सर्व सामान्यांसाठी कन्फर्टेबल ठाणे-भिवंडी मार्गावरील कशेळी

सर्व सामान्यांसाठी कन्फर्टेबल ठाणे-भिवंडी मार्गावरील कशेळी

New colonies

ठाण्यातील जागांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचा प्रचंड फायदा भिवंडी मार्गावर असलेल्या काल्हेर कशेली भागाला होत आहे. मुंबई-ठाण्याच्या तुलनेत किमान पायाभूत सुविधा मिळत असल्याने सामान्य नागरिकांचा वावर आता या भागात वाढत आहे. मात्र नोटबंदी, जीएसटी, रेरा अशा बाबींचा फटका येथील बांधकाम व्यावसायिकांनाही होत आहे. तरीही सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत घरे बांधण्याची तारेवरची कसरत येथील बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. मध्यमवर्गीय व नोकरदार वर्गाचा विचार करता येथील गृहनिर्माण व्यवसाय सध्या तेजीत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सर्वसामान्यांना गृहीत धरून विकासकांनी परवडणार्‍या घरांवर दिलेला भर.

विकासकांच्या संघटनेच्या अंदाजानुसार सध्या या संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या गृहसंकुलांचे जाळे निर्माण होत आहे. दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. नवी मुंबई व ठाण्यातील घरांच्या किंमती एक कोटीपार गेल्या असताना काल्हेर कशेळी भागात आजही 40 ते 70 लाखांमध्ये घरे मिळू शकतात. तशी मागणीही वाढत असल्याने पुरवठाही तसाच अव्याहत सुरू आहे. मात्र, या घरांच्या विक्रीला बर्‍याच प्रमाणात फटका बसत आहे तो अनधिकृत बांधकामांचा. गावठाण परिसर असल्याने येथे हजारो अनधिकृत बांधकामे होत आहेत. ज्यांची किंमत अगदी 25 लाखांपर्यंत आहे. या घरांवर कारवाई होणार नाही याची खात्री असल्याने अशी घरे विकली जातात. मात्र, अधिकृत घर घेऊन ही कारवाईची डोकेदुखी कायमची सोडवण्याचा विचार करणारा वर्ग सध्या या भानगडीत पडत नाही.

सद्यस्थितीत ठाणे परिसरात जी काही ठिकाणे विकसित होत आहेत. त्यात ठाणे-भिवंडी मार्गावरील गृहसंकुलांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. मात्र या भागातल्या प्रॉपर्टी अनधिकृतच असतात या गैरसमजामुळे या परिसरात घर घ्यायला काही नाके मुरडत असतील तरी तो गैरसमज दूर होत आहे. आज अनेक अधिकृत गृहप्रकल्प उभे राहत आहे. सामान्य वर्गातील नागरिकांना वनरूम किचनपासून ते सरकारी नोकरवर्गाकरिता 3 बीएचकेपर्यंत रुम्सची निर्मिती होत आहे. नोकरदार वर्ग असल्याने घरात मासिक उत्पन्न 1 लाखाच्या जवळपास असल्याने कर्ज काढून काहीसे महागडे घर घेण्याकडेही अलिकडच्या काळात कल वाढू लागला आहे. त्यामुळे अशा लोकांसाठीही या ठिकाणी त्याच पद्धतीच्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

परिसरातच स्वीमिंग पूल, क्लब हाऊस, मैदान, शाळा, बगीचासारख्या सुविधाही येथील गृहनिर्माण संकुलांचे आकर्षण ठरत आहेत. जीएसटी, रेरावरून निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाल्याने याही ठिकाणी आता नवीन वसाहती निर्माण होत आहेत आणि सर्व सामान्य नागरिकच नव्हे सर्व स्तरातील नागरिक या ठिकाणी गुंतवणूक करीत आहेत. येणार्‍या काळात मॅट्रोचे स्टेशन असल्याने या परिसराला आता अधिक भाव येऊ लागला आहे. ठाणे स्टेशनपासून शेअर रिक्षा आणि महापालिकेची परिवहन सेवा कार्यरत आहे. त्यामुळे प्रवासाचा प्रश्न बर्‍याच अंशी संपुष्टात आला आहे. त्यातच हल्ली प्रत्येक कुटुंबाकडे टु-व्हीलर असल्यामुळे हा प्रवास सहज सुलभ होत आहे. मुख्य शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या संकुलाचा येणार्‍या काळात भाव वधारला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणूनच सद्यस्थितीत इथली गुंतवणूक कम्फर्टेबलच म्हणावी लागेल.

घोडबंदर मार्गावरील गायमुख ते भिवंडीतील कशेळी टोलनाक्यापर्यंतच्या बाह्यवळण रस्त्याला सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे आठ वर्षांपूर्वी या रस्त्याची आखणी केली होती. 15 किमी लांबीच्या या रस्त्याच्या उभारणीमुळे या परिसराचा भाव आणखीनच वधारला जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी येणे-जाणे सहजरित्या व्हावे हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी महत्त्वाचा असतो. तो हेतू आता यामुळे साध्य होणार आहे.

घोडबंदर रोड परिसर आता धनदांडग्यांनी व्यापला आहे या परिसरात सर्व सामान्यांना घर घेणे कठीण झाले असतानाच कशेळी परिसर तेवढ्याच तोलामोलाचा ठरत आहे. घोडबंदर मार्गाचे एक टोक असलेल्या गायमुख खाडीतून निघणारा हा रस्ता भिवंडीजवळील कशेळी टोलनाक्यापर्यंत असणार आहे. 15 किमी लांबीच्या व 45 मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीलाही पर्यायी रस्ता मिळू शकणार आहे. कल्याण-भिवंडीमधील वाढत्या लोकसंख्येला प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून या परिसरातून मॅट्रो धावणार आहे. त्यामुळे हा परिसर मुख्य शहराशी जोडला जाऊन हे एक स्वतंत्र शहर निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. वाढती गृहसंकुले आणि परिसराचा विकास पाहता 2031 मध्ये भिवंडीतील लोकसंख्या 6.8 वरून 13 लाख इतकी होणार असल्याने कशेळीचा दर्जा उंचावणार यात शंका नाही.

First Published on: December 15, 2018 4:46 AM
Exit mobile version