठोर्‍यातले तसेच शब्द भावले तर त्या शब्दांना चाल लावत. ‘ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ हे शब्द असेच एकदा आरती प्रभूंनी हृदयनाथ मंगेशकरांकडे पोहोचवले. हृदयनाथ मंगेशकरांना ते शब्द भावले आणि त्यांनी यथावकाश या गाण्याची अतिशय हृदयस्पर्शी चाल तयार केली.

वास्तविक आरती प्रभू म्हणजे चिं.त्र्यं.खानोलकरांची ही एक आरस्पानी कविता आहे. या कवितेत, ग्रीष्म ऋतूत तापलेली धरणी नावाची प्रेयसी आभाळ नावाच्या आपल्या प्रियकराला साद घालते आहे. त्याचा वियोग सहन न होऊन ती सरतेशेवटी म्हणते आहे- ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना!…प्रियकराच्या भेटीसाठी आतूर झालेल्या धरणीची ही एक विवंचनेतून येणारी विनवणी आहे. आरती प्रभूंच्या या कवितेत एका ठिकाणी ती म्हणतेय, नको नको किती म्हणू. वाजणार दूर वेणू, सोसाट्याचा वारा मला, बोलावितो रसपाना. तर एका ठिकाणी ती म्हणतेय, फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना, गंध गेला रानावना…आरती प्रभूंचे शब्द हे असे गजरा माळण्याआधी पुरचुंडीत ठेवलेल्या फुलांसारखे असे सुटे सुटे असायचे.

या सुट्या सुट्या शब्दांमधला आशयही तसाच सुटसुटीत असायचा. पण त्याला घनगंभीर खोली असायची. जगण्याच्या अस्तित्वाचा त्या खोलीत शोध घेतलेला असायचा. माझ्या कवितांच्या वाटेला जाऊ नका असं म्हणून ठेवणार्‍या आरती प्रभूंच्या कवितांची वाटच अवघड वळणाची होती. पण हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताने त्या कवितांना मध्ये मध्ये एक सरळ रेषा मिळाली आणि संगीताच्या माध्यमातून त्यांच्या कवितांना एक नवी वाट उपलब्ध झाली. ‘ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ हे त्याचंच एक रूप.

आशाताईंनी ही कविता स्टेजवरूनही अनेक वेळा गायली आहे. अनेक वेळा त्या कवितेतल्या धरणीच्या त्या आर्त विनवणीची तीच आणि तशीच अनुभूती परत परत दिली आहे. रेडिओच्या जमान्यातलं ते गाणं ऐकताना तनामनावर सुखद शिडकावा करून जातं. साठीकडे आलेल्या बहुतांश लोकांना आजही हे गाणं रेडिओच्या त्या जमान्याकडे घेऊन जातं. कामगार सभा, आपली आवड, वनिता मंडळ, विशेष गीतगंगा या रेडिओवरच्या गीतसंगीताच्या कार्यक्रमांची आठवण देऊन जातं.

उन्हाळ्यातल्या या प्रखर दिवसांत ते गाणं का कोण जाणे, सहज आठवलं आणि त्या गाण्याच्या केवळ आठवणीनेही ते गाणं, आरती प्रभूंची ती कविता एक सहज शिडकावा करून गेली…हे गाणं ऐकायला मिळणं हा खरोखरच एक शिडकावा आहे.

First Published on: April 28, 2019 4:33 AM
Exit mobile version