Health Tips : थंडीच्या महिन्यात सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा

Health Tips : थंडीच्या महिन्यात सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा

Health Tips : थंडीच्या महिन्यात सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा

थंडीचा मोसम सुरू झाला आहे. थंडीमध्ये शरीराचे तापमान कमी होत असते. या कालावाधीत सुकामेवा खाल्ल्याने शरिरामध्ये ऊर्जा निर्माण होते. सुकामेवा खाल्ल्याने प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. काजू, बदाम, पिस्ता, अंजिर, मनुका हे पाण्यात भिजवून खाल्याने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरतात, असे जाणकार सांगतात.सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्ट्या तर ते आहेच, पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक ‘श्रीमंत’ आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणे गरजेचे आहे. शरीराचे योग्य पोषण आणि आरोग्यासाठी सुकामेवा अतिशय उपयुक्त आहे. अनेकजण विविध प्रकारे सुकामेव्याचे सेवन करतात. शिवाय विविध खाद्यपदार्थ तयार करताना सुकामेवा वापरला जातो. काजू, बदाम, अक्रोड आणि मनुका इत्यादी सुकामेवा खाताना तो अन्य पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्यास दुप्पट फायदा होऊ शकतो. रव्याचा शिरा किंवा हलवा, तसेच गाजर आणि दुधी हलवा यासह लाडू किंवा अन्य पदार्थांमध्ये सुकामेवा मिसळला की या पदार्थांचीही ‘श्रीमंती’ वाढते. सुकामेव्याच्या मिश्रणामुळे उपरोक्त पदार्थ आवडीने खाल्ले जातात असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

सुकामेवा हा शरिरसाठी अतिशय फायदेशीर घटक आहे. सुकामेव्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सुकामेवा गुणकारी ठरतो. सुकामेवा खाण्या आधी स्वच्छ धुवून तो पाण्यामध्ये भिजत ठेऊन नंतर खावा. त्यामुळे तो पचण्यास हलका राहतो. त्याचे एकदम सेवन केल्यास त्रास होऊ शकतो. नियमित आणि थोड्या प्रमाणात सुकामेवा खाणे गरजेचे आहे.

अलिकडे दिवाळी सणात मिठाई ऐवजी सुकामेवा देणे पसंत केले जाते. मिठाईत होणारी भेसळ किंवा त्यातील साखरेचे प्रमाण आरोग्याला घातक ठरू शकते. शिवाय मिठाई ही ठराविक कालावधीनंतर खाण्यायोग्य राहत नसल्याने फेकून द्यावी लागते. अशा वेळी सुकामेवा उपयुक्त ठरतो. शरीराला तो उपयुक्त तर आहेच, शिवाय हवाबंद कंटेनर किंवा डब्यामध्ये तो ठेवून दिला की तो बरेच दिस जैसे थे राहतो. त्यामुळे पाहिजे त्या वेळी किंवा ठराविक वेळी सुकामेव्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो.

सर्वसामान्यांच्या खिशाला सुकामेवा परवडणारा नसला तरी कधी तरी तो थोडाफार घरात आणून सर्वांनी, विशेषतः लहान मुलांनी, खाणे कधीही हितकारकच आहे. थंडीमुळे सुकामेव्याची चलती असून, बाजारात सर्व प्रकारचा सुकामेवा एकत्र (मिक्स ड्रायफ्रूट) असलेला उपलब्ध असल्याने त्याला मोठी मागणी असते.

सणासुदीच्या आणि थंडीच्या हंगामामध्ये सुकामेव्याला मागणी वाढते. काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अक्रोडची विक्री होते.
-छगन कारणी, अंकुर ड्रायफ्रूट, अलिबाग

वार्ताहर :-  रत्नाकर पाटील


 

First Published on: December 10, 2021 9:18 PM
Exit mobile version