प्रमुख भाषण!

प्रमुख भाषण!

डोक्याला शॉट लेख

बघता बघता लाखो लोक गोळा झाले…आणि व्यासपीठासमोर बसले.

व्यासपीठ नेहमीचं नव्हतं, नेहमीसारखं नव्हतं…आणि इतरांसारखं तर नव्हतंच नव्हतं…

…व्यासपीठाच्या एका बाजूला मोठा स्क्रीन लावलेला…आणि तो स्क्रीन अंधार झाला की उजळणार म्हणून सूर्य नावाचा तो सोन्याचा गोळा पलिकडे कधी बुडणार ह्याची सगळे वाट पहात बसलेले…

…हळुहळू अंधार होतो तसतसा जनांचा प्रवाहो आणखी वाढत जातो…आणि व्यासपीठावरच्या इतर वक्त्यांची इतर भाषणं सुरू होतात…

…जनांच्या प्रवाहाला इतर भाषणांमध्ये तसा फारसा रस नसतो…ते प्रमुख कधी येतात आणि त्यांचं भाषण कधी सुरू होतं ह्यासाठी आस लावून बसलेले असतात…

…इतरांचं भाषण सुरू असताना त्यात एखादा तसाच जोरदार मुद्दा आल्यावर प्रमुुखांच्या झिंदाबादच्या घोषणा सुरू होतात…त्यावेळी प्रमुख व्यासपीठावर आले की काय म्हणून बघायला जनांच्या प्रवाहामधून माना उंचावतात…

…पण तोपर्यंत प्रमुख काही व्यासपीठावर आलेले नसतात…त्यामुळे उंचावलेल्या माना खाली जातात…

…ह्या उंचावलेल्या माना खाली जातानाही पुन्हा प्रमुखांचा जयजयकार होतो…हा असा झिंदाबाद आणि जयजयकार मध्ये मध्ये जोशात होणं ही ह्या सभेची रीत असते…

…आणि अशाच एका बेसावध क्षणी जनांचा प्रवाहो ज्यांची आणि ज्यांच्या मुलूखमैदानी भाषणाची वाट पहातोय त्या प्रमुखांचं सभेच्या ठिकाणी आवाजी दणदणाटात जंगी स्वागत होतं…थोड्याच वेळात ते व्यासपीठाचे जिने चढताना दिसतात…

…व्यासपीठावरच्या प्रतिमांना ते प्रथेप्रमाणे पुष्पहार अर्पण करतात…आणि पुढच्याच क्षणी ते जनांच्या प्रवाहाला उद्देशून भाषण करतील म्हणून घोषणा होते…

…टाळ्या वाजतात, पण शिट्ट्या त्यापेक्षा जास्त पडतात…आणि त्या थांबल्या की वातावरणात ’तमाम’ हा शब्द एका वेगळ्याच नादात घुमतो…

…आणि मग नंतर स्क्रीनवर भाषणासोबत पोलखोल नावाचा सिनेमा सुरू होतो…आणि तो सिनेमा जनांच्या प्रवाहामध्ये खोल खोल झिरपत जातो…

…देशभर भाषणं होतच रहातात, होतच असतात, पण पोलखोल नावाच्या सिनेमासोबत होणारं हे भाषण तमाम विरोधकांना हवंहवंसं वाटतं…विरोधक स्वत: जरी त्या व्यासपीठावर नसले तरी त्यांच्या मतदारसंघात मात्र ते भाषण निनादावं, मतदान होईपर्यंत निनादतच राहावं असं वाटत राहतं…

-अँकर

First Published on: April 17, 2019 4:02 AM
Exit mobile version