‘या’ मुहूर्ताला करा श्री गणरायाची प्रतिष्ठापना

‘या’ मुहूर्ताला करा श्री गणरायाची प्रतिष्ठापना

या मुहूर्ताला करा श्री गणरायाची प्रतिष्ठापना

आजपासून राज्यासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. ६४ कलांचा अधिपती गणराय आज भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत. गणरायाच्या आवडीच्या नैवेद्यापासून ते त्याच्या पूजेपर्यंत सर्वच गोष्टींची आपण गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहोत. आज मोठ्या भक्तिभावात, ढोल गजराच्या निनादात गणरायाचे आगमन होणार. पण बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करायची? असा प्रश्न आपल्याला दरवर्षी पडतो. त्यासंबंधी जाणून घेऊया.

गणरायाच्या पूजेचा मुहूर्त

यावर्षी आज २ सप्टेंबर २०१९ रोजी गणरायाचे आगमन होत आहे. आज सकाळी ४.५६ मिनिटांपासून चतुर्थीला सुरूवात होत आहे. मंगळवारी मध्यरात्री १.५३ मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. सकाळी ११ ते दुपारी १.४२ या कालावधीत श्रीगणरायाच्या पूजेचा योग्य मुहूर्त आहे.

श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना अशी करावी

प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात गणरायाच्या पूजा आणि आराधनेने करण्यात येते. दरवर्षी भाद्रपद चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करुन त्याची मनोभावे पूजा केली जाते. यंदा सुद्धा गणरायाच्या पूजेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पुढीलप्रमाणे साहित्याची निवड करा.

प्रतिष्ठापनेसाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे

गणरायाच्या आगमनापूर्वीच आपण त्याच्यासाठी सुंदर, सुरेख मखरांची खरेदी करतो. अनेकदा कल्पक युक्तींच्या आधारे घरच्या घरी मखर बनवतो. पण मखराप्रमाणेच गणपतीच्या स्थापनेसाठी चौरंग किंवा पाट याचीसुद्धा जरूरी असते. तेव्हा चौरंग किंवा पाट पूजेच्या साहित्य सुचीमध्ये सर्वात प्रथम ठेवावा. त्यानंतर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता आंब्याचे डहाळे, सुपाऱ्या, नारळ, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, समई, ताम्हण, जानवे, शेंदूर, पत्री, विड्याची पाने, फळे आदि पुजेच्या साहित्याची आधीच सूची करावी. जेणेकरून ऐन वेळी साहित्याची शोधाशोध करावी लागणार नाही. त्याबरोबरच पूजेनंतर देण्यात येणाऱ्या प्रसादासाठी मोदक, मिठाई, पेढे यासारखे गोड पदार्थ घरच्या घरी किंवा बाजारातून आणून सज्ज ठेवावे.

अशी करावी गणरायाची पूजा

गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रातःवेळी स्नानसंध्या आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे घरातील देवतांची पूजा करावी. त्यानंतर मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ पुसून, सारवून त्यावर पाट मांडावा. नंतर अक्षता पसराव्यात. त्यानंतर गणरायाचे आगमन होताच मूर्ती शूचिर्भूतपणे आसनावर बसवावी. गणरायाची स्थापना होताच द्विराचमन, प्राणायामादी करावे. त्यानंतर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांना गंधअक्षता-पुष्प अर्पण करावे. त्यानंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांच्या सहाय्याने तुपाचा स्पर्श करावा. त्यानंतर मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करुन प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणावेत.

First Published on: September 2, 2019 6:35 AM
Exit mobile version