उन्हाळ्यातील त्वचाविकार

उन्हाळ्यातील त्वचाविकार

घामोळ्या

सध्या कडक उन्हाळा सुरू असून, बाहेर फिरताना अंगातून घामाच्या धारा वाहतात. अनेकदा सतत येणार्या घामामुळे त्वचा खरबरीत होणे, पुरळ येणे, लाल रंगाचे डाग आदी त्वचाविकार उद्भवतात. त्वचेशी निगडीत काही त्रासांना एकत्रितपणे घामामुळे येणार्या घामोळ्या असे म्हटले जाते. अति उष्ण आणि दमट वातावरणात राहाणार्‍या लोकांना घामोळ्यांचा त्रास अधिक जाणवतो. अशा वातावरणात राहिल्याने खूप जास्त घाम येतो त्यामुळे घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि त्यामुळे घामोळ्या येतात.

घामोळ्या सर्वसाधारणपणे मानेवर तोंडावर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर, कपाळावर आलेल्या दिसून येतात. घर्मग्रंथी फुटल्या की मग त्वचेवर लहान लहान छोटे लाल रंगाचे डाग दिसतात त्यामुळे त्वचेचा मुलायमपणा जाऊन ती खरबरीत लागते.

कारणे
घामोळ्या येण्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. जसे घाम येणे, घर्मग्रंथी बंद झाल्याने होणारा जीवाणूजन्य संसर्ग किंवा अविकसित घर्मग्रंथी त्याव्यतिरिक्त व्यक्तीशी निगडीतही काही कारणे आहे जसे अतिस्थूलपणा किंवा अतिवजन, अनारोग्यकारी जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी, मद्यपान, अतिधूम्रपान तसेच काही औषधांचे दुष्परिणाम त्याचबरोबर हल्लीच्या काळात तणावग्रस्त जीवनशैली, अति प्रमाणात तेलकट पदार्थ आणि जंक फूडचे सेवन करणे. तसेच अतिघट्ट कपड्यांमुळेही त्वचेला हवा न लागल्याने घामोळे येते.

लक्षणे
सर्वसाधारणपणे घामोळ्यांची लक्षणे म्हणजे त्वचेवर लाल रंगाचे बारीक पुरळ येते, त्वचेला खाज येते, त्वचेचा दाह होतो. वातावरण बदलले किंवा उन्हाळा सुरु झाला की घामोळ्या येतात.

असा करा घामोळ्यांना प्रतिबंध

थंड वातावरणात राहाण्याचा प्रयत्न करावा किंवा वातानुकुलित वातावरणात रहावे. घामोळ्यांमुळे येणारी खाज कमी करण्यासाठी दिवसातून दोन तीन वेळा गार पाण्याने अंघोळ करावी.

उन्हाळ्यात सैलसर, सुती कपडे परिधान करावे आणि कृत्रिम धाग्याचे कपडे वापरु नयेत. जेणेकरुन हवा खेळती राहते
भरपूर पाणी प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच रसदार फळे खावीत.

घामोळ्यांवर कोणतेही क्रीम किंवा तेल लावू नये त्यामुळे घर्मछिद्रे बंद होतील आणि समस्या आणखी वाढेल.

First Published on: April 4, 2019 4:10 AM
Exit mobile version