पाळणाघर निवडताना…

पाळणाघर निवडताना…

baby seating

आज जवळपास सर्वच स्त्रिया नोकरी, करिअर करतात. एकट्यादुकट्या असताना, नोकरीचा व्याप वाटत नाही. मात्र मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाची चिंता स्त्रियांना सतावते. घरात कोणी मुलांकडे बघणारे नसले म्हणजे त्यांच्या चिंतेत आणखीन वाढ. त्यामुळे हल्ली मुलांच्या संगोपनासाठी आया, मावशी यांची नेमणूक केली जाते. तर काही जणी कार्यालयाशेजारी किंवा घराशेजारी पाळणाघर आहे का हे शोधतात. मात्र अनेकदा पाळणाघरातील असुविधांमुळे मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाळणाघर निवडताना योग्य ती खबरदारी घेतल्यास आपल्या मुलाचे संगोपन उत्तमच होईल यात शंकाच नाही.

* आपल्या घराशेजारी किंवा कार्यालयाशेजारी असणार्‍या पाळणाघराची निवड करावी. जेणेकरून मुलांना पाळणाघरातून घरी ने-आण करणे सोपे जाईल.

* पाळणाघराच्या संचालिकाविषयी पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये तिचा स्वभाव, तिचे शिक्षण आदी माहिती जाणून घेऊन त्यानंतरच पाळणाघराची निवड करावी.

* पाळणाघराची जागा ही प्रशस्त, मोठी, हवेशीर व खेळण्यासाठी मोठी असावी. तसेच मुलांच्या मनोरंजनासाठी तेथे खेळणी आहेत की नाही याबाबतही माहिती करून घ्या.

* पाळणाघरात असणार्‍या इतर सहाय्यिका म्हणजे तेथील शिक्षिका, स्वयंपाकीण बाई, मावशी, मदतनीस या सर्वांना मुलांमध्ये रमण्याची, मुलांच्या कलागुणांना वाव देण्याची तसेच लहान मुलांवर मनापासून प्रेम करण्याची आवड आहे की नाही याबाबत दक्ष असणे आवश्यक आहे.

* तेथील संचालिका, मावशी, मदतनीस यांच्याशी नियमित संवाद साधणे गरजेचे आहे. असे केल्याने त्यांचा स्वभाव तसेच मुलांच्या वाढीतील गुणदोष समजण्यास मदत होईल.

* पाळणाघरात स्वयंपाकाविषयी जागृत असणे गरजेचे आहे. त्यानुसार तेथील स्वयंपाकीण बाई स्वच्छतेच्या बाबतीत किती जागृत आहे. तसेच तेथील स्वयंपाकखोली, स्वयंपाकाचा दर्जा आदी बाबी आधीच माहीत असणे मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

* पाळणाघराची वेळ काय याबाबतही माहिती करून घेणे गरजेचे आहे. काही पाळणाघरे ही अर्धवेळ काम करणारी असतात तर काही पूर्णवेळ. आपल्या नोकरीच्या वेळेनुसार पाळणाघराची वेळ आहे की नाही याबाबत माहिती करून घ्या.

* खाणे, खेळण्यापलीकडे पाळणाघरात इतर सुविधांबाबतीतही माहिती असणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा पाळणाघर हे केवळ मुलांच्या मनोरंजनाचे ठिकाण न राहता, मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी विविध प्रकारची पुस्तके, चार्ट, खेळणी यासारखे मनोरंजनाद्वारे शिक्षण देणारे साहित्य पाळणाघरात आहे की नाही याबाबत माहिती करून घ्या.

* पाळणाघराची संचालकांना मुलांचे आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र, आहारशास्त्र याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

* लहान मुले या ना त्या कारणाने सतत आजारी पडतात. अशावेळी पाळणाघरात बालरोगतज्ज्ञाची व्हिजिट होते की नाही याबाबत दक्ष असणे गरजेचे आहे.

* आपल्या मुलाला बोलता येत असल्यास, घरी आल्यावर आज पाळणाघरात काय काय झाले याबाबत त्याच्याशी संवाद साधावा.

First Published on: March 6, 2019 4:48 AM
Exit mobile version