उबदार घर

उबदार घर

Home Decoration

गृहसजावटीचे सध्या अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण आपले घर हे सुंदर व इतरांपेक्षा जरा वेगळे दिसावे यासाठी एखादी थीम घेऊन घर सजवण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. थीम म्हणजे एक विषय घेऊन त्याभोवती घराच्या सजावटीची सांगड घालायची. ओशन, ट्रेडिशन, बांबू असे अनेक प्रकारांना सध्या पसंती मिळत आहे.थंडीची चाहलू लागायला सुरुवात झाली आहे. या थंडीच्या दिवसांत वार्याची लहानशी झुळूकही नकोशी वाटते. स्वेटर, स्कार्फ असे खास ठेवणीतले कपडे बाहेर पडतात. रात्री देखील दुलई ओढल्याशिवाय राहवत नाही. थोडक्यात काय, तर थंडीत अधिकाधिक उबदारपणा कसा मिळेल, याकडे आपलं लक्ष लागलेलं असतं. थंडीतल्या या उबदारपणाला मग घर कसं अपवाद असेल. बाहेरच्या थंडीपासून आपला बचाव करायचा असेल तर तशी वातावरणनिर्मिती आपल्याला घरापासूनच करायला हवी. फरशी, भिंती, छत (सिलिंग) आणि कपडे यात काही लहानसे बदल केलेत तर तुमच्या घराला नक्कीच चांगला, वेगळा आणि उबदार लूक येईल.

ओशन 

ओशन थीम समुद्री सजावटीशी निगडीत आहे. ज्याप्रमाणे समुद्रात शंख, शिंपले, मासे, झाडे इत्यादी निरनिराळ्या सागरी खजिन्यापासून सजले आहे त्याप्रमाणे त्या सर्व वस्तूंचा वापर घर सजावटीसाठी केला जातो. समुद्राच्या निळ्या रंगाचा, त्यातल्या छटांचा भिंत रंगवण्यासाठी वापर केला जातो. दर्शनी भिंतीवर वाळू किंवा समुद्री लाटांचे टेक्श्चर दिले जाते. त्यासाठी शिंपल्यांचाही उपयोग केला जातो. शिंपल्यांच्या टेक्शचरचा वापर घरातले खांब, छतांचा किंवा दरवाजा-खिडक्यांची चौकट सजवण्यासाठी केला जातो.

बांबू 

गृहसजावटीसाठी बांबूचा व त्यापासून बनवलेल्या वस्तूंचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. बांबूच्या डिझाइनचे कारपेट व बांबूपासून बनवलेले फर्निचर यांचे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. दुकानात बांबूपासून बनवलेल्या फुलदाण्या, शोभिवंत वस्तूही सहज मिळतात. पण भिंतीवर एखादे सूप, पंखासुद्धा सुंदर दिसतो. बोन्झाय केलेली बांबूच्या झाडांचा उपयोगही सजावटीसाठी केला जातो.

स्टील 

घर आधुनिक दिसावे यासाठी अनेकजण स्टील थीमचाही वापर करतात. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रंगसंगतीचा वापर भिंती रंगवण्यासाठी केला जातो. थीमप्रमाणे घरातल्या फर्निचरपासून सजावटीच्या वस्तूंपर्यंत शक्य तिथे स्टीलचा वापर केला जातो. याप्रमाणेच काच टेराकोटा, फेरोसिमेंटची डिझायनर भिंत यांचा वापर करून थीम करता येते. ट्रेडिशनल लूक म्हणजे घरात आधुनिक सुविधा सगळ्या असाव्यात पण त्याचे स्वरूप गावाकडे झुकणारे असावे. त्यासाठी भिंतींना मातीचा मुलामा देऊन त्यावर वारली चित्रे काढली जातात. लाकडी फ्रेमचे फोटो, लाकडी फुलदाण्या, कलाकुसरीने सज्ज दरवाजे, फर्निचरचा वापर केला जातो. फुलदाणीऐवजी घंगाळे किंवा तांब्याच्या शोभिवंत वस्तूंचाही वापर केला जातो.

रंग 

घराला रंग देणं ही खरं तर खर्चिक बाब आहे. पण तुम्ही या दिवसांत रंगांचं काम करणार असाल तर एखाद्या भिंतीला अग्निच्या रंगाच्या जवळ जाणारे रंग देण्यास हरकत नाही. सोनेरी, केशरी, लाल हे गडद रंग घराला उबदार असल्याचा फील देतात. आजकाल भिंतीवरील रंगांना विशिष्ट पोत (टेक्श्चर) देण्याच्या फॅशनची खूप चलती आहे. यात टेक्श्चरचे विविध प्रकार आणि शेड्स पाहायला मिळतात. रंग देणं शक्य नसेल तर फिक्या रंगाच्या भिंतीवर एखादं गडद रंगाचं पेटिंग लावावं. पेंटिंग बदलूनही चांगला लूक आणू शकता.

First Published on: November 18, 2018 5:51 AM
Exit mobile version