अनियमित रक्तस्रावापासून सावधान

अनियमित रक्तस्रावापासून सावधान

stomach ache

एण्डोमेट्रिअल (गर्भाशयाच्या अंत:स्तरासंदर्भातील) व सर्व्हायकल (गर्भाशयाच्या) कॅन्सर, या दोन्ही प्रकारांच्या कॅन्सरची लक्षणे ही डिसमेनोर्‍हिआच्या (वेदनादायी मासिक पाळी) लक्षणांसारखीच असतात. अनियमित रक्तस्राव, पाळीच्या वेळी वेदना होणे हे स्त्रियांमध्ये सामान्य समजले जाते, त्यामुळे ही एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे आहेत असा विचार सहसा कोणी करत नाही. एण्डोमेट्रिअल कॅन्सरचे निदान झालेल्यांपैकी ९० टक्के स्त्रियांनी या आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अनियमित रक्तस्राव/मासिक पाळीचा अनुभव घेतलेला असतो, असे अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक मासिक पाळीतील रक्तस्रावाची पद्धत समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे (यामध्ये स्पॉटिंगचाही विचार झाला पाहिजे). दैनंदिन ताण, आहारविषयक सवयी, शारीरिक हालचाल अती होणे किंवा न होणे यामुळे किरकोळ बदल घडू शकतात. अर्थात, सातत्याने होणार्‍या बदलांकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे पायात गोळे येणे किंवा वेदना मासिक पाळीदरम्यान साहजिक असल्या तरीही प्रचंड व सतत वेदना होत असल्यास काही गंभीर कारण आहे का हे तपासून घेतले पाहिजे.

कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे, भूक न लागणे, थकवा ही एण्डोमेट्रिअल कॅन्सरची लक्षणेदेखील दुर्लक्षित राहतात. भारतीय स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता/अ‍ॅनिमियाचे प्रमाण बरेच आहे. त्यामुळे थकवा येतो. त्यामुळेही या कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर होऊ शकत नाही. स्त्रियांमध्ये दिसून येणार्‍या कॅन्सरच्या प्रकारांची अन्य काही लक्षणे म्हणजे पायावर सूज, फुगलेले ओटीपोट, सततचे अपचन, आतडी/मूत्राशयावर दाब जाणवणे आणि सतत लघवीला जावे लागणे वगैरे.

स्त्रियांना एण्डोमेट्रिअल कॅन्सरच्या लक्षणांविषयी माहिती देणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कॅन्सरचा हा प्रकार गर्भाशयाच्या अस्तरापासून सुरू होतो. हा कॅन्सर सहसा रजोनिवृत्तीनंतर किंवा त्यादरम्यान होत असला, तरी तरुण स्त्रियांमध्येही त्याचे निदान होऊ शकते. मासिक पाळीशी संबंध नसलेला योनीमार्गातून होणारा रक्तस्राव हा धोक्याचा इशारा आहे. एण्डोमेट्रिअल कॅन्सरच्या ४० टक्के रुग्णांमध्ये स्थूलत्व, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असतो हे अभ्यासांत दिसून आले आहे.

यातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे लवकर निदान होणे. या कॅन्सरचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर झाले, तर यातून बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. हिस्टरेक्टॉमी (म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) आणि त्याबरोबरच अंडनलिका (फेलोपिअन ट्युब्ज) व अंडाशय (ओव्हरीज) (सॅल्पिंगो-ऊफोरेक्टॉमी) काढून टाकणे हा एण्डोमेट्रिअल कॅन्सरवरील उपचारांचा प्रमुख भाग आहे. कॅन्सर पुढील टप्प्यात पोहोचून अन्य ऊती/अवयवांमध्ये पसरला असेल, तर किमोथेरपी, रेडिएशन यांसारखे उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.

विचित्र रक्तस्राव किंवा वेदनादायी मासिक पाळी हे प्रत्येकवेळी कॅन्सरचेच लक्षण असेल असे नाही, हे लक्षात घ्या. मात्र, ही लक्षणे दीर्घकाळ जाणवत राहिल्यास (२ आठवड्यांहून अधिक काळ) त्याकडे दुर्लक्ष करू नका, लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

डॉ. अनु विनोद विज (प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ मदरहूड हॉस्पिटल खारघर)

First Published on: February 28, 2019 4:57 AM
Exit mobile version