Kojagiri Purnima 2020: जाणून घ्या, कोजागिरी पौर्णिमेबद्दल; ‘या’ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन

Kojagiri Purnima 2020: जाणून घ्या, कोजागिरी पौर्णिमेबद्दल; ‘या’ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन

अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. तर कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.

वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा म्हणतात. या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. सन २०२० मध्ये शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी निज अश्विन पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमेला अनेक अद्भूत महायोग जुळून येत आहेत.

कोजागरी पौर्णिमा

कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून ‘को जागर्ती’? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा प्रचलित आहे.

आज लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त

शरद पौर्णिमेला सायंकाळी ०५ वाजून ४५ मिनिटांनी पंचक समाप्ती होत आहे. कोजागरी पौर्णिमेला प्रदोष काळ हा लक्ष्मी पूजनासाठी उत्तम मानला जात आहे. प्रदोष काळी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजनामुळे देवी प्रसन्न होऊन स्थैर्य, धन, धान्य, वैभव यांचा शुभाशिर्वाद देते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देशभरातील काही ठिकाणी लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे

निज अश्विन पौर्णिमा : शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२०

– पौर्णिमा प्रारंभ : शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ०५ वाजून ४५ मिनिटे.

– पौर्णिमा समाप्ती : शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे.

– लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त : सायंकाळी ०६ वाजून ३० मिनिटे ते ०७ वाजून २० मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. असे असले तरी कोजागरी पौर्णिमेला करायचे लक्ष्मी पूजन प्रदोष काळात करून त्या रात्री जागरण केले जात असल्यामुळे कोजागरी पौर्णिमेचे लक्ष्मी पूजन शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२० रोजी करावे, असे सांगितले जात आहे.

अशी करा पूजा ‍

शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे.

या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.
या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.

सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।
दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.


पहा व्हिडिओ- कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व

First Published on: October 30, 2020 8:12 AM
Exit mobile version