धार्मिक द्वेषाची ‘ऑनलाईन’ दंगल!

धार्मिक द्वेषाची ‘ऑनलाईन’ दंगल!

धार्मिक विद्वेषाचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या देशाला काही नवीन नाही. अगदी देशाची फाळणी होण्याआधीपासून देशात धार्मिक विद्वेष आहे आणि तो टिकवून ठेवण्यासाठी इथल्या काही विघ्नसंतोषी समाजकारणी आणि राजकारण्यांनी मोलाची भूमिका बजावल्याची साक्ष इतिहास देतो, पण गेल्या काही वर्षांमध्ये या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणचं जाहीर समर्थन करणारा एक गटच तयार होऊ लागला आहे. हा गट जरी देशभर पसरलेल्या आणि वेगवेगळ्या राजकीय पक्ष किंवा व्यक्तींशी बांधिलकी ठेवणारा असला, तरी त्याच्या अजेंड्यामुळे ही सर्व मोकाट मंडळी त्याच एका गटाची सदस्य ठरतात. त्यांचा अजेंडा म्हणजे कट्टरतावादाचं जतन, संगोपन, संवर्धन आणि प्रसारण! मग ते थेट देशाच्या संसदेत आपापल्या धर्माची प्रतिकं उच्चारणं असो, गायीचं मांस ठेवल्याच्या संशयावरून जीवे मारलेला अखलाक असो, तिहेरी तलाकवरून मुस्लीम संघटनांनी केलेला उलटा प्रचार असो किंवा मग ‘आम्हाला विरोध करता, मग तुम्ही पाकिस्तानात जा’, असं जाहीरपणे म्हणण्याचा गर्विष्ठ माज असो! आणि सध्याच्या डिजिटल युगात सगळंच जसं ‘ऑनलाईन’ होऊ लागलंय, तसाच हा कट्टरपणाही ‘ऑनलाईन’ झालाय! जेवणाची ऑर्डर आणणारा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुस्लीम होता, म्हणून त्याने आणलेलं जेवण नाकारणार्‍या पं. अमित शुक्ल या महाभागाने सुरू केलेला मूर्खपणा आता याच ‘ऑनलाईन’ कट्टरतेपर्यंत येऊन पोहोचला आहे!

मुळात या झोमॅटो प्रकरणानंतर देशात खरंच लोकशाही आहे का? तिची राज्यघटना आहे का? तिच्यात स्वातंत्र्याची तरतूद आहे का? त्यात धार्मिक स्वातंत्र्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार मोजक्या विशिष्ट लोकांना देते की सर्वांनाच देते? असे काही मूलभूत प्रश्न निर्माण केले आहेत. आपल्या नावापुढे पंडित असं लावणार्‍या अमित शुक्ल नामक जबलपूरमधील महाभागाने झोमॅटोवर मागवलेलं जेवण फक्त एवढ्यासाठीच नाकारलं. कारण जेवण आणणारी व्यक्ती ही मुस्लीम होती. त्यावर झोमॅटोने ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो. आम्हाला आमच्या तत्वांशी तडजोड करणारा व्यवसाय करायचा नाही’, असं म्हणत खरमरीत उत्तर दिलं. हे इथपर्यंत त्या व्यक्ती आणि झोमॅटोपर्यंतच मर्यादित होतं, पण तिथून खरी सुरुवात झाली. या व्यक्तीला काही लोकांनी पुढचा थोडा वेळ ट्रोल केलं. त्याच्यावर टीका केली, पण त्यानंतर या शुक्लाजींच्या पाठिंब्यासाठी ट्विटरवर आख्खी फौजच सुटावी, असे सगळे सुटले. मग सगळ्यांनी झोमॅटोवर मनसोक्त टीका करत त्यांच्या सर्व्हिसमधल्या चुका दाखवायला सुरुवात केली. काहींनी त्यांच्या अन्न हाच धर्म या उत्तराची खिल्ली उडवली, तर काहींनी झोमॅटोचे कर्मचारी कशा ‘करामती’ करत असतात, याचे व्हिडिओ किंवा फोटो टाकले, पण या सगळ्यामध्ये मूळ मुद्यावर मात्र कुणीही बोलायला तयार नव्हतं. एखाद्याच्या धर्मामुळे त्याने हात लावलेलं जेवण भ्रष्ट होतं का? आपण पुन्हा छूत-अछूत, स्पृश्य-अस्पृश्य पद्धतीच्या समाजव्यवस्थेकडे मार्गक्रमण करत आहोत का?

Zomato

एखादी व्यक्ती फक्त समोरच्या व्यक्तीचा धर्म वेगळा आहे, म्हणून त्याने शिवलेलं अन्न घ्यायला नकार देते. मुळात त्याची तेवढी हिंमत होते हेच भयंकर आहे. त्यावर अमित शुक्ल त्याच्या या कृतीचं समर्थन करतो. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्याचं कारण पुढे करतो आणि या वादात त्याला सुनावायचं सोडून ट्विटवरचा ‘जमाव’ उलट झोमॅटोवरच तोंडसुख घेतो. त्यांच्या चुका दाखवून ते सेवा देण्यासाठी कसे नालायक आहेत हे कंठरवाने सांगू लागतो. त्यातलेच काही आक्षेपार्ह पद्धतीने मॉर्फ्ड केलेले फोटो टाकून झोमॅटोची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच बेभान झालेल्या जमावातला एक जण या अशा सेवा कंपनीला नामशेष करण्याची भाषा करतो. त्याला इतर जमावाची कंठरवाने साथ मिळते आणि त्यातून झोमॅटो किंवा त्यांची बाजू घेणार्‍या उबर या कंपन्यांची मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सच अनइन्स्टॉल करण्याची वेगळीच मोहीम सुरू होते. जणू काही या कंपन्यांचा खात्मा करण्यासाठीच हा जमाव पेटून उठतो. तीच जुनी पद्धत वापरून इतकी हेटाळणी करून सोडतो की पीडितांनी स्वत:हून एक्झिट करावी! या सगळ्यातून अशा ट्रोलिंगविरोधात संघटित गुन्हेगारीचा गुन्हा का दाखल होऊ नये? असा प्रश्न पडला तर त्यात चूक कुणाची?

