यंदाचे वर्ष सार्वत्रिक आरोग्याचे

यंदाचे वर्ष सार्वत्रिक आरोग्याचे

world-health-

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार २०३० पर्यंत शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यात युनिव्हर्सल हेल्थ (सार्वत्रिक आरोग्य) कव्हरेज हा महत्त्वाचा मुद्दा असून, त्यानुसार या वर्षी जागतिक आरोग्य दिनी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज वर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अंतर्गत सर्व समुदायातील लोकांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना न करता गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा हा उद्देश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यानुसार आयुष्यभर आवश्यक असणार्‍या आरोग्यासंदर्भात सर्व सेवांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार विविध आजारांविषयी माहिती, त्यावरील प्रतिबंध, रुग्णाचा उपचार, पुनर्वसन या सर्व प्राथमिक आरोग्य सेवा प्रणालींचा युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अंतर्गत पाठपुरावा करण्यात येणार आहे.

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देश सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीत जास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरील उपाय यावरच मर्यादित न राहता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगात सहा ठिकाणी या संघटनेची कार्यालये आहेत. दक्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंग्टन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत.

नवीन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादी कामे या संघटनेमार्फत केली जातात. ७ एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमाध्यमे आदिंमार्फत त्या विषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. हे वर्ष हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने युनिव्हर्सल हेल्थ (सार्वत्रिक आरोग्य) कव्हरेज वर्ष म्हणून घोषित केले आहे.

First Published on: April 7, 2019 4:27 AM
Exit mobile version