Ganeshotsav 2020: …अशी असते माहेरवाशीण गौरी आवाहनाची परंपरा!

Ganeshotsav 2020: …अशी असते माहेरवाशीण गौरी आवाहनाची परंपरा!

गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळंच महत्त्व असतं. गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. गौरी आली, सोन्याच्या पावली…
गौरी आली, चांदीच्या पावली… असे म्हणत पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. तर गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

…म्हणून हा सण तीन दिवस साजरा करतात

या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते. या दिवशी सर्व माहेरवाशिण एकत्र येऊन गौरीची पूजा अर्चा करतात. यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते. दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो.

गौरी मूळ नक्षत्रावर विराजमान होतात

सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो. गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

विवधता ज्येष्ठगौरीची…

ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते.

काहीजणांकडे गौरीसोबतच गणपतीचे विसर्जन होते. तर काहींकडे गौरींचे विसर्जन झाल्यानंतर १० दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे गौरी आणि गणपतीची भेट होतच नाही असेही म्हटले जाते. अलिबाग तालुका आणि त्यापुढे दक्षिणेस दक्षिण रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकविणारा कोकणचा भाग म्हणजे आगर. आगरात वरील समाजामध्ये लग्न झाले की नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात.

नव्या सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन (पूर्वी अनवाणी) चालत, बरोबर कमीत कमी पाच सवाष्ण घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात. हा आला ओवसा सासरी स्वीकारला जातो.

माहेरवाशिणीसाठी महानैवेद्य 

पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

कोकणात गौरीला तिखटाचे जेवण दिले जाते. तसेच त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुस-या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात. तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरीची परंपरा

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात.

एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली” असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

 

First Published on: August 24, 2020 7:00 AM
Exit mobile version