मुलांना लावा वाचनाची सवय

मुलांना लावा वाचनाची सवय

Reading

सध्या सर्वच शाळकरी मुलं उन्हाळी सुट्टीची मजा लुटत आहेत. कोणी मामाच्या गावाला गेलं आहे. तर कोणी आपल्या आवडीचे छंदवर्ग लावले आहेत. तर काही जण फक्त सुस्तीत सुट्टी घालवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुलांमधील सुस्ती, आळस दूर करण्यासाठी काय करावे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. तेव्हा पालकांचा प्रश्नहि सुटेल आणि मुलांच्या उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग होईल यासाठी एकच पर्याय तो म्हणजे मुलांना वाचनाची सवय लावा. मुलांना वाचनाची सवय लावल्याने मुलांचा आळसात जाणारा वेळ सत्कारणी लागेल. शिवाय मुलांना विविध विषयांचे आकलन होण्यास वाचन उपयुक्त ठरेल. पण मुलांना वाचनाची सवय कशी लावावी? मुले वाचनाला वेळ देण्यासाठी तयार होतील का? असे अनेक प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. तेव्हा मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी उपयुक्त टिप्स पुढीलप्रमाणे…

वयानुरुप पुस्तकं वाचायला द्यावीत
अनेकदा पालकांमधेच वाचनाबाबत औदासिन्य आढळतं. मुलांना वेळ घालवण्यासाठी बरेचदा पुस्तकांऐवजी व्हिडीयो गेम्स, निरनिराळ्या प्रकारचे खेळ आणून देण्यात पालकांचा कल दिसून येतो. नविन खेळण्याच्या जोडीला पुस्तकंही विकत घेऊन देता येईल. मुलांसाठी पुस्तक विकत घेतांना त्यांची आवड निवड बघून विकत घ्यावं. न कळत्या वयात मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी वयानुरुप पुस्तकं वाचायला द्यावीत. अगदी लहान, लिहीता – वाचता न येणार्या वयात चित्ररूपी गोष्टींची पुस्तकं आणावीत. अशा पुस्तकांमधे भरपूर चित्रं असतात. मोठी व रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं मुलांचं लक्ष पटकन आकर्षून घेतात. चित्रांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं अधिक सोपं जातं. शाळेत जाणार्या मुलांच्या वयातल्या मुलांना लहान मुलांची पुस्तक असलेलं वाचनालयाच सभासत्व घेऊन देता येईल.

असे करावे वाचन
छोट्या छोट्या गोष्टी असलेली पुस्तकं मुलांना झोपतांना नियमीत वाचून दाखवावीत. गोष्टी वाचतांना पुस्तकातला मजकूर मोठ्याने वाचल्याने शब्दातील चढ-उतार, योग्य उच्चार, शब्दार्थ समजून घेणं सोपं होतं. तसंच, पुस्तक वाचतांना एक-एक शब्दावर बोट ठेऊन वाचावे. पुस्तकातली छोटीशी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचून मुलांना पाठ होते. अशावेळी गोष्टीचा थोडासा भाग वाचून दाखवून उर्वरीत भाग मुलांना पूर्ण करायला सांगावा. पुस्तकातला एखादा नाट्यप्रसंग, थोरांची चरित्र दमदार आवाजात, साभिनय वाचून दाखवल्यास मुलांनाही उत्सुकता वाटते.

पुस्तकांबाबत चर्चा करणे गरजेचे
जेवणाच्या टेबलावर पुस्तकांबाबत चर्चा करावी. यात मुलांनाही सहभागी करुन घ्यावं. अशा प्रकारच्या चर्चेतून मुलांची आवड समजून घेता येते. आपण वाचलेल्या एखाद्या पुस्तकातला आवडता भाग, प्रसंग यावर मुलांसोबत चर्चा जरूर करावी. मुलांनी वाचलेल्या पुस्तकाबाबत त्यांचं मत जाणून घ्यावं.आपल्या शहरात भरणार्या पुस्तक – प्रदर्शनांना मुलांसोबत भेट जरुर भेट द्यावी. पुस्तक प्रदर्शनाद्वारे बाजारात येणारी नविन पुस्तकं, लेखक यांची ओळख होते. अशा प्रदर्शनात बरेचदा सवलतीत पुस्तक उपलब्ध असतात. त्याचाही फायदा घेता येईल.

First Published on: May 2, 2019 4:33 AM
Exit mobile version