असा साजरा करा महिला दिन

असा साजरा करा महिला दिन

ताई, माई, आई, आजी, घरातील लहान बहीण, स्वयंपाकीण काकू, घरची स्वच्छता ठेवणारी मावशी या सर्वांशिवाय एक दिवसही स्वतःची कामे स्वतः करताना पुरुष मंडळी घर डोक्यावर घेतात. मात्र, घरातील महिला वर्ग स्वतःचे करिअर करताना घर सांभाळण्याचे कामही तोंडातून ब्र न काढताही सहज करत असतात. ८ मार्च या दिवशी तरी आपण तिला तिचे स्वातंत्र्य उपभोगू देऊया.. महिला दिन तिच्यासाठी खास करू या…

पुष्पगुच्छ देऊन दिवसाची सुरुवात करा – आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग असलेल्या ताई, माई, आई, आजी, घरातील लहान बहीण, स्वयंपाकीण काकू, घरची स्वच्छता ठेवणारी मावशी या सर्वांना महिला दिनाच्या दिवशी सकाळीच पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या दिवसाची सुंदर सुरुवात करा. तुम्ही दिलेले पुष्प त्यांच्या चेहर्‍यावर आनंद तर आणेलच. शिवाय त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यापेक्षा वेगळा दिवस असूच शकत नाही.

घरातील कामांची जबाबदारी घ्या – वर्षाचे ३६५ दिवस अहोरात्र आपल्यासाठी झटणार्‍या घरातील महिला वर्गाला निदान एक दिवस तरी घरातील कामांमधून सुट्टी द्या. आजच्या दिनी कार्यालयातील कामांमधून वेळ काढून घरातील कामांची जबाबदारी घ्या. असे केल्याने एक वेगळेच समाधान महिलांच्या चेहर्‍यावर झळकेल.

भेटवस्तू द्या – घरातील महिलांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना एखादी भेटवस्तू द्या. असे केल्याने घरातील महिला वर्गाच्या मनात तुमच्याविषयी आदरभाव वाढेल. साडी, कर्णभूषणे, ड्रेस, पुस्तक आदी वस्तू महिलांचा जीव की प्राण. तेव्हा यापैकी किंवा तुमच्या आवडीची एखादी भेटवस्तू तुम्ही नक्की या दिवशी घरातील महिलांना द्या.

सहलीचे, गेट टू गेदरचे आयोजन करा – आपल्या घरातील, कुटुंबातील महिला वर्गासाठी या दिवशी आपण जवळच्या ठिकाणी सहलीचे आयोजन नक्कीच करू शकतो किंवा शक्य नसल्यास सायंकाळी एखाद्या लहानशा गेट टू गेदरचे आयोजन तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यांची काळजी असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल.

चित्रपट, नाटके पहायला पाठवा – घरातील कामांमधून वेळच मिळत नसल्याने विशेषतः गृहिणींना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची फार कमी संधी मिळते. तेव्हा या दिनी घरातील महिला वर्गासाठी एखाद्या चित्रपटाचे किंवा नाटकाचे तिकिट काढून त्यांना चित्रपट, नाटक पहायला पाठवा.

First Published on: March 8, 2019 5:05 AM
Exit mobile version