तरुण जोडप्यापुढील समस्या

तरुण जोडप्यापुढील समस्या

Young couples

आजच्या तरुण पिढीच्या समस्या फार वेगळ्या असल्याच दिसून येत आहे. लग्न झालेल्या तरुण जोडप्यांना हव्या असणार्‍या गोष्टी भिन्न आहेत. नात्यात रुसवे फुगवे हे आलेलेच. पण आधुनिक युगात त्याचे स्वरुप बदलेले दिसून येत आहे. अलिकडे नात्यात ब्रेक घेण्याचे प्रमाणही वाढलं आहे.

नोकरीतील स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, घरखरेदी, पूर्वीचा जगण्याचा क्रम आता बदलला आहे. पूर्वी लग्नानंतर फक्त पुरुष निर्णय घ्यायचे आता मात्र अनेक निर्णय हे दोघे मिळून असतात. त्या दोघांच्याही निर्णयात तफावत निर्माण झाली की, त्यांच्या नात्याची घडी हमखास विस्कटतेच विस्कटते.

मुल न होणे ही समस्या जशी काही जोडप्यांना सतावते तशीच काहीशी समस्या आजकालच्या जोडप्यांना आपण मुल होऊ द्यावे की नाही याबद्दल सतावताना दिसतेय. हा प्रश्न अनेक जोडप्यांपुढे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. मुल हवे की नको, नको तर सध्या नको की कधीच नको, त्यातही एकवरच थांबायचे की दुसरे पण मुल होऊ द्यायचे? असे एक ना अनेक प्रश्न पुढे उभे राहत आहेत. यावर दोघांचेही एकमत झालं नाही की सर्वच बिघडतं. कारण आजच्या आधुनिक काळात नवरा व बायको दोघेही स्वतंत्र विचाराचे असतात. दोघांनाही स्वत:चं करिअर असतं. त्यामुळे करिअरच्या काळात मुलाची जवाबदारी नको असेही अनेक जोडप्यांना वाटत असतं.

लग्नानंतर आयुष्य सुखी व्हावं असं वाटत असेल तर लग्नाआधी काही गोष्टींवर जोडीदाराबरोबर चर्चा करणे आवश्यक असते. जी मुल होण्याच्या विषयावर तर केलीच जात नाही. लग्न जुळते वेळी फार-फार तर एकमेांची आवड, छंद, करिअर याविषयी चर्चा केली जाते. पण अपत्याबाबत चर्चा केली जात नाही. किंवा ही चर्चा लग्नापूर्वीच कशी करावी या संकोचामुळेही होत नसावी. किवा या विषयावर लग्नानंतर बोलता येईल असं मानलं जातं. त्यातच जर जोडीदारासोबत इतर विचार जुळत असतील तर अपत्याबाबतही विचार जुळतील हे गृहीत धरल्या जातं.

जोडीदाराचे अपत्याबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नसेल, मुलाच्या जन्माचे प्लॅनिंग, त्याचे पालनपोषण, त्याचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पतिपत्निच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

खरं तर लग्न मोडण्याची अनेक कारणे असू शकतात. तुमचं प्रोफएशन हे सुद्धा अनेकदा कारणीभूत ठरु शकतं. नोकरी निमित्य सतत बाहेरगावी जाणे किंवा ऑफिसमधून सतत उशिरा येणे. अशावेळी जोडीदाराने एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. लग्नापूर्वीच एकमेकांच्या व्यवसायिक जबाबदार्‍या समजून घेणे आवश्यक आहे.

कुटूंबातील सदस्यांसोबत होणारे मतभेदही जोडप्यामध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतं.बर्‍याचदा अस दिसून येत की, कुटूंबातील सदस्य जुण्या विचार सरणीचे असतात आणि जोडपे आधुनिक विचार सरणीचे, त्यामुळे त्यांच्यात सतत वैचारीक मदभेद होत असतात. त्यामुळे लग्ना नंतर जास्तित जास्त जोडप्यांमध्ये कुटूंबातील सदस्यावरुन मतभेद होताना दिसून येतात.

दोघांपैकी एकाला एकत्र कुटुबात राहायच असतं तर दुसर्‍याला स्वतंत्र रहायचं असतं. यावरुनही अनेकदा मतभेद होताना दिसतात. त्यामुळे लग्न करतांना या सर्वच गोष्टींचा विचार करुन आधीच चर्चा करायला हवी.

First Published on: December 19, 2018 5:18 AM
Exit mobile version