नितळ त्वचेसाठी खास घरगुती उपाय

नितळ त्वचेसाठी खास घरगुती उपाय

Skin care tips : त्वचा होईल चमकदार आणि कोमल ; फॉलो करा 'या'टिप्स

सुंदर त्वचा हे चेहर्‍याचे मुख्य आकर्षण आहे. त्वचा आकर्षक दिसण्यासाठी त्वचेची नियमित काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. सुंदर आणि नितळ त्वचेसाठी बाजारातील उत्पादने न वापरता घरच्या घरी देखील चेहरा नितळ आणि आकर्षक बनण्यास मदत होते. जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय.

डाग दूर होतात

४ चमचे उकडलेले तांदूळ, १ चमचा दूध आणि १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावावे. सुकल्यानंतर चेहरा धुवून टाकावा. यामुळे त्वचा तरुण आणि मुलायम होते, डागही नाहीसे होतात.

टॅनिंग दूर होते

मसुरच्या डाळीचे ५ चमचे घेऊन त्याची पेस्ट करुन घ्यावी. या पेस्टमध्ये ५ चमचे कच्चे दूध मिसळावे. हे चेहऱ्याला लावल्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. यामुळे टॅनिंग दूर होऊन त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्याही जातात.

चेहऱ्यावरील मुरुमे दूर होतात

१ टॉमेटो कुस्करुन चेहऱ्यावर लावावा. चेहरा सुकल्यानंतर १० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे जातात आणि त्वचेवरील तेलकटपणा निघून जातो आणि डेड सेल्सही गायब होतात.

नॅचरल ब्लीच

बटाट्याचा १ चमचा लगदा आणि १ चमचा दही मिसळून चेहऱ्यावर त्याची पेस्ट लावावी. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. यामुळे नॅचरल ब्लीचच्या रुपात रंग उजळतो आणि त्वचा मॉईश्चराईज होते.

चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होतो

१ गाजर किसून त्यात १ चमचा मध मिसळावे. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळून लावावी. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जातो आणि मुरुमांपासून सुटका होते.

त्वचा माईश्चराईज होते

१ केळे, पाव चमचा दही आणि २ चमचे मध मिसळून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. यामुळे त्वचा माईश्चराईज होते.

चेहऱ्यावरील लव

१ चमचा बेसनाच्या पिठात एका अंड्यातील पांढरा भाग आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा. यामुळे त्वचा माईश्चराईज होते आणि चेहऱ्यावरील लवही जाते.

त्वचा ताजीतवानी होते

२ चमचे ताजे दही घेऊन त्याने चेहऱ्यावर मालीश करावे. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. यामुळे त्वचा ताजीतवानी होते आणि रंग उजळण्यास मदत होते.

रंग उजळतो

बदामाची १ चमचा पेस्ट घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिसळावे. हे मिश्रण चेहऱ्यावर चोळून लावावे. १५ मिनिटांनी धुवून टाकावे. यामुळे त्वचेचा उजळपणा वाढतो आणि चेहऱ्यावरील डागही निघून जातात.

मऊ आणि मुलायम त्वचा

ऑलिव्ह आईलमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्याचबरोबर त्वचा मऊ आणि मुलायम होते.

First Published on: June 7, 2019 7:30 AM
Exit mobile version