डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स का होतात?

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स का होतात?

डार्क सर्कल्स

अपुरी झोप, दिवसभराच्या कामाचा थकवा यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात. मात्र, डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स होण्यासाठी हीच एवढीच कारणे कारणीभूत नाहीत, तर त्वचाविकार, पिग्मेंटेशन, अ‍ॅलर्जी, शरीरातील पाण्याची कमतरता आदी कारणांमुळेही डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स दिसू शकतात.

पिग्मेंटेशनमुळे डार्क सर्कल्स
काहींच्या डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे ‘पिग्मेंटेशन’ मुळे असू शकतात. हे पिग्मेंटेशन काहींच्या बाबतीत आनुवांशिक असू शकते. दक्षिण आशियायी लोकांमध्ये अशाप्रकारचे पिग्मेंटेशन दिसून येते. पिग्मेंटेशनमुळे जर डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असतील, तर कितीही उपाय-उपचार केले तरी ही वर्तुळे हलकी होतात, पण नाहीशी होत नाहीत.

सोरायसिस किंवा एक्झिमा सारखे त्वचाविकार
ज्या व्यक्तींना चेहर्‍यावरील त्वचेवर सोरायसिस किंवा एक्झिमा सारखे त्वचाविकार असतील, त्यांच्याही डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येऊ शकतात. या दोन्ही विकारांमध्ये त्वचा लालसर किंवा गडद रंगाची दिसू लागते. तसेच सतत खाज सुटत असल्याने ही त्वचा आणखीनच काळसर दिसू लागते. त्यामुळे जर डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर एक्झिमा किंवा सोरायसिस असले, तर त्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असल्याप्रमाणे भासतात. ज्या व्यक्तींना सतत डोळे चोळण्याची सवय असते, त्यांच्या डोळ्याच्या आसपासची त्वचा वारंवार चोळली गेल्यामुळे काळसर आणि काहीशी जाडसर दिसू लागते. वारंवार डोळे चोळल्याने डोळ्यांच्या आसपासची त्वचा रगडली जाते. त्यामुळे त्वचेच्या खाली असलेल्या रक्तपेशींना नुकसान पोहोचते आणि त्यामुळे त्वचा काळसर दिसू लागते.

अ‍ॅलर्जी
अनेकदा डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे एखाद्या अ‍ॅलर्जीमुळेही असू शकतात. या वर्तुळांच्या जोडीनेच डोळ्यांच्या आसपास हलकी सूजही दिसून येते. त्यामुळे याचे निदान डॉक्टरांकडून करवून घेऊन योग्य औषधोपचार आणि भरपूर विश्रांतीनंतर ही काळी वर्तुळे नाहीशी होतात.

डीहायड्रेशन
शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास, म्हणजेच डीहायड्रेशन झाल्यासही डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येतात. एखाद्या आजारपणामुळे किंवा अतिरिक्त मद्यपानामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स कमी होऊ लागतात, त्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे उद्भवतात. अशा वेळी पाण्याचे प्रमाण वाढविल्याने कालांतराने ही समस्या दूर होऊ शकते.

First Published on: April 26, 2019 4:00 AM
Exit mobile version