गर्दीचं गुपित

गर्दीचं गुपित

डोक्याला शॉट लेख

प्रधानजी, आज आपल्या सभेला गर्दी का झाली नाही?…श्रेष्ठी राजेशाही स्टाइलमध्ये जवळजवळ किंचाळलेच…

…अहो, त्यांच्या सभेलासुध्दा कुठे गर्दी झाली?…प्रधानजींनी उत्तरादाखल बिरबलासारखा चतूर प्रश्न केला?…

…तू त्यांच्या सभेचं मला काही सांगू नकोस, आपल्या सभेपुरती विचारलंय, तेवढंच बोल…श्रेष्ठींनी पुन्हा राजेशाही प्रश्न केला…

…साहेब, आपली सभा सुरू झाली तेव्हा धोनीची बॅटिंग सुरू होती…प्रधानजींनी पुन्हा बिरबलासारखं चतूर उत्तर दिलं…

…आँ? धोनी आज पंधरा वर्षं बॅटिंग करतोय, पण पंधरा वर्षं आपल्या सभांना गर्दी होतेय…श्रेष्ठींनी प्रधानजींना चतूरपणे परतवून लावलं…

…पण धोनी अजून नीट बॅटिंग करतो, तुमची बॅटिंग हल्ली कुठे व्यवस्थित होतेय…प्रधानजींनी थेट साइटस्क्रीनवरून सिक्सर मारली…

…तु कुणाला शहाणपणा शिकवतो, आता धोनीची बॅटिंग पण उतरलीय आणि वय पण उतरलंय…श्रेष्ठींनी दुसरा बाउन्सर टाकला…

…पण तरीही धोनीला अजून मागणी आहे…धोनीची बॅटिंग बघायला आणि धोनीला बघायला लोक अजून येतात…प्रधानजींनी श्रेष्ठींची सरळ फिल्मच उतरवली…

…पण ह्यातून तुला काय सांगायचंय! आम्हाला मागणी नाही?…श्रेष्ठींनी रोखठोक सवाल केला…

…साहेब, राग मानू नका, पण हल्ली तुमचं नाव वक्त्यांच्या यादीत टाकलं की श्रोते सोडा, इतर वक्ते यायला तयार होत नाहीत…प्रधानजीही रोखठोक बोलून गेले…

…अरे ते जळतात रे माझ्या अभ्यासपूर्ण भाषणावर…श्रेष्ठी लाजत लाजत म्हणाले…

…तरी पण एक मुद्दा उरतोच, तुमच्या भाषणाला हल्ली लोकांची गर्दी होत नाही…प्रधानजीं फटकळपणे म्हणाले…

…तू आता मला हा शहाणपणा शिकवतो आहेस तर मला तुझ्याकडूनच कळू दे, माझ्या भाषणाला लोकांची का गर्दी होत नाही?…श्रेष्ठींनी प्रधानजींना खिजवलं…

…साहेब, तुम्ही कुठेही जा, तुमच्या भाषणात तेच तेच, तेच तेच मुद्दे असतात…प्रधानजींनी श्रेंष्ठींचा सरळ सरळ हिशोब करून टाकला…

…अरे, अतिशहाण्या, पण आपल्या विरोधकांच्या भाषणात पण तेच तेच मुद्दे असतात?…श्रेष्ठींनी प्रधानजींना खडसावलंच…

…त्यांचे मुद्दे तेच असतात, पण त्यांची किमान अ‍ॅक्टिंग तरी बदललेली असते…प्रधानजींनी श्रेष्ठींकडे रहस्यभेद केला…

– अँकर

First Published on: March 18, 2019 4:40 AM
Exit mobile version