मोबाईल, हेच शारिरीक आणि मानसिक आजाराचे मूळ कारण

मोबाईल, हेच शारिरीक आणि मानसिक आजाराचे मूळ कारण

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल ही काळाची गरज झाली आहे. जगातील कोणत्याही व्यक्तीशी बोलायचं असो त्याला बघायचं असो,ऑफिसचे काम असो कि लाईट बिल भऱायचं असो वा मिटींग घ्यायची असो नाहीतर डॉक्टरांशी बोलायचं असो अथवा शाळा कॉलेजचे ऑनलाईन क्लासेस, पैसे ट्रान्सफर करायचे असो अशी जवळ जवळ सगळीचं काम मोबाईलवर होऊ लागली आहेत. यामुळे आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. विशेष म्हणजे मोबाईलच्या या कामाला वेळेचं बंधन नाही यामुळे जेवताना असो,काम करताना असो झोपताना असो की अगदी टॉयलेटमध्येही मोबाईल माणसांची सोबत करू लागला आहे. पण जेव्हा एखाद्या गोष्टीची अतिशोयक्ती होते आणि त्याचे बरे-वाईट परिणाम होतात. तसचं मोबाईलचही झालं आहे. मोबाईलच व्यसनचं लोकांना लागलं असून त्याचे बरे वाईट परिणाम शरीर आणि मनावर होत असल्याचे समोर येत आहे.

तज्ज्ञांच्या मते मोबाइल फोनचे आरोग्यावर होणारे परिणाम हे विविध घटकांवर अवलंबून असतात. यात काही परिणाम चांगले असून वाईट परिणाम मात्र दिर्घकाळ टिकतात.

यातील चांगल्या परिणामांचा विचार केलात तर आरोग्यासाठी काम करणारे मोबाईल ॲप्स. या अॅप्समुळे मोबाइलवरच तुम्हाला तुमच्या शरीराची माहिती मिळते. व्यायमाचा मागोवा , आहाराचे निरीक्षण आणि वैद्यकीय परिस्थिती मिळवून देण्यात मदत करतात. तसेच मोबाईलमुळे कॉलवर हेल्थ सेवाही उपलब्ध होते.

जर तुम्ही मोबाइल फोनचा दीर्घकाळ वापर करत असाल तर सावध व्हा. कारण मोबाईलचा जास्त वापर केल्याने वापरकर्त्यांना रेडिओफ्रिक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

तसेच जर झोपताना सुद्धा मोबाईल तुम्ही डोक्याजवळ, उशीखाली ठेवून झोपत असाल तर तुमच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे. कारण स्क्रीनवरील निळा प्रकाश तुमच्या झोपेत व्यत्यय आणतो. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही.

स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. डोळ्यांना विश्रांती न देता सतत तासनतास स्मार्टफोन वापरल्याने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, डोळे कोरडे होणे आणि अंधुक दिसणे हे सर्व होऊ शकते.  याव्यतिरिक्त, एखाद्याला आधीच डोळ्यांच्या समस्या असल्यास संगणक व्हिजन सिंड्रोम (CVS) अनुभवण्याची अधिक शक्यता असते.

मोबाईलचा परिणाम तुमच्या व्यक्तीमत्वावरही होतो. जर्नल पर्सनॅलिटी अँड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आणि इतर अनेक फोन ॲडिक्शन तथ्यांनुसार, स्मार्टफोनचा जास्त वापर हा खराब आणि नकारात्मक मूडशी थेट जोडलेला आहे. मोबाईल रात्रंदिवस वापरल्याने नैराश्य येते. नैराश्यामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात याबद्दल निदर्शन नोंदवण्यात आले आहे.

सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या झोपेची गरज असते. पण मोबाईलच्या रात्री उशीरापर्यंत वापरामुळे झोप पूर्ण होत नाही. परिणामी सतत मोबाईलवर असणाऱ्या व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा सारखे आजार जडतात.

तसेच लेट स्क्रीन टाईममुळे तुमच्या मानेवर आणि पाठीच्या वरच्या भागावर ताण पडतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या प्रकाशन HealthEssentials मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, प्रत्येक वेळी जेव्हा आपण मान खाली करून मोबाईल चेक करत असतो. त्यावेळी मानेवर जवळपास 60 पौंड दाब येत असल्याचे म्हटले आहे.. मोबाईलच्या या अतिवापरामुळे मणक्यामध्ये अनेकदा समस्या निर्माण होतात. या लक्षणांना ‘टेक्स्ट नेक’ असे नाव देण्यात आले आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे चिंता, नैराश्य आणि एकटेपणाच्या भावनांसह मानसिक आरोग्य समस्यांमध्ये वाढ होते. यामुळे मोबाईलचा वापर जपून आणि आवश्यक असेल तेव्हाच करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

First Published on: May 3, 2024 6:46 PM
Exit mobile version