आरोग्यदायी भाज्या

आरोग्यदायी भाज्या

भाज्या

जंकफूडच्या जमान्यात वरण, भात, भाजी यासारख्या साध्या जेवणाकडे लहान मुले दुर्लक्ष करतात. त्यामुळे लहान वयातच भूक न लागणे, विस्मरण, थकवा, सांधेदुखी, चष्मा लागणे सारखे गंभीर आजार मुलांना जडतात. पालक, बीट, कोबी सारख्या भाज्यांना तर मुले नेहमीच नापसंती दर्शवतात. मात्र या भाज्यांमधील विशेष घटकांमुळे गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे जाणून घेऊयात अशाच काही आरोग्यदायी भाज्या.

शेवग्याच्या शेंगा – शेवग्याची पाने तसेच शेंग दोन्हीही आरोग्यदायी आहेत. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास शेवग्याच्या शेंगा तसेच पालेभाजी खावी. कावीळ झाल्यास शेवग्याच्या पानांचा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्रित करून प्यावे, आराम मिळतो. शेवग्याच्या शेंगा, तसेच पालेभाजी खाल्ल्यास पचनक्रियेशी संबंधित आजारांवर मात करता येते. तसेच शेवग्याच्या पानांचे चूर्ण हृदय रुग्णांसाठी उपयुक्त ठरते.

बीट – तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा ग्लास बीटचा रस नियमित प्यावा. तसेच मुतखडा व पित्ताशयाचा त्रास असलेल्यांनी बीटचे सेवन करावे. त्याचप्रमाणे शरीरातील रक्त वाढवण्यासाठीही बीट फायदेशीर ठरते.

तोंडलीचे फायदे – हाताच्या बोटाएवढ्या दिसणार्‍या तोंडलीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तोंडलीमध्ये कॅरोटिनव्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शिअमसारखे महत्त्वपूर्ण घटक आढळतात. मधुमेहींच्या रुग्णांनी तोंडली अवश्य खावी. कारण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्याचे महत्त्वपूर्ण काम तोंडली करते. त्याचप्रमाणे त्वचेच्या विकारांपासूनही तोंडली संरक्षण करते. तसेच सर्दी, खोकला, तसंच फुप्फुसांच्या आजारांवर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. हेपेटायटिस बी असलेल्यांनी या भाजीचं सेवन केल्यास रक्तातील कावीळ होत नाही. त्याचप्रमाणे तोंडलीचे नियमित सेवन केल्यास डोळे, किडणी, यकृत आणि हृदयाची काळजी घेतली जाते. आतड्यांचे कार्य सुरळीत होतं. ताप आलेल्या रुग्णांनी ही भाजी खाल्ल्याने ताप कमी होण्यास मदत होते. शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

पालक – जवळपास सर्वच पालेभाज्या आरोग्यदायी असतात. शरीराची ताकद वाढवून चपळता येण्यासाठी पालक भाजी खावी. पचनासंबंधित तक्रारींपासून दूर राहण्यासाठी पालक भाजीचे सेवन करावे. त्यातही कच्चा पालक तर खूपच गुणकारी आहे. कच्च्या पालकाच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते. पालकाच्या रसाने गुळण्या केल्यास खोकला तसेच फुफ्फुसाला आलेली सूज कमी होते. सर्वात महत्त्वाचे दृष्टिदोष असलेल्यांनी तर पालक अवश्य खावा.

कोबीचे फायदे – हल्ली चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरण्यात येणार्‍या कोबीचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास ही कोबी आरोग्यदायी ठरते. कोबीमुळे आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीत असलेले काही घटक शरीरात असलेल्या विषारी पदार्थांना शरीराबाहेर फेकून मेटाबॉलिझमला नियमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ताजा कोबीचे बारीक-बारीक तुकडे करून त्यात मीठ, काळीमिर्ची आणि लिंबाचा रस टाकून रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यानं 2-4 आठवड्यात बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. कोबीचा रस प्यायल्यानं पेप्टिक अल्सर म्हणजे पोटाच्या जखमा ठीक होतात. तसेच लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी त्यांना अर्धा ते एक ग्लास कोबीचा रस प्यायला द्यावा.

First Published on: February 27, 2019 4:31 AM
Exit mobile version