खरंतर इथे फक्त झोमॅटोचा उदोउदो करून त्यांचं मार्केटिंग करण्याचं कारण नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं जातंय आणि ज्या उन्मत्त आणि निर्लज्जपणे त्याचं समर्थन केलं जातंय, ते गंभीर आहे. अस्पृश्यता, जातीभेद, हीन वागणूक देणं हे सगळं मागच्या किंवा त्यामागच्या पिढीचं गुणविशेष होतं आणि आत्ताची पिढी (त्यातही सोशल मीडियावर वावरणारी पिढी) ही अधिक पुरोगामी आहे, असं काहीसं चित्र कायम रंगवलं जातं, पण त्याच ‘ऑनलाईन’ नागरिकांमध्ये हा ‘जमाववाद’ स्लो पॉईझनिंगसारखा फैलावू लागला आहे. एक उठला की त्याच्यासोबत असंख्य उठतात आणि तो ज्याला विरोध करत असतो, त्याला नामोहरम करतात, हीच यांची पद्धत! अर्थात, याचा अर्थ असा नव्हे की झोमॅटो उत्तम सेवा देतोय किंवा उबर उत्तम सेवा देतेय आणि त्यामुळे त्यांच्याविरोधात कुणालाही बोलायचा अधिकार नाही किंवा त्यांचे दोष दाखवून देणं चुकीचं वगैरे आहे, पण हे सगळं एका चुकीच्या आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या समर्थनार्थ दाखवलं जात आहे आणि म्हणूनच ते व्यर्थ आहे.

व्यापक अर्थाने पाहिलं, तर संसदेत जेव्हा नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीची शपथ घेताना आपापल्या धर्माचा, धर्मगुरूचा किंवा धार्मिक निष्ठेचा प्रतिकात्मक उल्लेख केला (यात हिंदु खासदारांचं जय श्रीरामही आहे आणि ओवैसींचं अल्ला हो अकबरही. पुन्हा त्यावरून आस्मादिकांना निरर्थक ‘जमाववादाला’ तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून हा खुलासा) तेव्हा त्यांनीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे याच धार्मिक कट्टरतावादाला खतपाणी घातलं. असदुद्दीन ओवैसी जेव्हा शपथ घ्यायला उभे राहिले, तेव्हा भाजप खासदारांनी केलेली जय श्रीरामची नारेबाजी ओवैसींना धार्मिक मुद्यावर खिजवण्यासाठीच होती, हे अगदी स्पष्टच दिसत होतं आणि त्याचाच भीषण अवतार त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये ‘जय श्रीराम’ न बोलणार्‍यांना झालेल्या मारहाणीत आणि प्रसंगी त्यांचा मृत्यू होण्यामध्ये दिसून आला, हे सत्य नाकारून चालणार नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे यावर सत्ताधारी भाजपकडून किंवा त्यांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांकडूनही कोणतीही आक्षेप घेणारी भूमिका जाहीर केली जात नाही. इतर वेळी कुणाही कलाकाराला किंवा क्रिकेटपटूला सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यासाठी ‘परफेक्ट टायमिंग’ साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर मात्र कठोरपणे बोलण्याचं ‘टायमिंग’ अजूनही साधता आलेलं नाही. साध्वी प्रज्ञासिंहसारखी व्यक्ती संसदेत निवडून जाते हाही याच धार्मिक कट्टरतावादाचा सामाजिक अवतारच आहे. या सगळ्या गोष्टी जरी स्वतंत्रपणे त्या त्या संदर्भात घडत असतील, तरी त्याचा एकत्रित परिणाम हा कट्टर जमावाची मानसिकता तयार होण्यामध्ये होतो. ते अधिक उत्साही, अधिक बेडर, अधिक बेमुर्वतखोर आणि अधिक आक्रमक होतात आणि जमावाच्या गुन्हेगारीत त्यामुळे आपोआपच वाढ होते.

गो-रक्षणाच्या नावाखाली होणार्‍या मॉब लिंचिंगच्या घटना, बाबरी मशिदीच्या नावाखाली होणार्‍या धार्मिक दंगली किंवा गोध्रा जळीतकांडानंतर झालेला हिंसाचार यासारख्या सर्व घटनांमध्ये दोन गोष्टी समान असतात. एक म्हणजे त्यांच्यात दिसणारा धार्मिक कट्टरतावाद, मग तो कोणत्याही धर्माचा असो आणि दुसरा म्हणजे बेभान झालेला ‘जमाववाद’! मॉब सायकोलॉजी असा स्वतंत्र मुद्दाच मानसशास्त्रामध्ये शिकवायला असतो. सोशल मीडियावर हल्ली दिसणारं ट्रोलिंग हे याच जमाववादाचं आणि कट्टरतावादाचं ऑनलाईन रूप आहे, असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरू नये.

First Published on: August 3, 2019 5:16 AM
Exit mobile version