चुकीचे पत्ते लागताहेत?

चुकीचे पत्ते लागताहेत?

डोक्याला शॉट लेख

एक ओळखीचा भक्त दुसर्‍या ओळखीच्या भक्ताला भेटला…दोघांच्यात ओळखीचे विषय निघणं साहजिक होतं, कारण भक्ती ओळखीची होती…

…भक्त असल्यामुळे दोघांच्यात ओळखीची सुखदु:ख वाटून घेणंही ओघाने आलंच…ओळखीची काळजी व्यक्त करणंही आलंच…

…पुलवामाचा प्रभाव दोन-चार दिवस राहिला, नंतर ओसरला रे…एक भक्त दुसर्‍या भक्ताला अशाच ओळखीच्या घनघोर काळजीने म्हणाला…

…खरंय, पण नंतरचं बालाकोट तरी लोकांच्या मनाच्या कप्प्यात शेवटपर्यंत राहायला हवं होतं…दुसर्‍या भक्ताने तितकीच दाट काळजी व्यक्त केली…

…पण नंतर अंतराळात एक ठोकाफिटिंग यान पाठवलं ना आपण!…पहिला भक्त छाती पुढे काढत म्हणाला…

…हो, त्यावेळी मोदींनी नोटबंदीसारखीच टीव्हीवर येऊन अचानक घोषणा करून बाजी मारली…दुसर्‍या भक्तानेही आपली छाती फुलवली…

…पण तेही लोेकांच्या आज कुठे लक्षात राहिलं नाही…पहिल्या भक्ताचे डोळे काळजीने खोल गेले…

…हो, खरंच रे, कालपर्यंत माझ्याही लक्षात राहिलं नाही ते, मीसुध्दा विसरून गेलो…दुसरा भक्त सहज बोलून गेला…

…कमाल आहे, पब्लिक मेमरी इज शॉर्ट हे खरंतर पुर्वी आपल्याला लागू नव्हतं, पण ते हल्ली असं लागू का व्हायला लागलंय?…पहिल्या भक्ताच्या चेहर्‍यावर खूपच काळजी दाटली…

…त्यात तो पाकिस्तानचा इम्रान पहिला ना काय बोलून गेलाय? म्हणे मोदी निवडून आले तर आमच्या दृष्टीने बरं होईल!…दुसर्‍या भक्ताने रागाने मुठीवर मुठ आपटली…

…फास्ट बोलर खरंतर गुगली टाकत नसतात ना, मग ह्या इम्रानने असा धावत येऊन आपल्याला असा गुगली कसा काय टाकला रे!…पहिला भक्त फास्ट बोलरने अपिल केल्यासारखं म्हणाला…

…त्यामुळे आपली पंचाईत अशी झालीय की इम्रानसुध्दा आपल्या लोकांचा प्रचार करतोय की काय, असा संदेश काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गेलाय…दुसरा भक्त चरफडत म्हणाला…

…फेकलेला एकही पत्ता आपल्या बाजुने पडत नाहीय, हे असं कसं ह्यावेळी होतंय?…आता पहिल्या भक्ताने मुठीवर मुठ आपटत विचारलं…

…तोच तोच पत्ता पुन्हा पुन्हा पिसायचा नसतो, त्यामुळे तो पब्लिकला ओळखता येतो हे त्या चाणक्याने सांगितलेलं वाचायला आपला चाणक्य विसरला की काय!…दुसर्‍या भक्ताचा हात शेंडी नसतानाही डोक्याकडे गेला…

– अँकर

First Published on: April 18, 2019 4:54 AM
Exit mobile version