यम्मी सूप

यम्मी सूप

Tomato Soup

घरातील मोठी माणसे खाण्याच्या बाबतीत कमीच नाकं मुरडतात. पण लहानगे मात्र हट्टाला पेटतात. त्यामुळे आईला लहानग्यांच्या खाण्याची चिंता सतावते. गाजर, टोमॅटो, पालक, भोपळा यासारख्या भाज्या लहान मुलांना जेवणात नकोच असतात. अशावेळी वेगळ्या पद्धतीने या भाज्या बनवून मुलांना खाऊ घालाव्यात.

गाजर, टोमॅटो, पालक, भोपळ्यापासून रुचकर सूप कसे बनवावे ते पुढीलप्रमाणे.                                        टोमॅटो सूप – २ टोमॅटो, १ गाजर, कांद्याची एखादी फोड, १ लहान बटाटा, २ मिरी दाणे, १ कप पाणी घालून कुकरच्या भांड्यात शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. लहान पाव कप दूध घाला. चिमूटभर साखर घाला. मीठ घाला. उकळून प्यायला द्या. याच पध्दतीनं लाल टोमॅटोऐवजी लाल भोपळा वापरूनही सूप करता येईल.

गाजर सूप – २ गाजरं, २ लहान बटाटे, १ लहान कांदा, २ मिरी दाणे असं सगळं कुकरच्या भांड्यात घाला. कपभर पाणी घालून शिजवा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. लहान पाव कप दूध घाला. मीठ घाला. उकळून प्यायला द्या. जरा मोठ्या मुलांना वरून थोडं लोणी घाला. याच पध्दतीनं गाजराऐवजी कोबी किंवा फ्लॉवर घालूनही सूप करता येईल.

पालक सूप – अर्धी जुडी किंवा २० पालकाची पानं, १ टोमॅटो, १ लहान बटाटा, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे हे सगळं कुकरच्या भांड्यात घाला. शिजवून थंड करा आणि मिक्सरमध्ये वाटा. पाव कप दूध घाला. वरून थोडी साय किंवा चीज घाला किंवा किसलेलं पनीर घाला.

चिकन सूप – कपभर चिकनचे सूप पीसेस (दुकानात तयार मिळतात) धुवून घ्या. थोड्याशा लोण्यावर किंवा तेलावर एक कांदा चिरून परता, त्यात ३ मिरी दाणे, २ लवंगा, १ लहान तुकडा दालचिनी घाला. त्यावर चिकनचे तुकडे घाला. मीठ घाला. हव्या असल्यास भाज्या घाला. मंद गॅसवर चिकनचा पूर्ण अर्क उतरेपर्यंत उकळा. नंतर चमच्यानं गरम मसाला काढून टाका. लहान मुलांना देताना चिकनची हाडं काढून द्या. हे सूप याच पध्दतीनं आजारी माणसांसाठी तसंच मोठ्या माणसांसाठीही करता येईल.

First Published on: February 16, 2019 4:43 AM
Exit mobile version