पॉवर प्ले,पवार प्ले

पॉवर प्ले,पवार प्ले

डोक्याला शॉट लेख

राजकारणात सगळीच माणसं बोलत असतात…पण प्रत्येकाच्याच बोलण्याला तिरके किंवा तिरपागडे अर्थ असतात असं नाही.

…शरद पवार बोलतात तेव्हा मात्र त्रिकोनी, चौकोनी, काटकोनी, षटकोनी असे सगळे अर्थ निघत असतात…इतक्या कोनात बोलण्याचा आणि इतका काळ असं बोलण्याचा म्हणे आपल्या देशात कुणाकडेच अनुभव नाही…

…असं बोलण्याचाही एक अनुभव असावा लागतो…पण बोलण्याचा अनुभव असणार्‍या प्रत्येकालाच असं बोलता येतं असं अजिबात नसतं…

…काही लोक म्हणतात की अशी माणसं जेव्हा दुसर्‍याला, कसं काय पाटील, बरं हाय का, असं जेव्हा विचारतात तेव्हा त्यांना बर्‍यावाईटाबद्दल काही विचारायचं नसतं…त्यांना पाटीलकी कशी चाललीय ह्याचा अंदाज घ्यायचा असतो…

…अशी माणसं गप्प बसून मौनात जातात तेव्हा त्यांच्या मौनालाही बारीक बारीक अशा प्रचंड तिरप्या छटा असतात…पण म्हणून काही मनमोहन सिंगांच्या मौनातून तिरपा अर्थ निधाला असं कधीच झालं नाही…

…कधी कधी दुर्बोध कविता लिहिणारे कवी लोकसुध्दा काहीबाही लिहितात…पण ते लिहितात त्याच्या विपरित अर्थ वाचणारे काढत असतात…

…शरद पवार असं कधी दुर्बोध बोलत नाहीत, बोलतात ते सहजसोपं आणि साधंसरळ असतं…पण त्यांच्या बोलण्यात जे मध्ये मध्ये अदृश्य महिरपी कंस असतात ते कंस ओळखण्याचं कसब ऐकणार्‍याच्या अंगी असावं लागतं…

…कधी कधी ते कंस म्हणे त्यांच्या निकटच्या माणसालाही कळत नाहीत…आणि ते तसे म्हणे न कळण्याची त्यांनी तजविज केलली असते…

…तर काही जुनेजाणते लोक म्हणे म्हणतात की पवारसाहेब काही बोलल्यावर आपण आधी पंधरा दिवस चक्क गप्प बसावं…आणि पंधरा दिवसांनी त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नंतरच्या घटनांशी ताडून पहावा…

…हल्ली हे सर्व सांगण्यामागचा उद्देश असा की पवार गेले दोन-तीन दिवस सतत काही ना काही बोलताहेत…आणि टॉक शोवाल्यांना चर्चांसाठी विषयांचा पुरवठा करताहेत…

…त्यातून निवडणुका आल्या आहेत…त्यात सगळ्यांच्या बोलण्याचा गलका सुरू झाला आहे…

…पण वाणी लाभलेली सगळीच माणसं जरी बोलत असली तरी बोलण्यातून अर्थाची कारंजी उडवणारी माणसं वेगळीच…

…काही म्हणा, पण पवार जेव्हा बोलतात तेव्हा पॉवर प्लेसारखा पवार प्ले सुरू होतो…आणि सावधान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा पवार प्ले सुरू झालेला आहे…

-अँकर

First Published on: March 14, 2019 4:16 AM
Exit mobile version