मधुमेहींसाठी खेळ, व्यायामाचे महत्त्व – भाग १

मधुमेहींसाठी खेळ, व्यायामाचे महत्त्व – भाग १

Exercise

शारीरिक व्यायाम, आहार, औषधे आणि शिक्षण हे मधुमेहाच्या परिणामकारक व्यवस्थापनासाठीचे चार स्तंभ आहेत. डायबेटिस मेलिटस हा एक चयापचय संस्थेचा दीर्घकालीन आजार असून इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनला होणारा प्रतिबंध किंवा या दोहोंमुळे रक्तातील शर्करेची वाढलेली पातळी हे त्याचे लक्षण असते. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३ मार्ग आहेत – आहार, इन्सुलिन/औषधे आणि व्यायाम. व्यायाम म्हणजे व्यायामशाळेत केलेला शारीरिक श्रमांचा व्यायामच नाही तर दिवसाला ३० मिनिटे चालणे हासुद्धा एक प्रकारचा व्यायामच असतो. या व्यायाम योग्य प्रकारे केला तरी त्याचा मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी चांगला लाभ होऊ शकतो. व्यायामुळे मधुमेहामध्ये सुधारणा होतेच, त्याचप्रमाणे जीवनमानही सुधारते.

मधुमेहींसाठी डॉक्टरांकडून व्यायाम व शारीरिक हालचाल वाढविण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि त्यावर नियंत्रण राहते. कोणताही व्यायाम किंवा शारीरिक हालचाल ही आरोग्यासाठी चांगली असते हे प्रत्येकालाच माहीत असते, पण मधुमेहींसाठी याचे विशेष महत्त्व असते. व्यायामुळे रक्तातील शर्करेवर नियंत्रण मिळविण्यास मदत मिळतेच, त्याचप्रमाणे तुमची मनस्थिती, आत्मविश्वास आणि हृदयाचे आरोग्य इत्यादींमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

मधुमेहींना व्यायामाच्या होणार्‍या लाभांमध्ये खालील घटकांचा समावेश आहे :

♦उर्जा खर्च होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
♦इन्सुलीन संवेदनशीलता वाढते आणि इन्सुलनिची गरज किंवा तोंडावाटे घेण्याच्या हायपोग्लायसेमिक औषधांची आवश्यकता कदाचित कमी होऊ शकते.
♦हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य, रक्तातील कोलेस्टरॉलची पातळी, रक्तदाबाची पातळी यात सुधारणा होते.
♦झोप आणि जीवनमानाचा दर्जा सुधारतो. यकृतातून होणारी ग्लुकोजची निर्मिती कमी होते. तसेच एचबीए१सी (३ ♦महिन्यांमधील साखरेची सरासरी पातळी) सुधारते. सुदृढतेची भावना वाढते.
♦व्यायाम करताना तुमच्या शरीरातून काही रसायने स्त्रवतात, जी तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करतात आणि तुम्ही अधिक ♦रिलॅक्स होता. तुमचा मानसिक ताण आणि नैराश्य हाताळण्यासाठी व्यायामाची मदत होते.
♦गरोदरपणात नियमित शारीरिक व्यायाम केला तर गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
♦ज्या महिलांना जेस्टेशनल डायबेटिस मेलिटस आहे, विशेषतः ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे किंवा ज्या लठ्ठ आहेत अशा महिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्यास गरोदरपणात अधिक वजन वाढणार नाही.

डॉ प्रदिप गाडगे, मधुमेहतज्ञ

First Published on: April 8, 2019 4:39 AM
Exit mobile version