केस व त्वचेसाठी उपयुक्त कडुनिंब

केस व त्वचेसाठी उपयुक्त कडुनिंब

कडुनिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. त्यामुळेच त्याला एक वृक्ष औषधालय असे म्हणतात. कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत. व त्यामुळेच त्वचा व केस यांच्या अनेक व्याधी दूर करण्यासाठी तसेच त्वचेचा कोरडेपणा व खाज दूर करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कडुनिंब पेस्टचा उपयोग हेअर कंडिशनर म्हणून उपयोग केला जातो.

चेहर्‍यावरील तारुण्यपीटिकांवर लिंबोणी तेलाचा उपाय परिणामकारक ठरतो. कडुनिंबाचे तेल हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फन्गल, अँटी मायक्रोबियल असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा रोगांवर हे तेल रामबाण आहे. विशेषत: तेल लावल्यावर ती व्याधी परत उद्भवत नाही. कडुनिंब तेलात फॅटी अ‍ॅसिड व ई जीवनसत्त्व आहे व ते त्वचेत सहज व जलदगतीने शोषून घेतले जाते. त्यामुळे खरुज, नायटा यांसारख्या व्याधी सहज बर्‍या होतात.

प्रसूतीनंतर कडुनिंबाच्या पानांचा रस काही दिवस सतत घेत राहिल्याने रक्त साफ होते. गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांतील अवयवांची सूज उतरते, भूक लागते, पोट साफ होते, ताप येत नाही आणि आलाच तरी त्याचा जोर चढत नाही, असे आयुर्वेद सांगतो.

कडुनिंबाचा काढा बनवून स्त्रियांना प्यायला दिल्याने त्यांच्या मासिक पाळीच्या तक्रारीदेखील कमी होतात. मासिक पाळीच्या वेळी कडुनिंबाची पाने गरम करून स्त्रीच्या कमरेभोवती बांधल्यास मासिक पाळीवेळी होणारा त्रास कमी होतो. श्वेतपदराच्या त्रासामध्ये कडुनिंबाच्या पाण्याने योनीमार्ग स्वच्छ केल्याने आणि कडुनिंबाच्या सालींची धुरी घेतल्याने फायदा होतो. रक्तप्रदराच्या त्रासामध्ये कडुनिंबाच्या मुळांतील सालीचा रस जिरे टाकून प्यायल्याने रक्तस्राव बंद होतो, तसेच इतर तक्रारींदेखील कमी होतात.

कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते. डोळ्याच्या आजूबाजूला त्रासदायक असणारे बॅक्टरिया या पाण्यामुळे आपोआप मारले जातात. डोळे निरोगी होण्यास मदत होते. केसातील कोंडा दूर करण्यास ही अंघोळ फायदेशीर ठरते. डोक्यातील खाज दूर होते.या पाण्याच्या आंघोळीने काखेतील बॅक्टेरिया मारले जातात, शरीराची दुर्गंधी दूर होते.

First Published on: September 23, 2018 12:05 AM
Exit mobile version