आजच्या सभा,आजचं राजकारण!

आजच्या सभा,आजचं राजकारण!

डोक्याला शॉट लेख

सभा झाली की लागलीच सभांची वर्णनं येऊ लागतात…ही वर्णनं म्हणजे सभांची मोजमापं असतात.

…आजच्या राजकारणात सभेला तुडुंब गर्दी इतकंच म्हणून चालत नाही…मुंगी शिरायला जागा नव्हती हे वर्णनही आता वारूळांच्या काळातलं झालं आहे…

…सभेतल्या दशसहस्त्रेशू की कुणी वक्त्याच्या भाषणाचा वृत्तांत झाला की एक चौकट टाकावी लागते…आणि त्या चौकटीत म्हणावं लागतं, तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश असतानाही श्रोत्यांनी तोबा गर्दी केली होती…

…सुट्टीचा दिवस नसतानाही पटांगण खच्चून भरले होते, हे लोटपोट सभांच्या वर्णनातलं ठरलेलं शेवटचं वाक्य…आणि सुट्टीचा दिवस असूनही सभेला तुरळक गर्दी जमली होती हा फसलेल्या सभेच्या बातमीतला समारोप…

…प्रचंड मोठ्या मैदानातल्या फ्लॉप सभेला लिंबूटिंबू लोकांची इनमिन गर्दी झाली आणि मैदान अर्ध्याहून अधिक रिकामं राहिलं की खरंतर ते पंचपात्रातल्या पळीसारखं दिसत असतं…पण तसं खरं वर्णन करणं बरं दिसत नाही म्हणून कुणी करत नाही…

…तरी हल्ली एक आहे की सभेचा चक्काचुर झाला की रिकाम्या खुर्च्यांचे भग्न फोटो दाखवण्याची प्रथा बाजारात आली आहे…कधी कधी ह्या रिकाम्या खुर्च्या त्यांच्या भरायच्या भाड्याबरोबरच खुर्च्यांवर बसलेल्या माणसांचं भाडंही सांगून जातात…

…काही काही नेेते त्यांच्या सुरूवातीच्या काळात आपल्या भाषणांनी जोरदार मैदानं मारत असतात…पण नंतर त्यांच्या भाषणातले तेच हेल, तोच अभिनय, तीच स्वगतं आणि तोच अ‍ॅक्शनपॅक्ड ड्रामा बघून लोक मैदानसुध्दा बदलतात आणि चॅनेलसुध्दा…

…मैदानं मारणार्‍या नेत्यांची मैदानं ओस पडायला लागली की मैदानातली धूळ वार्‍याने उडते आणि व्यासपीठावरच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर बसू लागते…

…व्यासपीठावरच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर अशी धूळ बसायला लागली की ओस पडायला लागलेली मैदानं व्यासपीठावरच्या नेत्यांना घर खायला उठतात तशी खायला उठतात…अशा वेळी व्यासपीठावरच्या नेत्यांना मैदानं नुसती रिकामी नव्हे तर रिकामटेकडी वाटू लागतात…

…अशा वेळी जुन्या काळातल्या तत्वाचं राजकारण करणार्‍या तत्वनिष्ठ नेत्यांची वचनं आजचे नेते मोठ्या अभिमानाने सांगतात…म्हणतात, आमच्या सभेला आज फक्त एक श्रोता हजर राहिला तरी चालेल, त्या एका श्रोत्यासाठी मी माझं संपूर्ण भाषण करीन…

…जुन्या काळातलं तत्वनिष्ठ राजकारण आजच्या राजकारण्यांना जमणार नाही…पण सभा ओस पडल्यावर तरी हे जुन्यांचं जुनं वचन सांगून जुनं राजकारण करता येईल हेही नसे थोडके!…

First Published on: April 2, 2019 4:50 AM
Exit mobile version