कोरोनाकाळातही अमेरिकेत होतोय बाप्पाचा गजर

कोरोनाकाळातही अमेरिकेत होतोय बाप्पाचा गजर

पेणकर कुटुंबियांनी अमेरिकेतही साजरा केला गणेशोत्सव

कोरोनाचे गणेशोत्सवावर सावट असताना भारतात बाप्पाचा उत्सव उत्साहात आणि पुरेशी काळजी घेत साजरा केला जात असताना अमेरिकेतही बाप्पाचा जयघोष कोरोना काळात केला जात आहे. मुळचे ठाण्याचे आणि सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या पेणकर कुटुंब बाप्पाचा उत्सव या संकट काळातही साजरा करीत आहे. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी मराठमोळ्या पेणकर कुटुंबाने यंदाचा गणेशोत्सव दहा दिवसांवर केला आहे. विशेष म्हणचे घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून त्यांनी घराची सजावट केली आहे. घरात येणारे भेट वस्तूंचे खोके, तसेच सजावटीच्या वस्तू जपून ठेवून वैशाली पेणकर आणि मुलगी रिजुल पेणकर यांनी पर्यावरण स्नेही सजावट साकारली आहे.

शेंडीचा नारळ अमेरिकेमध्ये मिळत नाही आणि घर लाकडाचे असल्याने तो फोडताही येत नाही. म्हणून या कुटुंबाने युक्ती लढवत कलशात नारळ ऐवजी शहाळ ठेवले आहे. शहाळ हे खूप दिवस टिकते. त्यामुळे हाच पर्याय उत्तम होता. नंतर या शहाळाचे पाणी मुलांना प्रसाद म्हणून दिला जाईल, असे वैशाली यांनी सांगितले. अमेरिकेमधील भारतीय बाजारपेठेत दरवर्षी गणेशमूर्ती येत असतात यंदा कोरोनामुळे मूर्ती न आल्याने ज्या भारतीय विक्रेत्यांकडे गेल्यावर्षीच्या मूर्ती बाकी होत्या त्याच त्यांनी विक्रीला ठेवल्या होत्या.

वैशाली आणि संदेश पेणकर यांनी भारतीय बाजारपेठामध्ये मूर्तीसाठी धावपळ सुरू केली आणि मूर्ती असेल त्या विक्रेत्यांनासंपर्क करायला सांगितला आणि सुदैवाने त्यांना एक मूर्ती उपलब्ध झाली. त्या विक्रेत्यांकडे फक्त दहा मूर्ती शिल्लक होत्या. त्यांनी फोन केल्यावर आम्ही तातडीने मूर्ती घेऊन आलो. चक्क दहा दिवस आधीच मूर्ती आणावी लागली असल्याचे वैशाली यांनी सांगितले. पेणकर कुटुंबाचे यंदाचे १२ वे वर्षे तर अमेरिकेतल्या गणेशोत्सवाचे दुसरे वर्षे आहे. परंपरेप्रमाणे मोदकाचा नैवेद्य दाखविणे, दररोज न चुकता आरती करणे या सर्व गोष्टी प्रथेप्रमाणे करीत आहे. ठाण्यात असताना सर्व नातेवाईक एकत्र येऊन जागरण केले जात, इथे आल्यावर शक्य नसल्याने व्हिडिओ कॉलिंग करून जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे या कुटुंबाने सांगितले.

पेणकर कुटुंबियांनी केलेली मनमोहक सजावट

त्यांचा मुलगा ध्रुव पेणकर हा देखील स्वतःहून आवडीने आरती करतो. हे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या संकटात ही घरच्या घरी उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. विसर्जन घरीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: August 25, 2020 8:25 PM
Exit mobile version