गरोदर महिलांनी घ्यायची काळजी

गरोदर महिलांनी घ्यायची काळजी

Pregnant Women

उन्हाळयात गरोदर महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते, अन्यथा उन्हाळा कष्टप्रद होतो. घरातील तसेच घराबाहेरील साधी कामे करताना सुद्धा गरोदर महिलांना थकवा, अतिघाम आदी त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे गरोदर महिलांनी उन्हाळ्यात उष्माघातासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. ज्वर किंवा उष्णतेमुळे गर्भाधारणेच्या आसपास, म्हणजे पहिल्या तीन महिन्यांमध्ये मातेचं तापमान 102 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास गर्भामध्ये काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते.परिणामी गर्भाच्या मेंदूची वाढ न होणं, त्यास कवटी नसणं, मणक्यांमध्ये दोष आदी व्यंग गर्भात निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे अतिउष्णता ही काटेकोरपणे टाळली पाहिजे.

उष्माघात यापेक्षा गंभीर असतो. त्यावेळी शरीराचं तापमान 105 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं. पटकन उपचार न केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. गरोदरपणात शारिरीक तापमान वाढलेलं असतंच. त्याबरोबर वाढलेल्या रक्तसंचामुळे उन्हाळ्यात अस्वस्थता जास्त होते. शरीरातील रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. अति तापमान किंवा उष्माघातामुळे माता आणि गर्भ दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो. या कारणासाठीच गरोदरपणात गरम पाण्याचा टब किंवा स्टीम बाथ न घेण्याचा सल्ला दिला जातो. उष्माघातामुळे गर्भपात, कमी दिवसांची प्रसूती अथवा माता मृत्यू होऊ शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसात गरोदर मातांनी विशेष काळजी काळजी घेणं आवश्यक आहे. गरोदरपणात रक्तदाबाचं नियंत्रण बदललेलं असतं. परिणामी उष्माघाताचा धोका वाढतो. अति उन्हाच्या कडाक्यात गरोदर आणि बाळंतीणींनी बाहेर पडू नये. शिवाय अति उकाड्यामुळे घाम येणं, कंड, बुरशी, लघवीचा जंतूसंसर्ग अति प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसात गरोदर महिलांनी भरपूर पाणी आणि पाणीदार पदार्थांचं सेवन, कॉफी आणि क्षार कमी प्रमाणात घेण्यानं शरीरातील पाणी व्यवस्थित वापरलं जाऊ शकतं. तसेच या दिवसात काम करत असताना मधे ब्रेक घेणं आवश्यक असतं.

First Published on: April 1, 2019 4:18 AM
Exit mobile version