रूपकुंड ट्रेक-अस्तित्वाचा शोध

रूपकुंड ट्रेक-अस्तित्वाचा शोध

फक्त रूपकुंड ट्रेकसाठी आमच्या उशीरा उगवण्याच्या सवयीवर मात करून दोन तास आधी आम्ही बोरीवलीला पोहोचलो. त्यामुळे ट्रेन वैगरे चुकू शकेल असा विचारही मनाला शिवला नव्हता. पण तरीही त्यानंतर जो काही खो झाला त्यातून एकच conclusion निघालं… भाई जिसका ट्रेलर ही इतना जबरदस्त हो वो movie तो हिट ही होने वाली थी… आणि तसच झालं.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड मधील १६५०० फुटावर असलेलं mysterious कुंड आम्हाला चेतावत होता. या कुंडाच्या आसपास मानवी हाडं आढळतात. यावर आधारीत अनेक दंतकथा आहेत. या सगळ्याची उत्सुकता मनात बाळगुन आमचं एक-एक पाऊल पुढे पडत होतं. destination दृष्टीक्षेपातच नव्हतं. ते लवकर दिसावं याची उत्सुकता होती पण घाई नव्हती. कारण वाटेवर आम्ही फक्त चालत नव्हतो तर अनुभवाचे एक-एक बिंदू जोडत होतो. सुर्य मावळायचा- उगवायचा, रात्र व्हायची आणि दिवस संपायचा… इतकच काय ते कळत होतं. तास काटा सुट्टीवर होता, मिनीट काटा-सेकंद काटा कोणत्या कानाकोपर्‍यात जाऊन बसले होते त्याचा थांगपत्ता नव्हता. वार-तारीख यांना तर आम्ही गृहितच धरलं नव्हतं. लोहजंगला पोहोचल्यावर सगळ्यांना statue देऊन तिथेच बसवण्याचे आदेश आले होते. वेळ थांबली हाती.

क्षणांची जुळवाजुळव होत होती. आम्ही पुढे चाललो होतो. वेळ मात्र मंदावली होती. १५ पावले चालल्यावर आमचा श्वास विश्रंती घेत होता. श्वासाच्या नावाखाली शरीर मोठा pause घेत होतं. पाण्याच्या बॉटल्स रिकाम्या होत होत्या. त्यांची तहान भागवायला आम्ही लहान झरे अधून-मधून शोधत होतो. गवताचा हिरवागार सडा पडला होता. त्याची डोळ्यांना इतकी सवय झाली होती की बंद डोळ्यांनाही रंग काळा नाही हिरवाच दिसत होता. moody ढगांचं मात्र काही कळत नव्हत. कधी आकाशाला पूर्ण पांघरूण घालायचे तर कधी स्वतंत्र पूंजके ठिपक्यांची रांगोळी काढायचे. त्यांचा खट्याळपणा हिरव्या गवताला सावळा करत होता. एखाद्या नावजलेल्या कलाकराने, तन-मन-धनाने रंग ओतून आपल्या कुंचल्यातून काढलेल्या चित्राचे प्रदर्शनच पाहतोय असं प्रत्येक क्षणाला वाटत होतं.

काही काळ सोशल लाईफपासून दूर राहिल्यामुळे लहान-लहान गोष्टींची किंमत कळत होती. विश्वासाच्या चौकटीत बसलेला नात्यांचा ओलावा त्या अनोळखी समुहात पण जाणवत होता. प्रत्येक क्षणाला आयुष्याची किंमत कळत होती. पडणार्‍या प्रत्येक पावलात स्वत:ला जिंकण्याचा अनुभव येत होता. रूपकुंड पोहिल्यानंतर आम्ही ते खडतर समिट पूर्ण केलं याचा तर आनंद होताच मात्र प्रकर्षाने वाटलं की…

नकळत आपण स्वत:भोवतीची चौकट ओलांडतो,
कोणत्याही वाटेवर न जाता, स्वखुशीने भरकटतो,
आपल्याला काहीच मिळवयाचं नसतं, काही गमवायचही नसतं..
फक्त स्वत:त हरवायचे असतं…

-सुविधा लोखंडे

First Published on: November 27, 2018 4:59 AM
Exit mobile version