बाळांच्या नाजूक त्वचेसाठी…

बाळांच्या नाजूक त्वचेसाठी…

Baby Skin

*बाळाला झोपवताना गादीवर किंवा उशीच्या जवळ झोपवावं.

*आंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल यांचं मिश्रण असलेल्या तेलाने बाळाचं मालिश करावं. त्यामुळे त्वचा मुलायम होते.

*ज्या ठिकाणी बाळाला आंघोळ घालणार असाल ती जागा थंड तर नाही ना किंवा तिथली खिडकी उघडी नाही याची प्रथम चाचपणी करून घ्यावी. तिथली जागा उबदार आहे याची खात्री करून घ्या.

*हिवाळ्यात बाळाच्या टाळूची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे बाळाच्या टाळूवर खपल्या दिसतात. त्या हाताने किंवा ब्रशने एकदम काढायला जाऊ नका. आंघोळीच्या वेळी एक मुलामय पंचा पाण्यात प्रथम बुडवून, पिळून घ्यावा. गरम पंचाने बाळाची टाळू थोडावेळ झाकून ठेवावी. असं दररोज केल्याने त्या खपल्या आपोआप पडायला सुरुवात होईल.

*थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बाळाला स्पंज बाथ घालणंही केव्हाही उत्तम ठरतं. त्याच्या अंगावर पाणी घालण्याऐवजी त्यांला स्पंजने पुसून घ्यावं. म्हणजे बाळाला थंडी लागत नाही.

*बाळाच्या केसांसाठी बेबी शॅम्पू आणि त्वचेसाठी मृदू-मुलायम साबणाचा वापर करावा.

*आंघोळ घालून झाल्यावर बाळाचं शरीर पंचा किंवा सुती फडक्याने व्यवस्थित कोरडे करावेत.

*बाळाच्या ओठाची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणं गरजेचं आहे. तिला पेट्रोलियम जेली किंवा बेबी लोशन लावावं. म्हणजे त्यांचे ओठ कोरडे पडणार नाहीत. ते मुलायम राहतील.

*बाळाला ताप येत असेल तर लहान बाळ लघवीवाटे शरीरातील पाणी सतत बाहेर टाकतात. तेव्हा त्यांची त्वचा कोरडी कशी राहील याकडे लक्ष द्या. मधूनमधून त्यांना पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडरीचं पाणी पाजावं. बाळ जेवत असेल तर त्याला फळांचा ज्युस पाजावा.

मालिश करण्यापूर्वी
बाळाच्या मालिशसाठी कोणतं तेल वापरावं यासाठी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.काही ठरावीक उत्पादनं अ‍ॅलेर्जिक किंवा रिअ‍ॅक्शन आणणारी असू शकतात. तुमच्या बाळाच्या शरीराला तेल लावण्यापूर्वी थोडं तेल त्याच्या हाताला लावून पाहा. जेणेकरून तेल अनुरूप आहे की नाही ते पाहता येईल. तेल लावलेल्या जागी बाळाला पुरळ आलं तर दुसरं पर्यायी उत्पादन लावून पाहा.

लेबलवरील घटक काळजीपूर्वक वाचा. नैसर्गिक घटक उदा. ऑलिव्ह आणि विंटर चेरी बाळाच्या त्वचेसाठी चांगले असतात. ऑलिव्ह तेल जीवनसत्त्व ‘इ’ने परिपूर्ण असतं. ते त्वचेला मऊ करतं, त्याचबरोबर संरक्षण आणि पोषण देतं. तसंच यात सूक्ष्मजीव निवारक गुणही आहेत जे त्वचेची काळजी घेतात.

बाळाच्या पोटाला हळूवारपणे तेल लावा आणि हळूवार व सौम्यपणे स्ट्रोक द्या. मालिश करताना गरजेपेक्षा जास्त जोर लावू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

First Published on: January 19, 2019 5:52 AM
Exit mobile version