काळ बदलला…

काळ बदलला…

डोक्याला शॉट लेख

ते दिवस खराखरच वेगळे होते…जेव्हा निवडणुकांच्या काळात भिंती रंगायच्या.

…तो काळ खरंच वेगळा होता…जेव्हा भिंतींवर पोस्टर्स चिकटली जायची…

…तो जमाना अगदी निराळा होता…जेव्हा डोक्यावर बॅनर्स लागायची…

…पण निवडणूक आयुक्त म्हणून शेषनसाहेब आले…आणि त्यांनी घरांच्या भिंतींंना घरमालकांनी दिलेले रंग शाबूत ठेवायची लोकशाहीला जाचक ठरणारी मोहीम हाती घेतली…

…त्यांनी डोक्यावर वार्‍याने डुलणारी बॅनर्स बंद करून टाकली, खुज्या लोकांची उत्तुंग कटआउट्स कटाप करून टाकली…पोस्टर्स चिकटवण्यावर बंदी आणली…

…काही शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की तेव्हापासूनच राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आपापल्या विचारसरणीला युगानुयुगे अतूट चिकटून राहण्याची प्रथा बंद झाली…तेव्हाच्या त्या भिंतींपासून पोस्टर्सनी जेव्हा फारकत घेतली तेव्हापासून नेत्यांनीसुध्दा आपापल्या पक्षापासून फारकत घेण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला…

…त्या रंगीबेरंगी प्रचाराची सर्वांना खरंतर त्या एका काळापर्यंत सवय झाली होती…साहजिकच, त्या झिगझॅग निवडणूक प्रचाराचा रंग आणि बेरंगसुध्दा भरून कसा काढायचा हा त्यामुळेच त्यांच्यापुढचा प्रश्न होता…

…शेषनसाहेब निवडणुकांना नियमांचा हा अघोरी लळा लावून गेले…आणि राजकारणाचे धडे गिरवण्यासाठी मोदींनी पवारसाहेबांचं बोट पकडावं तसं अपटूडेट कॉम्प्युटरचं बोट पकडून हायफाय मार्केटिंगने निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री घेतली…

…मग एका बाजुला कोकणात उत्तररात्रीचा कंदिल प्रचार सुरू झाला…आणि दुसर्‍या बाजुला दिवसाढवळ्या चाय पे चर्चा सुरू झाली…

…मग नेटाने इंटरनेटवर प्रचार सुरू झाला तसं मराठीतसुध्दा लोक एखाद्या पक्षाला पार्टी विथ डिफरन्स म्हणू लागले…ज्या लोकांना माध्यमं म्हणजे काय ते माहीत नव्हतं त्यांनासुध्दा मीडिया नावाचा इंग्लिश शब्द कळू लागला…

…हळुहळू सोशल मीडिया नावाचं आणखी एक बुडकुलं बाजारात आलं…ह्या मीडियाने शेषनसाहेबांनी पुसलेल्या भिंतींची जागा घेतली…

…निवडणुकीच्या प्रचाराने तिथे शिरकाव कसला, चक्क घुसखोरीच केली…आणि आपला खराखोटा, लबाडअल्लड प्रचार बारमाही चालू ठेवला…

…आणि आता तर काय पहाता पहाता ’तुला पाहते रे’ नावाच्या मालिकेतच निवडणूक प्रचार घुसला…कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसावा तसा लोकशाहीमध्ये विषाणू घुसला…

– अँकर

First Published on: April 10, 2019 4:03 AM
Exit mobile version