डॉक्टर्सना हे प्रश्न विचाराच

डॉक्टर्सना हे प्रश्न विचाराच

Talk with doctor

डॉक्टर्सच्या भेटीत डॉक्टर विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे आपण देतो. परिणामी अनेकदा रुग्ण उपचार पद्धती, औषधांच्या वेळा, पाळावयाची पथ्ये याबाबत संभ्रमित होतो. तेव्हा डॉक्टर्सच्या भेटीत त्यांना काही आवश्यक प्रश्न विचारणे गरजेचे आहे. ते प्रश्न कोणते, ते जाणून घेऊयात…

हे औषध कशासाठी?

अनेकदा डॉक्टर्स सांगतील, लिहून देतील ती औषधे आपण विकत घेतो. मात्र, त्यांनी दिलेली औषधे कशासाठी असून, ह्या औषधांचा तुम्हाला कसा फरक जाणवेल हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

औषधांचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?, औषधांचे कोणते दुष्परिणाम अधिक घातक ठरतील?

औषधांचे दुष्परिणाम माहीत असणे गरजेचे आहे. कारण असे काही दुष्परिणाम जाणवल्यास तुम्ही आवश्यक ती खबरदारी घेऊ शकता. प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत डॉक्टर असणार नाहीत. तेव्हा औषधांचे दुष्परिणाम काय असा प्रश्न डॉक्टर्सना जरूर विचारा. सर्वच प्रकारची औषधे सर्वच रुग्णांना परिणामकारक ठरत नाहीत. तेव्हा औषधांच्या दुष्परिणामांची माहिती असल्यास तत्काळ डॉक्टर्सची मदत घेऊ शकतो.

एखादे औषध न घेतल्यास काय होईल?

आपल्या आरोग्याविषयी सजग असणे महत्त्वाचे आहे. तेव्हा डॉक्टर्सनी दिलेल्या औषधांपैकी एखादे औषध न घेतल्यास त्याचे कोणते परिणाम होतील हा प्रश्न डॉक्टर्सना विचारणे गरजेचे आहे. एखादे औषध न घेतल्याने कोणते परिणाम जाणवतील, तब्येतीत कोणते बदल घडतील याविषयी डॉक्टर्सशी संवाद साधा.

औषधांच्या वेळा, औषधे कशासोबत घ्यावीत?

डॉक्टर्स रुग्णांना प्रिस्क्रिप्शनवर औषधांच्या वेळा लिहून देतातच. मात्र, अनेकदा संवादाच्या अभावे रुग्णांना कोणती औषधे कोणत्या वेळी घ्यावी याबाबत गोंधळ उडतो. तसेच औषधे घेताना ती कशासोबत घ्यावीत हा प्रश्नही डॉक्टर्सना जरूर विचारा.

First Published on: April 6, 2019 4:01 AM
Exit mobile version