दिवाळीत खुलवा सौंदर्य

दिवाळीत खुलवा सौंदर्य

दिवाळीत खुलवा सौंदर्य

दिवाळीत घराची साफ-सफाई, रोषणाई, खरेदी, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनविणे या व अशा प्रकारच्या अनेक कामांना अक्षरश: उधाण आलेले असते. घरातील गृहिणी ही कामे करण्यात इतकी मग्न झालेली असते की तिला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. कामाच्या घाईगडबडीत झालेल्या दुर्लक्षामुळे दिवाळीत तिचा चेहरा पार कोमेजून जातो. अशा कोमेजलेल्या चेहर्‍यावर कितीही मेकअप केला तरीही तो खुलून दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी खालील टिप्स वाचा.

* बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय यांच्या लेपाने धूळ व माती तसंच चेहर्‍यावरील मृत त्वचा काढून टाका.

* नंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहर्‍यावर तसंच मानेवर मॉलिश करून ५ मिनिटे वाफ घ्या.

* २ चमचे मुलतानी माती, १ चमचा मध, २ चमचे गुलाबाचे पाणी, १ चमचा चंदन पावडर यांचे मिश्रण दह्यात मिसळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल.

* यानंतर हातापायांची काळजी घ्या. कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, ३ ते ४ थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व पाय १०-१५ मिनिटे बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या साह्याने मृत त्वचा काढून टाका. हात व पाय साध्या पाण्याने धुवून मॉयश्चराइजर लावा. तुमचे हात व पाय सुंदर व कोमल दिसू लागतील.

* यानंतर तुमची वेशभूषा ठरवून घ्या. दिवाळीच्या दिवसांत घागरा, राजस्थानी ड्रेस, गुजराती साडी किंवा तुम्हाला आवडणारे विशेष ड्रेस परिधान केले तर तुमचे रूप अजूनच खुलून दिसेल.

* दागिने निवडताना परंपरागत साडीसोबत टिकली, नथ, कानांमध्ये झुमके, खड्याच्या किंवा मोतीच्या बांगड्या, पायात जाडसर किंवा मोतीचे पैंजण व कमरेत झुमका या गोष्टींना प्राधान्य दिले तर तुम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या दिसाल. हे दागिने सध्या कमी किमतीत व परवडतील अशा किमतीत इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात सहज उपलब्ध असतात.

* या सुंदर रूपावर तुम्हाला शोभेल व आवडेल अशी कोणतीही केशरचना करून स्वत:चे सौंदर्य वाढवा. चेहर्‍याच्या ठेवणीनुसार सैल वेणी, अंबाडा किंवा सागर वेणी यांची निवड करू शकता. या वेणीला बीट्स, मोती किंवा फुलांनी सजवा.

* सगळ्यात शेवटी चेहर्‍याचा मेकअप करा. याकरिता सगळ्यात आधी चेहर्‍यावर बर्फ चोळा. याने तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील. नंतर चेहर्‍यावर मॉयश्चराइजर लावा. नंतर तुमच्या रंगाला शोभून दिसेल त्या रंगाचे फाऊंडेशन लावा. कॉम्पॅक्ट पावडरने चेहर्‍याला ‘एक्स्ट्रा टच’ द्या. कपाळावर व नाकावर ड्रेसच्या रंगाला मॅचिंग ब्लशर लावा. नंतर डोळ्यांवर आयशॅडो लावा. डोळ्यांना व्यवस्थित आकार देण्यासाठी आयलाइनर किंवा आय ब्रो पेन्सिलचा वापर करा. नंतर पापण्यांवर मस्करा लावा. सगळ्यात शेवटी तुमच्या कपड्यांच्या रंगाशी मेळ खाणारी लिपस्टिक व सुंदर टिकली लावा. आता पहा सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळून रहातील आणि हो तुमच्या चेहर्‍यावरील तुमचे हास्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उठावदार बनवेल.

First Published on: October 28, 2018 2:04 AM
Exit mobile version