घोट्याच्या दुखापती कशा टाळाव्यात

घोट्याच्या दुखापती कशा टाळाव्यात

घोट्याच्या दुखापती कशा टाळाव्यात

एखाद्या अवयवावर अतिरिक्त ताण पडल्याने किंवा तो झिजल्याने होणाऱ्या दुखापती या अतिवापरामुळे होणाऱ्या दुखापती समजल्या जातात. विशेषत: काही अवयवांना त्या क्रियांची पुनरावृत्ती झाल्यामुळे या दुखापती होतात. घोटे, गुडघे, कंबर, खांदे, कोपर आणि मनगट या शरीरातील प्रमुख साध्यांना अतिवापरामुळे दुखापती होतात. तणावामुळे होणारी दुखापत म्हणजे स्नायूंमधील तंतू ताणले गेल्यामुळे किंवा स्नायूबंध फाटल्यामुळे होणारी दुखापत. या दुखापती बहुतेकदा अवयवाला अतिताण दिल्यामुळे होतात. मुरगळण्यामुळे होणाऱ्या दुखापतींमध्ये अस्थिबंध (लिगामेंट्स) अति ताणले जातात किंवा फाटतात. त्यामुळे अनुकूल कंडिशनिंग, पुरेसे वॉर्म अप व्यायाम, योग्य पादत्राणे (फूटवेअर) वापरणे तसेच अचूक तंत्रांचा वापर यांच्या मदतीने यातील प्रमुख दुखापती दूर ठेवणे शक्य आहे.

वेदना होत असतील तेव्हा काही गोष्टी टाळाव्यात :

वेदना होत असतील तेव्हा व्यायाम करणे किंवा क्रीडाप्रकार खेळणे टाळावे. उत्तम संतुलित आहार घेऊन हाडांमधील क्षारांची घनता वाढवावी. तसेच वजन आटोक्यात ठेवावे. योग्य प्रकारचे शूज वापरावे. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या क्रियाशील राहावे आणि कोणताही क्रीडाप्रकार खेळण्यापूर्वी वॉर्म अप तसेच स्ट्रेचिंगचे व्यायाम करावे.

फ्रॅक्चरची लक्षणे :

घोट्यातील एक किंवा त्याहून अधिक हाडे तुटल्यास फ्रॅक्चर होते. वेदना, सूज, खरचटणे, हालचाल अशक्य होणे, प्रभावित भागावरील त्वचेचा रंग फिका पडणे ही फ्रॅक्चर झाल्याची काही लक्षणे आहेत. फ्रॅक्चरची समस्या शस्त्रक्रिया करून किंवा शस्त्रक्रिया न करताही हाताळली जाऊ शकते. केवळ एक हाडच तुटले असेल, हाड जागेवरून हलले नसेल आणि घोटा स्थिर असेल तर तज्ज्ञ डॉक्टर घोट्याची हालचाल थांबवून फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करू शकतात. घोटा अस्थिर झालेला असेल, तर फ्रॅक्चर दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासते. एवढेच नाही तर, डॉक्टर तुम्हाला घोट्यावर वजन पडू देऊ नका असेही सांगतील. जेणेकरून, हाडे योग्य आरेखनामध्ये पूर्वपदावर यावीत. फ्रॅक्चर पूर्णपणे भरून आले तरीही अस्थिबंध आणि स्नायूबंध बरे होण्यास त्याहून अधिक काळ लागतो. त्यामुळे, तुमच्या डॉक्टरांनी घोटा हलवणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा दिल्यावर तुम्ही शारीरिक उपचारांचा पर्याय निवडू शकता. यामुळे योग्य पद्धतीने चालण्याचे प्रशिक्षण, समतोल राखणे व हालचालींचे व्यायाम तुम्ही करू शकाल.

फ्रॅक्चर कसे टाळाल :

तुम्ही शरीराचा तोल नीट सांभाळू शकत नसाल, तर तोल सांभाळण्याचे प्रशिक्षण तसेच शारीरिक उपचार तातडीने करण्याची गरज आहे. उंचसखल पृष्ठभागावर पळू नका आणि योग्य ते फूटवेअर वापरा.

