पिरियड्सबद्दल मुलींबरोबर मोकळेपणाने बोला

पिरियड्सबद्दल मुलींबरोबर मोकळेपणाने बोला

मासिक पाळीत झालेला त्रास सहन न झाल्याने किशोरवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना मालाडच्या मालवणीत मंगळवारी (ता. 26) समोर आली होती. अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आश्‍चर्य व्‍यक्त केले जात आहे. मासिक पाळी हा मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर विषय आहे. एका ठराविक वयानंतर आपल्या मुलांना मासिक पाळीविषयी माहिती देणे गरजेचे आहे आणि आता या घटनेनंतर पुन्हा यावर विचार करणे पालकांना भाग आहे.

बरेचदा पालकांना या विषयावर मुलीशी नक्की कोणत्या वयात बोलावं अथवा त्यांना मासिक पाळीविषयी कसे समजावून सांगावं हे कळत नाही. त्यामुळे काही सोप्या टिप्स तुम्ही जाणून घेतल्यास मासिक पाळीबाबत मुलींशी कसं बोलावं हे तुम्हाला कळेल आणि मुलींना आणि पालक म्हणून तुम्हालाही त्रास होणार नाही.

जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा ती गोंधळलेली असते. तिला मासिक पाळीबद्दल कधीही सांगितले गेले नाही किंवा त्यासाठी तयार केले गेले नाही. ग्रामीण आणि आदिवासी भागात, मासिक पाळीच्या मुली किंवा स्त्रीला अनेकदा वेगळे केले जाते, वेगळ्या खोलीत ठेवले जाते. पाच-सहा दिवसांच्या मासिक पाळीच्या कालावधीसाठी अनेकदा जनावरांसह जनावरांच्या शेडमध्ये ठेवा आणि शौचालय वापरण्यास परवानगी नाही. मासिक पाळीमुळे अनेक मुली शाळेत जाणे बंद करतात. आणि मासिक पाळीबद्दलच्या प्रतिकूल वृत्तीमुळे मुली आणि स्त्रियांच्या स्व-प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मोकळेपणाने बोला
अजूनही अनेक घरांमध्ये मासिक पाळीबाबत मोकळेपणाने आणि खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे मुलीला लहानसहान गोष्टीतून आईने याबाबत सांगायला सुरूवात करावी. मासिक पाळी म्हणजे कसा रक्तस्राव होतो आणि त्याने आरोग्य कसे व्यवस्थित राहाते हे सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करावा.

मासिक पाळीविषयी जागरूकता
प्रत्येक मुलीला वयाच्या १० व्या वर्षानंतर मासिक पाळीविषयी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. मासिक पाळी म्हणजे काय असतं आणि त्यात कशी काळजी घ्यावे, हायजिन कसे सांभाळावे यासह मासिक पाळीचे महत्त्व काय आहे हेदेखील त्यांना याच वयात समजावावे. जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यांना या वयात कळणार नाही असे पालकांनी समजू नये. सोप्या शब्दात त्यांना माहिती द्यावी

पॅड्स, टॅम्पॉन वा मेन्स्ट्रूअल कप
मासिक पाळीच्या दिवसामध्ये पॅड्स, टॅम्पॉन वा मेन्स्ट्रूअल कप यापैकी कशाचा वापर करता येईल. याचे काय फायदे होतात अथवा कोणत्या गोष्टीचा वापर अधिक कम्फर्टेबल होईल हे आईने सांगितल्याशिवाय मुलींना कळणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता मुलींना या सर्व पर्यायांविषयीदेखील माहिती द्या.

हार्मोनल बदलाविषयी सांगा
मासिक पाळीदरम्यान हार्मोनल बदल होतात. पाळीपूर्वी नैराश्य येण्याची शक्यता असते. पहिल्यांदाच रक्त पाहिल्यामुळे मुली घाबरतात. त्यामुळे आई-वडिलांनी मानसिक आणि शारीरिक बदल किशोरवयीन मुलांना समजावून सांगितले पाहिजेत. शारिरीक शिक्षण, प्रौढावस्था याबाबत माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे.

पालक हेच पहिले मित्र
मासिक पाळी अथवा एखाद्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी पालकांना आपल्या मुलीचे मित्र व्हावे लागते. यामध्ये कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. मासिक पाळीत प्रत्येक मुलीला दर महिन्यात सामोरे जावे लागणार असते, त्यामुळे मित्रांप्रमाणे संपूर्ण आणि स्पष्टपणे माहिती द्यावी आणि त्यांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन पालकांशिवाय कोणीच नीट करू शकत नाही हे लक्षात घ्या.

First Published on: March 30, 2024 1:43 PM
Exit mobile version