मुलांच्या भाषिक कौशल्यावर होतो या जीवनसत्त्वाचा परिणाम

मुलांच्या भाषिक कौशल्यावर होतो या जीवनसत्त्वाचा परिणाम

Vitamin D

मुलांच्या बोलण्यामध्ये आढळणारे दोष हा संशोधनाचा मोठा विषय आहे. मात्र या दोषाचे मूळ त्या मुला-मुलींच्या मेंदूमध्ये असतो आणि मेंदूतल्या भाषेच्या केंद्रामध्ये काही कमतरता राहिली की, त्या मुलाला किंवा मुलीला स्पष्टपणे बोलता येत नाही. पण ही कमतरता नेमकी काय असते आणि ती का निर्माण होते यावर संशोधन करण्यात आले.

तेव्हा असे आढळले की, मूल गर्भात असतानाच्या काळात आईच्या आहारामध्ये ‘ड ’जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाला की, त्याचे परिणाम मुलांवर होतात. त्याच्या मेंदूमध्ये ही कमतरता राहून जाते. संशोधकांनी या संबंधात बरेच संशोधन केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, ज्या माता गरोदर अवस्थेत ‘ड’ जीवनसत्त्व प्राप्त करू शकतात, त्या मातांची मुले भाषिकदृष्ट्या सक्षम असतात आणि ज्या मातांना ‘ड ’जीवनसत्त्व कमी मिळते त्यांची मुले याबाबतीत सक्षम नसतात. या निरीक्षणांती निघालेल्या निष्कर्षाची माहिती ऑस्ट्रेलियातील पेडियाट्रिक्स या मासिकात छापण्यात आली आहे.

यापूर्वी अशा प्रकारचे अनेक प्रयोग झालेले आहेत. मातेच्या गरोदरावस्थेत तिला ‘ड’ जीवनसत्त्व किंवा ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त आहार मिळाला नाही तर त्याचे परिणाम मुलांच्या शरीरावर विशेषत: हाडांच्या मजबुतीवर आणि शारीरिक वाढीवरही होतात, असे मागे आढळून आलेले होते. परंतु या अभावाचे मनावर आणि मेंदूवर काय परिणाम होतात याचा खास अभ्यास केला गेला नव्हता. गेल्या दहा वर्षांपासून काही शास्त्रज्ञांच्या मनात अशी कल्पना आली आणि त्यांनी तसे प्रयोग केले. तेव्हा मुलांच्या भाषिक कौशल्यावर या ‘ड’ जीवनसत्त्वाचा परिणाम असतो असे त्यांना आढळले.

First Published on: December 19, 2018 5:53 AM
Exit mobile version