मुरगळणे :

मुरगळण्याच्या क्रियेत अस्थिबंधांचे नुकसान होते. हालचालीच्या सामान्य कक्षेबाहेर अस्थिबंधाची हालचाल केल्यामुळे संबंधित अवयव मुरगळतो. यामध्ये सूज, वेदना व ताठरपणा ही काही लक्षणे जाणवतात. याचे उपचार व्यक्तीनुसार बदलतात. ते दुखापतीच्या तीव्रतेवरही अवलंबून असतात. त्यांचे सौम्य, मध्यम किंवा तीव्र अशा गटांत वर्गीकरण केले जाते. वेदना व सूज कमी होईर्यंत उपचार केले जातात. त्यानंतर डॉक्टर व्यायाम सांगतात. मध्यम स्वरूपाच्या मुरगळण्यावरही राइस पद्धतीने उपचार केले जातात. मात्र, अशा परिस्थितीत बरे होण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. तुम्हाला घोटा मजबूत करण्यासाठी व्यायाम सांगितले जातात. मात्र, घोटा खूप जास्त प्रमाणात मुरगळला असेल, तर अस्थिबंध पूर्णपणे फाटतो किंवा तुटतो. ही दुखापत बरी होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. यामध्ये सांध्याची हालचाल पूर्ण थांबवली जाते आणि हालचालीची कक्षा पूर्ववत करण्यासाठी, ताणण्यासाठी, मजबुतीसाठी त्यानंतर दीर्घकाळ शारीरिक उपचार घ्यावे लागतात. याशिवाय एखाद्या रुग्णाला फाटलेल्या अस्थिबंधांच्या फेररचनेसाठी शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्लाही दिला जाऊ शकतो.

मुरगळणे टाळण्यासाठी :

शारीरिक क्रियेपूर्वी व नंतर ताणण्याचे व्यायाम करा. शरीराचा समतोल सुधारण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले विशेष व्यायाम करा.

स्ट्रेच :

स्नायू व स्नायूबंध अति ताणल्यामुळे होणाऱ्या दुखापतींना स्ट्रेच दुखापती म्हटले जाऊ शकते.स्नायू आणि स्नायूबंध अतिरिक्त ताणले जाण्याचे प्रकार सहसा पाय व पाठीच्या खालील भागाबाबत घडतात. सूज, खरचटणे, किंवा दुखापतीमुळे त्वचेवर लाली येणे, संबंधित भाग हलवला नाही तरी वेदना होणे, स्नायू किंवा स्नायूबंध कमकुवत होणे आणि त्या स्नायूचा वापरच अशक्य होणे आदी लक्षणे काही जणांमध्ये आढळतात. यावर उपाय म्हणून तुम्ही व्यायामासोबतच ‘राइस’ उपचार करू शकतात. सौम्य ताणाचे व्यायाम करू शकता. स्वत:च्या मनाने औषधे घेणे धोक्याचे आहे. तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या.

स्ट्रेन टाळण्यासाठी :

स्नायू मजबूत व लवचिक ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाने स्नायू प्रशिक्षण तसेच स्ट्रेचिंग व स्थैर्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

टर्फ टो :

पायाच्या अंगठ्याभोवती होणारी स्नायूबंधांची दुखापत म्हणजे टर्फ टो. कृत्रिम टर्फवर खेळणाऱ्या फूटबॉल खेळाडूंमध्ये ही दुखापत मोठ्या प्रमाणात आढळते. पायाचा अंगठा कठीण पृष्ठभागावर वारंवार वाकवावा लागत असल्याने नर्तक, जिम्नॅस्ट्स आणि बास्केटबॉलपटूंनाही या दुखापतीचा धोका असतो. याची परिणती स्नायूबंध ताणले जाण्यात किंवा फाटण्यात होऊ शकते.  तीव्र मुरगळीसाठी किंवा छोट्या फ्रॅक्चरसाठी डॉक्टर एखादा जोड (ब्रेस) किंवा अॅथलिट्स टेप किंवा खास शूज वापरण्याचा सल्ला देऊ शकतात. यामुळे दुखापतग्रस्त अवयवाला आधार मिळतो व तो लवकर बरा होतो.

First Published on: July 27, 2019 5:00 AM
Exit mobile version