Money Saving- पालकांनो मुलांना द्या बचतीचे धडे

Money Saving-  पालकांनो मुलांना द्या बचतीचे धडे

सध्याच्या काळात मुलांना उच्च शिक्षण देणे आणि उत्तम राहणीमान देणे एवढेच पालकांचे कर्तव्य राहीलेले नसून मुलांना पैशांचे व्यवस्थापन देणे हे देखील गरजेचे झाले आहे. कारण आपल्यापैकी बरेचजण प्रेमापोटी मुलं मागेल ते त्याला देत असतात. यावेळी एखादी गोष्ट आवाक्याबाहेरची जरी असली तरी पालक कर्ज काढून मुलांचे लाड पुरवतात. पालक मुलांच्या प्रेमापोटी जरी हे करत असले तरी त्याचे वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतात.

कारण आई बाबांना इमोशनली ब्लॅकमेल केलं की आपल्याला हवं ते मिळतं हे एकदा का मुलांना कळायला लागलं तर त्यांच्या मागण्यांच सत्र कधीच थांबत नाही. यामुळे पालकांवर मनस्तापाची वेळ येते. यासाठी मुलांना लहानपणापासूनच पैशाचे महत्व पटवून देणं हे पालकांच काम आहे. यासाठी सर्वात आधी पालकांना आर्थिक शिस्त हवी. नाहीतर जर आई बाबाचं खाण्यापिण्यावर, चैनीच्या वस्तूंवर किंवा इतर गोष्टींवर फार विचार न करता पैसे उधळत असतील तर मुलं त्यांचेच अनुकरण करू लागतात. अशावेळी मुलांवर कितीही चांगले संस्कार केलेले असतील तरी देखील मुलं पैशांच्या बाबतीत तडजोड करत नाही. कारण त्यांना पैशाचे महत्व ते कमावण्याासठी करावे लागणारे कष्ट आणि बचतीचे धडेच मिळालेले नसतात. यामुळे पालकांनी कितीही पैसा असला तरी मुलांना बचतीचे धडे द्यायलाच हवेत.

अथवा आपल्या आई बाबांकडे पैशाचा बराच संचय आहे या थाटात मुलं पैसे उधळू लागतात आणि संचय संपू लागल्यानंतर मुलं संभ्रमित होतात. कारण बचतीचे आणि आर्थिक अडचणीचा सामना कसा करायचा हेच त्यांना माहीत नसतं. यामुळे मुलांना लहानपणापासूनच पैशाचे नियोजन शिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी नक्की काय करावे ते बघूया.

बचतीचा गल्ला ( पिग्गी बँक)
तुम्ही तुमच्या मुलांना एक पिग्गी बँक द्या. आणि सांगा की पॉकेट मनीमधले जे काही पैसे ते या पिग्गी बँकेत साठवतील ते त्यांचे असतील. जर तुम्ही त्यांना दर महिन्याला पॉकेटमनी देत ​​असाल तर तुम्ही त्यांना समजावून सांगा की त्यांनी त्यातील काही पैसे साठवून पिगी बँकेत टाकावेत. जसे जसे ते या पिग्गी बँकेत पैसे टाकतील आणि ती हळूहळू भरेल ते पाहून मुलांना नक्कीच आनंद तर होईलच पण बचत करण्याचे गुणही शिकतील. पैशांचे व्यवस्थापन शिकवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

बजेट शिकवा
मुलांना पॉकेट मनी बजेट शिकवा. याद्वारे, त्यांना मिळालेले पैसे कोणत्या कामासाठी वापरायचे आहेत आणि कोणत्या वस्तूंसाठी किती पैसे ठेवायचे आहेत हे समजू शकेल. त्याच्या मदतीने तो पैशाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतील.

मनी बोर्ड गेम
तुम्ही तुमच्या मुलांसोबत मनी बोर्ड गेम खेळा . हा गेम खेळल्याने मुलांना बचत, पैशाशी संबंधित व्यवहार आणि बजेटिंग कळेल.

बचतीचे मूल्य
तुम्ही पैशांची बचत कशी करता ते मुलांना सांगाच पण त्याबरोबरच तुम्ही येथपर्यंत बचत करून कसे पोहचलात ते ही सांगा. त्यामुळे मुलांना बचतीचे फायदे कळतील.


Edited By- Aarya Joshi

First Published on: April 25, 2024 2:47 PM
Exit mobile version