औरंगाबादच्या जागेवरुन वंचित बहुजन आघाडीमध्ये वाद

औरंगाबादच्या जागेवरुन वंचित बहुजन आघाडीमध्ये वाद

vanchit bahujan aghadi

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केली. मात्र याचवेळी एमआयएमनेही औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात एमआयएमच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली आणि त्यात औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्येही आता या जागेवरून वादावादी सुरू झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादच्या जागेसाठी बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव घोषित केले आहे. मात्र हे नाव एमआयएमला मान्य नाही. जाहीर केलेला उमेदवार जिल्ह्यातील आणि एमआयएमचा असावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर कोळसे पाटील यांचे काम हे पुण्यामध्ये आहे. औरंगाबादमध्ये उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरेल. त्यामुळे एमआयएम औरंगाबाद, नांदेड आणि विदर्भातील एका जागेवर उमेदवार देणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. एमआयएमच्या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या आघाडीत दरी निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे असले तरी औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याचा अंतिम निर्णय हे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर घेणार असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

First Published on: March 7, 2019 4:06 AM
Exit mobile version