फळांचे थंडगार घरगुती आईस्क्रिम

फळांचे थंडगार घरगुती आईस्क्रिम

फळ्यांपासून तयार करा झटपट घरगुती आईस्क्रिम

कडक उन्हामुळे सध्या जीव अगदी हैराण झाला आहे. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे सतत थंडगार काहीतरी खावेसे वाटत असते. यामध्ये थंडगार आईस्क्रिमला अधिक मागणी असते. मात्र, बंद डब्यातील आईस्क्रिम खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसल्याने घरच्या घरी तयार केलेले फळ्यांचे आईस्क्रिम केव्हाही खाणे उत्तम, असेच काही खास आणि झटपट घरच्या घरी तयार करता येणारे आईस्क्रिम आपण पाहणार आहोत.

मँगो आईस्क्रिम

साहित्य :

५०० मिली थंडगार फ्रेश क्रिम

८०० मिली आंब्याचा रस

१ टीन कंडेन्स्ड मिल्क

आंब्याचे तुकडे

केशर

खाण्याचा पिवळा रंग

कृत्ती :

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये थंडगार फ्रेश क्रिम घेऊन ती चांगल्या पद्धतीने फेटून घेणे. ही फ्रेश क्रिम थंड असणे फार गरजेचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र करुन घेणे. या तयार झालेल्या मिश्रणात खाण्याचा पिवळा रंग आणि आवश्यकता असल्यास केशर घालून हे सर्व सारण एकत्र करुन एकजीव करुन घेणे. त्यानंतर हे तयार झालेले मिश्रण एका पसरट भांड्यात सेट करुन २ तास फ्रिजमध्ये ठेऊन द्या. त्यानंतर थोडेसे घट झालेल्या मिश्रणात आंब्याचे तुकडे मिक्स करुन हे पुन्हा एकदा आईस्क्रिम सेट करुन ६ ते ८ तास फ्रिजमध्ये ठेऊन द्या, अशाप्रकारे तुमचे घरच्या घरी मँगो आईस्क्रिम तयार.

बनाना आईस्क्रिम

साहित्य :

२ केळी

२ चमचे दूध

काजू

बदाम

कृत्ती :

सर्वप्रथम केळ्याचे बारीक तुकडे करुन घेणे. हे तुकडे एका भांड्यात ठेऊन फ्रिजमध्ये काही वेळ थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर ते थंड झालेले तुकडे आणि दूध एकत्र मिश्रण मिक्सरमध्ये लावून घ्या. या तयार झालेल्या मिश्रणात काजूचे आणि बदामाचे काप मिक्स करुन हे सारण पुन्हा एकदा मिक्स करुन तयार झालेले मिश्रण ४ ते ५ तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा, अशाप्रकारे घरच्या घरी झटपट बनाना आईस्क्रिम खाण्यासाठी तयार.

पपई आईस्क्रिम

साहित्य :

१ पपई

१ कप कंडेन्स्ड मिल्क

१ कप दूध

२ कप फ्रेश क्रिम

/४ साखर पावडर

खाण्याचा केशरी रंग

कृत्ती :

पपई आईस्क्रिम तयार करताना सर्व प्रथम पपईमधल्या सर्व बिया वेगळ्या करुन त्याचा गर एका बाजूला काढून घेणे. त्यानंतर पपई मिक्सरला लावून तयार झालेल्या मिश्रणामध्ये कंडेन्स्ड मिल्क, फ्रेश क्रिम, साखरेची पावडर आणि खाण्याचा केशरी रंग एकत्र करुन हे सारण एकजीव करुन घेणे. त्यानंतर हे सारण बंद डब्यामध्ये ८ ते ९ तास ठेऊन द्यावे, अशाप्रकारे घरच्या घरी खाण्यासाठी पपई आईस्क्रिम तयार.

First Published on: May 25, 2019 7:00 AM
Exit mobile version